चालू घडामोडी : ६ जानेवारी

विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकणाऱ्या महिलांचा राष्ट्रीय गौरव

  • विविध क्षेत्रांत प्रथम पाऊल टाकत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील ११३ महिलांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे ‘फर्स्ट लेडी पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १५ महिलांचा समावेश आहे.
  • राष्ट्रपती भवनात २० जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
  • समाजातील दमनकारी प्रवृत्तींचा विरोध झुगारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, वेगळी वाट चोखाळणाऱ्या महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पुरस्कार विजेत्या महिला
क्र. नाव कर्तुत्व
१. दुर्गाबाई कामत (मरणोत्तर) भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री.
दुर्गाबाई कामत यांनी दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासूर’ (१९१३) या चित्रपटात पार्वतीचे काम केले होते.
त्यांची कन्या कमलाबाई कामत (विवाहोत्तर- कमलाबाई गोखले) यांनी या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती.
२. डॉ. अबन मिस्त्री (मरणोत्तर) देशातील पहिल्या महिला तबला वादक.
३. सुरेखा यादव पहिल्या महिला रेल्वे चालक.
४. भाग्यश्री ठिपसे पाच वेळा भारतीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेत्या.
५. हर्षिणी कण्हेकर पहिल्या महिला अग्निशामक अधिकारी.
६. शिला डावरे पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक.
७. आमदार डॉ. भारती लव्हेकर देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू केली.
८. अरुणाराजे पाटील भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या तंत्रज्ञ
९. डायना एदलजी महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कप्तान.
१०. स्नेहा कामत देशातील पहिली वाहन चालन प्रशिक्षण संस्था स्थापन केली.
११. रजनी पंडित देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर.
१२. स्वाती पिरामल असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
१३. डॉ. इंदिरा हिंदुजा देशातील पहिल्या टेस्टटय़ूब बेबीची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ.
१४. उपासना मकाती अंधांसाठी देशातील पहिले जीवनशैलीविषयक मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित केले.
१५. तारा आनंद डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून दिला.
याशिवाय मदर तेरेसा, कल्पना चावला, बछेंद्री पाल, ऐश्वर्या राय बच्चन, पी. व्ही. सिंधु, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकार, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही पुरस्काराच्या यादीत समावेश आहे.

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे निधन

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे वयाच्या ६८व्या वर्षी ४ जानेवारी रोजी निधन झाले.
  • किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर बॉम्बे रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
  • राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
  • हिवरे गावच्या सरपंचापासून थेट विधान परिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास या अभ्यासू कार्यकर्त्याने पूर्ण केला.
  • डावखरे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे या गावी झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले.
  • पदवीधर झाल्यानंतर त्यांची ओळख राजकारणातील तत्कालीन मातब्बर नेते बाळासाहेब देसाई यांच्याशी झाली. काही काळ देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. 
  • १९८०साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
  • १९८६साली त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले.
  • त्यांच्या प्रयत्नांमुळे १९८७मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आली. १९८७ ते १९९३पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले.
  • १९९२पासून सतत चार वेळा ते राज्य विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग १८ वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले.
  • २५ मे १९९९ला शऱद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरे राष्ट्रवादीत गेले.
  • राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. कार्यकर्तृत्वाच्या चढ्या आलेखामुळेच राजकारणातील देव माणूस म्हणूनही ते ओळखले जात होते.

चारा घोटाळ्यात लालूंना साडेतीन वर्षांची शिक्षा

  • राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना रांची सीबीआय कोर्टाने चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 
  • तसेच त्यांना ५ लाख रूपयांचा दंडही ठोठावला असून, त्यांना जामीन मिळणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • ३० डिसेंबरला झालेल्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. सुमारे २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला.
  • निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच ६९ वर्षीय लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती. यानंतर लालूंच्या शिक्षेची सुनावणी तीनवेळा टळली होती.
  • ३० डिसेंबरला झालेल्या सुनावणीत, १९९०नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.
  • तसेच माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह सहा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले होते.
  • चारा वितरणाच्या नावाखाली महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता.
  • पाटणा उच्च न्यायालयाने १९९६मध्ये या घोटाळ्याच्या तपासाचे आदेश दिले होते. लालूप्रसाद यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी तीन प्रकरणे दाखल आहेत.
  • त्यात दुमका कोषागारातून ३.९७ कोटी, छैबासा कोषागारातून ३६ कोटी आणि दोरांदा कोषागारातून १८४ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
 पार्श्वभूमी 
  • शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. बिहारच्या स्थापनेपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
  • सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करुन त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान द्यायचे. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतू या प्रकरणात कोणताही हिशोब दिला गेला नाही.
  • देशाचे तत्कालीन महालेखापाल टी एन चतुर्वेदी यांना १९८५साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा संशय आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले होते.
  • १९९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने या घोटाळ्याची चौकशी देखील केली.
  • बिहारच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी अहवाल देखील दिला. मात्र, त्रिवेदी यांची तडकाफडकी बदली आणि हे प्रकरण थंड पडले.
  • १९९६मध्ये पश्चिम सिंगभूम जिह्याचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केली आणि चारा घोटाळ्याचे घबाडच त्यांच्या हाती लागले.
  • चारा घोटाळ्यात अनेक संस्थांना अनुदान देण्यात आले. या संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या, अशी माहिती समोर आली.
  • चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. मूळचे बिहारचे असेलेले खरे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.
  • या घोटाळ्याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी २ खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य ४ खटल्यांचे कामकाज सुरू आहे.
  • चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
  • २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.

अमेरिकेत 'बॉम्ब' चक्रीवादळाचा कहर

  • अमेरिकेत 'बॉम्ब' नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली तर गोठवणारी थंडी पडली आहे.
  • या भागात तापमान कमालीचे घसरले असून थंड वारे वाहत आहेत. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ८८.५ किमी असून तापमान उणे २९ अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे.
  • या वादळात आतापर्यंत उत्तर व दक्षिण कॅलिफोर्नियात ४ जण मरण पावले असून बर्फाळ रस्त्यावर वाहने चालवणे अशक्य बनले आहे.
  • तसेच अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
  • उत्तर न्यूयॉर्कमध्ये तापमान इतके कमी आहे की, नायगारा धबधबा गोठला आहे. हा धबधबा अमेरिका व कॅनडाच्या सीमेवर आहे.
  • इतरवेळी प्रतिसेकंद ३१६० टन पाणी प्रवाहित करणारा हा धबधबा प्रत्यक्षात हिमपृष्ठभागाची विस्तीर्ण चादर ओढून त्याखालून प्रवाहित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा