चालू घडामोडी : ३१ जानेवारी

स्कॉर्पियन श्रेणीतील ‘आयएनएस करंज’चे जलावतरण

  • स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले.
  • ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. या ६ पाणबुड्या २०२०पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे.
  • यापूर्वी याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि खांदेरी या पाणबुड्यांचे जलावतरण पार पडले होते.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे.
  • नौदलाचे चीफ अॅडमिरल : सुनील लांबा
 करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये 
  • फ्रान्सच्या मदतीने ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली करंज ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.
  • या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. तिचे वजन १५६५ टन आहे.
  • टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.
  • युद्धाच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही.
  • या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
  • शत्रूला नेमके शोधून लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
  • जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.

ब्लड मून, सुपरमून आणि ब्लुमूनचा त्रिवेणी संगम

  • खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून असा दुर्मिळ तिहेरी नजराणा ३१ जानेवारी रोजी आकाशात पाहायला मिळाला.
  • यावेळी चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३.५८ लाख किमी अंतरावर आला. त्यामुळे नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा तर ३० टक्के अधिक तेजस्वी दिसत होता.
  • खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असे नाव दिले आहे
  • यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी म्हणजेच १५२ वर्षांपूर्वी असा तिहेरी योग जुळून आला होता.
  • २०१८नंतर ३१ जानेवारी २०३७ मध्ये ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे. २६ मे २०२१ रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा दुहेरी योग येणार आहे.
 सुपरमून म्हणजे काय? 
  • चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३.८४ किमी इतक्या अंतरावर असतो.
  • पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो.
  • ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते.
  • अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.
 ब्लुमून म्हणजे काय? 
  • सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते.
  • ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.
 ब्लड मून म्हणजे काय? 
  • सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते.
  • अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो.
  • यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो. त्यास ब्लड मून असे म्हणतात.

जगातील श्रीमंत देशांमध्ये भारत सहावा

  • जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे.
  • न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. २०१७ साली अमेरिकेची एकूण संपत्ती ६४,५८४ अब्ज डॉलर इतकी होती.
  • दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४,८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर आहे.
  • या पाहणीसाठी प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीकडे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता, समभाग, व्यावसायिक मत्ता आदी विचारात घेण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडे असलेल्या निधीची रक्कम या मोजदादीतून वगळण्यात आली आहे.
  • २०१६मध्ये भारताची एकुण संपत्ती ६५८४ अब्ज डॉलर होती. २०१७मध्ये ती ८२३० अब्ज डॉलर झाली. म्हणजे २०१७मध्ये भारताच्या एकुण संपत्तीत २५ टक्के वाढ झाली.
  • भारतात अतिश्रीमंतांची (१० लाख डॉलर वा त्याहून अधिक संपत्ती असणारे) ३,३०,४०० आहे. अमेरिकेत हीच संख्या ५०,४७,००० आहे.
  • भारतातील कोट्यधीशांची संख्या २०,७३० असून, अब्जाधीशांची संख्या ११९ आहे.
  • जगातील अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोट्यधीशांच्या यादीत भारत सातवा आहे.
जगातील पहिले दहा श्रीमंत देश
क्र. देश संपत्ती (अब्ज डॉलर)
१. अमेरिका ६४,५८४
२. चीन २४,८०३
३. जपान १९,५२२
४. ब्रिटन ९,९१९
५. जर्मनी ९,६६०
६. भारत ८,२३०
७. फ्रान्स ६,६४९
८. कॅनडा ६,३९३
९. ऑस्ट्रेलिया ६,१४२
१०. इटली ४,२७६

यशवंत सिन्हा यांच्याकडून ‘राष्ट्र मंच’ची स्थापना

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नवीन राजकीय वाटचालीसाठी ‘राष्ट्र मंच’ची स्थापना केली आहे.
  • यामध्ये भाजपचेच खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे.
  • केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या भाजपच्या जुन्या नेत्यांना बाजूला सारण्यात आले होते.
  • यामुळे या नाराज नेत्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा देखील आघाडीवर होते.
  • यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी ‘राष्ट्र मंचा’ची स्थापना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा