चालू घडामोडी : ४ व ५ जानेवारी

प्रसिध्द उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांचे निधन

  • रस्ते बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘आयडियल रोडवेज बिल्डर्स’चे (आयआरबी) संस्थापक आणि प्रसिध्द उद्योजक दत्तात्रय म्हैसकर यांचे ३ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
  • म्हैसकर यांनी पुणे येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता (सिव्हील) पदाची पदवी घेतली.
  • त्यानंतर म्हैसकर यांनी सुरूवातीच्या काळात खासगी बांधकाम कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मुंबई महापालिकेत बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरी केली.
  • नावीन्यपूर्ण करण्याचा करण्याची वृत्ती असल्याने दत्तात्रय म्हैसकर यांचे नोकरीत मन रमले नाही. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
  • १९७८मध्ये त्यांनी ‘आयडीयल रोडवेज बिल्डर्स’ कंपनीची स्थापना केली. पुढे ‘आयआरबी’ ही राज्यातील रस्ते बांधणी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावलौकिकास आली.
  • विश्वासर्हता, चोखपणा, सचोटी, कामातील सातत्य यामुळे ‘आयआरबी’ला अल्पावधीत राज्याच्या विविध भागात शासनाकडून कामे मिळाली.
  • रस्ते बांधणीतील दर्जेदारपणामुळे ‘आयआरबी’ कंपनीला राज्याबाहेरही रस्ते कामे मिळाली.
  • राज्याच्या विविध भागात केलेल्या दर्जेदार रस्ते कामांमुळे म्हैसकर हे रस्ते कामातील एक पायोनीर म्हणून ओळखले गेले.
  • रस्ते बांधणी, बीओटी धोरण आणि टोल ही संकल्पना आयआरबी कंपनीमुळे राज्यात रुजली.
  • २००४मध्ये ९१८ कोटीचा शासनाला धनादेश देणारा पहिला मराठी ठेकेदार म्हणून म्हैसकर ओळखले गेले.
  • त्यांचे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राशी निकटचे संबंध होते. अनेक अडलेल्या, गरजू व्यक्तिंना ते मदत करत.
  • सामाजिक कार्यासाठी त्यांनी म्हैसकर फाऊंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात होते. त्यांच्या निधनाने एक दानशूर व उद्योगी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

पुरुषांना महिलांपेक्षा जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा आईसलँड पहिला देश

  • महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा पुरुषांना जास्त वेतन देणे बेकायदा ठरवणारा आईसलँड हा जगातला पहिला देश ठरला आहे.
  • आईसलँडमध्ये पुरूष आणि महिला यांना समान वेतन देणारा कायदा १ जानेवारी २०१८ पासून अमलात आला.
  • २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाऱ्या कंपन्यांना त्या समान वेतनाचा कायदा पाळतात, असे प्रमाणपत्र सरकारकडून घ्यावे लागेल. हा कायदा मोडल्यास कंपन्यांना जबर दंड भरावा लागेल. 
  • पुरूष आणि महिला यांच्या वेतनातील फरक २०२२पर्यंत दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) या कायद्याची घोषणा केली गेली होती.
  • या नव्या कायद्याला आईसलँडच्या संसदेत सरकारने तर पाठिंबा दिलाच परंतु विरोधकांनीही त्यास पाठींबा दिला. या संसदेत निम्म्या सदस्य महिला आहेत.

ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन

  • ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे ४ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
  • ‘पंचमदा’ म्हणजेच गायक, संगीतकार आर.डी.बर्मन यांच्यासोबत काम केलेल्या उल्हास बापट यांना ‘पंचमदां’चा उजवा हात म्हणूनही संबोधले जायचे.
  • ‘जैत रे जैत’ चित्रपटातील गीतांपासून ते ‘ऋतू हिरवा’ या अल्बममधील गाण्यांसाठीसुद्धा त्यांनी संतूरवादन केले होते.
  • संतूरमधून सुरेख आणि श्रवणीय ध्वनीलहरी निर्माण करण्यावर प्रभुत्व असणाऱ्या बापट यांनी बऱ्याच संगीतकारांसोबत काम केले होते.
  • संतूर वादनामध्ये काही नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचे श्रेय पंडित उल्हास बापट यांना जाते. ‘क्रोमिक स्ट्रक्चर’ प्रकारे संतूर वादन करण्याची सुरुवात त्यांनीच केली होती.

सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित

  • नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे.
  • ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठ व  डो अ‍ॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली आहे.
  • पीएचडीच्या विद्यार्थिनी अ‍ॅमी वॉटसन या संशोधनाच्या सहलेखिका असून, जर्नल नेचर प्लांट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे.
  • नासाच्या प्रयोगात यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात येते. सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात आणि रोपांची वाढ खूप झपाट्याने होते.
  • डीएस फॅरेडे ही जास्त प्रथिने असलेली गव्हाची प्रजाती असून त्यात लवकर अंकुरण होते.
  • या गव्हात काही जनुके समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे ही प्रजाती जास्त ओलसर हवामानातही टिकते.
  • २०५०पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्ज असेल. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात ६० ते ८० टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे.
  • अधिक वेगाने वनस्पतींची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा