चालू घडामोडी : २५ व २६ जानेवारी
एस. सोमनाथ विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे नवे संचालक
- विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी जेष्ठ वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे सध्याचे संचालक के सिवन यांची इस्त्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर सोमनाथ यांची वर्णी लागली आहे.
- सोमनाथ हे या केंद्राचे माजी सहायक संचालक असून सध्या ते लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत.
- इस्रोपुढे जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी करण्याचे जे मोठे आव्हान होते ते पेलण्यात सोमनाथ यांचा मोठा वाटा आहे.
- डिसेंबर २०१४ मध्ये जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी झाले होते, त्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
- इस्रोने गेल्या वर्षी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा विक्रम केला होता. या मोहिमेतही ते सहभागी होते.
- सोमनाथ हे मूळचे केरळचे असून, त्यांचे शिक्षण बेंगळूरु येथील आयआयएस्सी या संस्थेत झाले. तेथे त्यांना हवाई अभियांत्रिकीत सुवर्णपदक मिळाले होते.
- १९८५मध्ये इस्रोत दाखल झाल्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिने, द्रव इंधनावर चालणारे प्रक्षेपक या अनेक प्रकल्पांत काम केले आहे.
- अॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अवकाश सुवर्णपदक, इस्रोचा उत्तम गुणवत्ता पुरस्कार, सामूहिक नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
- इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग, एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, अॅस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत.
राजपथवर शिवराज्यभिषेकाचा चित्ररथ
- २६ जानेवारी रोजी देशभरात ६९वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या संघटनेतील १० देशांचे राष्ट्रप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- यावेळी राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आसियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ सादर करण्यात आले.
- महाराष्ट्रातर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा सादर करण्यात आला होता.
- ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।’ या कवी भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता.
- चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली होती.
- मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखविण्यात आले होते.
- यासोबतच गागाभट्ट, आभूषण देणारा दरबारी तसेच या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवले.
- दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे तर मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.
- या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.
लेफ्ट. जन. राजेंद्र निंभोरकर यांना परमविशिष्ट सेवा पदक
- संरक्षण मंत्रलयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेना दलाच्या पुरस्कारांची घोषणा २५ जानेवारी रोजी करण्यात आली.
- यामध्ये परमविशिष्ठ सेवा पदक, कीर्ती चक्र, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक, शौर्य चक्र, व सेना पदक या पुरस्कारांचा समावेश आहे.
- यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये २८ जवानांना परम विशिष्ठ सेवा पदक, ४९ जवानांना अति विशिष्ठ सेवा पदक १० जवानांना युद्ध सेवा तर १२१ जवानांना विशिष्ठ सेवा पदक, १४ शौर्य चक्र, १० युद्ध सेवा पदक तर एका जवानास कीर्ती चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
- याशिवाय देशातील ३९० जवानांना सेना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे, महाराष्ट्राच्या २२ जवानांचा यात समावेश आहे.
- महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे परमविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
- सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल निंभोरकर हे मुळचे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामधील आहेत.
- निंभोरकर यांनी आजवर लेह, कारगिल, काश्मीर खोरे, पुंछ, ईशान्य भारत आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. सध्या त्यांच्यावर जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.
- पंजाब रेजिमेंटच्या कर्नल ऑफ रेजिमेंट हा मानाचा किताबही निंभोरकर यांना बहाल करण्यात आला असून लेफ्ट. जन. थोरात यांच्यानंतर असा किताब मिळविणारे ते एकमेव मराठी अधिकारी आहेत.
- आजवर त्यांना युद्ध सेवा, विशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा अशा अनेक पदकांनी गौरविण्यात आले आहे.
- नाशिकचे वीर जवान मिलींद खैरनार यांनी दाखविलेले अदम्य साहस व विलक्षण धाडसाची दखल घेत त्यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार
- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडच्या मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
- मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
- १९६०साली पेटकर लष्कराच्या संघाकडून हॉकी खेळत होते. मात्र काही कारणामुळे त्यांनी १९६४साली बॉक्सिंगकडे मोर्चा वळवला.
- १९६५साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले. त्यामुळे पेटकर यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
- १९७२साली जर्मनी येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर जलतरणासाठी ३७.३३ सेकंदाचा जागतिक विक्रम करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावले.
- १९७५साली पेटकर यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा