चालू घडामोडी : २३ सप्टेंबर
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांना मुदतवाढ
- केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर २०१८पर्यंत पदावर कायम राहतील.
- ऑक्टोबर २०१४मध्ये तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- सुब्रह्मण्यम यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए तर त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एमफिल आणि डी फिलचे शिक्षण पूर्ण केले आहे.
- १९८८-९२ दरम्यान ‘गॅट’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून हावर्ड युनिव्हर्सिटीच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि जॉन हॉपकिन्सच्या स्कूल फॉर अॅडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीजमध्ये अध्यापनाचे कार्यही केले आहे.
- इंडिया टर्न: अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन (२००८) आणि इक्लिप्स: लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स (२०११) ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
- तसेच २०१२मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे ते सह-लेखक आहेत.
इराणकडून क्षेपणास्त्राची चाचणी
- इराणने अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता खोरामशहर नावाच्या नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची २२ सप्टेंबर रोजी चाचणी केली.
- यापूर्वी इराणने क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे त्यांच्यावर अमेरिका व युरोपियन युनियनने अनेक निर्बंध टाकले होते.
- त्यानंतर मागच्यावर्षी इराणने आपला अण्वस्त्रे विकसित करण्याचा कार्यक्रम नियंत्रणात ठेवण्याचा ऐतिहासिक करार केला होता.
- त्यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावरील तेलाचे आणि आर्थिक निर्बंध मागे घेतले होते.
- निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे इराणचा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल विकण्याचा मार्ग मोकळा झाला तसेच इराणची १०० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची अडकवून ठेवलेली मालमत्ताही खुली करण्यात आली होती.
- इराणने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम असाच सुरु ठेवला तर, त्यांच्यावर आणखी निर्बंध येऊ शकतात.
आनंदतीर्थ सुरेश यांना पॉल बॅरन पुरस्कार
- बेंगळूरुचे तरुण संशोधक आनंदतीर्थ सुरेश यांना मार्कोनी सोसायटीच्या वतीने दिला जाणारा पॉल बॅरन तरुण संशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे.
- रेडिओचा शोध लावणारे इटलीचे संशोधक गुलिमो मार्कोनी यांच्या कुटुंबीयांनी संदेशवहन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी मार्कोनी सोसायटी ही संस्था स्थापन केली.
- संदेशवहन क्षेत्रातील संशोधन करण्याऱ्या तरुण संशोधक आणि अभियंत्यांसाठी १९७४मध्ये गुलिमो मार्कोनी यांच्या कन्येने हा पुरस्कार सुरू केला.
- आनंदतीर्थ सुरेश हा २८ वर्षांचा असून, त्याने इंटरनेटचे वेगवान कनेक्शन कमी किमतीत मिळावे यासाठी वेगळे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
- सुरेशच्या अलगॉरिथममुळे माहिती देवाणघेवाणीचा खर्च कमी झाला आहे. कारण यात माहितीचे संकलन वेगळ्या रूपात करून ती पाठवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले, जे किफायतशीर आहे.
- सुरेशने आयआयटी मद्रासमधून २०१०मध्ये भौतिकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर सॅन्टीयागोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर्स व डॉक्टरेट या दोन्ही पदव्या त्याने घेतल्या.
- सध्या गुगलमध्ये विकसनशील देशांच्या लोकांना इंटरनेटचा फायदा मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानात्मक उत्तरे शोधण्यासाठी तो काम करीत आहे.
कॅनडा करणार पंढरपूरचा विकास
- भारत आणि कॅनडा या दोन देशांच्या मैत्रीला १५० वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने कॅनडा सरकार भारतातील एका शहराचा विकास करणार आहे.
- कॅनडा सरकारने यासाठी महाराष्ट्रातील पंढरपूरची निवड केली असून, कॅनडा पंढरपूरमध्ये दोन हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे.
- पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार प्लान आखणार आहे. येत्या तीन ऑक्टोंबरला कॅनडा सरकारचे प्रतिनिधी चर्चेसाठी पंढरपूरला येणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार के जे सिंग यांची हत्या
- पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रीं गुरचरन कौर यांची राहत्या घरात हत्या करण्यात आली.
- या घटनेचा पंजाबमध्ये सर्वच स्तरातून निषेध होत असून, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.
- सिंग यांच्या घरातून काही मौल्यवान दागिने आणि घरासमोरील कार गायब असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.
- पंजाब पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे.
- सिंग इंडियन एक्स्प्रेसच्या चंदिगड आवृत्तीचे तसेच अन्य ख्यातनाम वृत्तपत्रांच्या चंदिगडमधील आवृत्तीचे संपादक होते.
- पत्रकाराची हत्या होण्याची गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कर्नाटकात गौरी लंकेश यांची आणि त्रिपुरामध्ये शंतनू भौमिक या पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.
- डाव्या विचारसरणी विरोधात मत मांडणाऱ्या गौरी लंकेश या बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक होत्या.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणी
- पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
- एका हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या या अँटी शिप मिसाईलची (जहाज नष्ट करणारे क्षेपणास्त्र) ही चाचणी यशस्वी झाली. पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेला या चाचणीमुळे वेगळी उंची लाभली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा