राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३० सप्टेंबर रोजी पाच राज्यांत नव्या राज्यपालांची तर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
बिहार, तामिळनाडू, मेघालय, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी तर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे २९ सप्टेंबर रोजी मुंबईत कर्करोगामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
अल्टर यांचा जन्म १९५० साली मसुरीमध्ये झाला. त्यांचे उच्च शिक्षण येल विद्यापीठात झाले. १९७० नंतर ते पुन्हा भारतात आले.
पुण्यातील ‘एफटीआयआय’मध्ये त्यांना १९७२मध्ये प्रवेश मिळाला. पुढे त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला, ज्यात त्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.
टॉम अल्टर यांनी १९७६मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस : द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही ते दिसले.
मात्र ९०च्या दशकात दूरदर्शनवरील ‘जबान संभालके’ या शोनंतर अल्टर बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले.
नव्वदच्या दशकात जुनून या मालिकेत त्यांनी साकारलेली गॅंगस्टर केशव कलसीची भूमिकादेखील विशेष गाजली होती.
याचबरोबर, जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तीमान, मेरे घर आना जिंदगी, यहॉं के हम सिकंदर यासारख्या मालिकामधूनही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली.
त्यांनी अनेक टीव्ही मालिका आणि ३००हून अधिक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अल्टर यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
नाटकविश्वातहि अल्टर हे मोठे नाव होते. पृथ्वी थिएटर्ससाठी अनेक नाटकांत त्यांनी काम केले आहे.
१९७७साली नसिरुद्दीन शहा आणि बेंजामिन गिलानी यांसोबत मिळून अल्टर यांनी मॉटले प्रोडक्शनची स्थापना केली.
भारतीय संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या अल्टर यांना इंग्रजीसह अस्खलित उर्दू आणि हिंदीत लिहिता, वाचता आणि बोलता यायचे.
विशेषतः त्यांना उर्दू शायरीची आवड होती. ‘गालिब इन दिल्ली’ नाटकात त्यांनी उर्दू कवी मिरझा गालिब यांची लक्षवेधी भूमिका साकारली होती.
१९८० ते ९० दरम्यान त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.
चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल २००८मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणारे गुजरात पहिले राज्य
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’ (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर केला जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला प्रथमच मतदान केल्याची पावती मिळणार आहे.
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही, याची खात्री करता येणार आहे. तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार आहे.
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर असणार आहे.
मतदाराने केलेली तक्रार बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी त्या मतदाराविरोधात तक्रारही करू शकतो. नियमानुसार, अशा प्रकारात संबंधित मतदाराला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
त्यानुसार संपूर्ण राज्यात ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघात या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. आता गुजरातमधील १८२ मतदारसंघांमधील ५०,१२८ मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे.
संपूर्ण राज्यात महिला सभेचे आयोजन
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १ ऑक्टोबरला महिला सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सहभागी महिला ‘गावात गर्भलिंग निदान होऊ देणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत.
तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यातील १० टक्के निधी महिलासाठी राखीव ठेवणे आणि महिलांना उघड्यावर शौचास जावे लागू नये, यासाठी प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचा एकमताने ठराव देखील करण्यात येणार आहे.
महिलांनी आपल्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने ठराव करावे, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
त्याला मंजुरी देत आयोगाने सुचवलेले सर्व ठराव राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करावे, असे आदेश राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतींना ताकद देणाऱ्या ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, महिलांना गावाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी महिला सभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
स्त्रीभ्रूण हत्या, मुलींचा घटता जन्मदर यातून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याची होणारी पिछेहाट रोखणे गरजेचे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे निधन
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे २८ सप्टेंबर रोजी गुरुग्राम येथे निधन झाले. फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते.
त्यांना ‘काँग्रेसचे चाणक्य’ म्हणूनही ओळखले जात होते. १९८०-८४ या काळात इंदिरा गांधींचे ते राजकीय सचिवही होते. त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचेही ते काही काळासाठी राजकीय सचिव होते.
माखनलाल फोतेदार मुळचे जम्मू-काश्मीरचे होते. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
फोतेदार काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे दीर्घकाळ सदस्य होते. तसेच, आताही त्यांना कार्यकारिणी समितीत 'आजीव आमंत्रित' दर्जा देण्यात आलेला होता.
फोतेदार यांचा जन्म ५ मार्च १९३२ रोजी झाला. पहलगाम मतदारसंघातून ते जम्मू-काश्मीर विधानसभेत निवडून गेले होते. ते जम्मू-काश्मीर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते.
त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले आणि केंद्रात मंत्री झाले. राज्यसभेत दोन टर्म निवडून जाण्याची संधी त्यांना मिळाली होती.
फोतेदार यांच्या 'द चिनार लिव्हज' या पुस्तकाचे २००५साली प्रकाशन झाले. या पुस्तकातील काही उल्लेखांमुळे वाद ही निर्माण झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा