ब्रिक्स देशांची नववी शिखर परिषद ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात त्यांनी भारत व म्यानमारमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला आहे. तसेच रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्नही अप्रत्यक्षपणे उपस्थित केला.
यावेळी मोदींनी म्यानमारच्या नागरिकांसाठी नि:शुल्क व्हिसा उपलब्ध करवून देण्याची घोषणा केली.
म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचार यामुळे रोहिंग्या मोठ्या संख्येने म्यानमारची सीमा ओलांडून इतर देशांमध्ये विस्थापित होत आहेत.
म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १.२५ लाख लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे.
सध्या भारतात ४० हजार विस्थापित रोहिंग्या राहत असून, भारताने त्यांची पुन्हा म्यानमारमध्ये रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिध्द पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी ५ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देश पुन्हा एकदा सुन्न झाला आहे.
यापूर्वी ज्या पद्धतीने उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांची हत्या करण्यात आली. त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडले आहे.
हिंदुत्वावादाचा विरोध केल्याचा समज करीत यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर (२०१३), ज्येष्ठ साहित्यिक एम कलबुर्गी (२०१५) आणि गोविंद पानसरे (२०१५) यांच्या हत्या करण्यात आली होती.
या घटनेनंतर राजकारणी आणि कला-साहित्य विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत, या घटनेचा निषेध केला आहे.
पत्रकार गौरी लंकेश प्रसिद्ध कवि पी. लंकेश यांच्या कन्या होत्या. त्या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक होत्या.
विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा.
त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या.
भारत एस-४०० सिस्टीम खरेदी करणार
भारत लवकरच रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असून, भारतीय हवाई दलाने नुकत्याच या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
हवाई दलात एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश झाल्यानंतर हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
एस-४०० सिस्टीमद्वारे शत्रूची लढाऊ, टेहळणी विमाने, क्रूझ मिसाईल आणि ड्रोन विमाने ४०० किलोमीटर अंतरावर असतानाच नष्ट करता येऊ शकतात.
या सिस्टीममुळे भारताला आपल्या हद्दीत राहूनच चीन आणि पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्प्रभ करता येतील तसेच हवाई वर्चस्वही मिळवता येईल.
रशियामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दोनवेळा या सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या.
या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाचा रोसो बोरॉन एक्सपोर्ट या कंपनीबरोबर खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही कंपनी रशियाच्या अन्य देशांबरोबरच्या संरक्षण व्यवहाराचे काम पाहते. त्यात किंमती ठरवणे, डिलव्हरी या विषयांचा समावेश असतो.
एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम महागडी असली तरी, भारताला ही सिस्टीम मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.
या सिस्टीममुळे भारताला पाकिस्तानवर वरचढ होता येईल तसेच चीनशी बरोबरी साधता येईल. कारण चीनने आधीच ही सिस्टीम विकत घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत ऑक्टोंबर २०१६मध्ये १७व्या भारत-रशिया परिषदेत एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम विक्रीचा करार झाला होता.
जागतिक विद्यापीठांच्या यादीत भारताची घसरण
उच्च शिक्षणासंदर्भात जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीचा १४वा वार्षिक अहवाल ‘टाइम’कडून प्रसिद्ध करण्यात आला.
या अहवालात ७७ देशांतील १००० विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील विद्यापीठांच्या क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसते.
या अहवालानुसार, जागतिक स्तरावर पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा किंवा उच्च शिक्षण संस्थेचा समावेश नाही.
भारतातील नावाजलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या संस्थांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे.
संशोधनातील घटलेल्या प्रमाणामुळे आयआयएससीच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. ही संस्था २०१ ते २५० या गटातून घसरून यंदा २५१ ते ३०० गटात गेली आहे.
त्याचबरोबर आयआयटी (दिल्ली), आयआयटी (कानपूर) आणि आयआयटी (मद्रास) या नावाजलेल्या संस्थांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे.
या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर ऑक्सफर्ड विद्यापीठ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
केंब्रिज विद्यापीठ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टँडफोर्ड विद्यापीठ या संस्थांना मागे टाकत दुसऱ्या स्थानावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा