नांदेड जिल्हय़ाच्या पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
यावर्षी देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे.
साहसी एजाझने दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही ही बालके सहभागी होणार आहेत.
एजाझ दहावीत शिकत असून लष्करात रुजू होऊन देशाची सेवा कराण्याची त्याची इच्छा आहे.
७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ३ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे.
पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते.
तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
जीएसटी दरात पुन्हा कपात
१८ जानेवारी रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २५व्या बैठकीत ५३ सेवांच्या दरात कपात करण्यात आली असून, हस्तकलेसह २९ वस्तूंवर आता शून्य टक्के कर लावला जाईल.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली जीएसटी परिषदेची बैठक राजधानीत झाली.
आयएनएसव्ही तारिणी केपहॉर्नमध्ये
आयएनएसव्ही तारिणी या बोटीतून समुद्रमार्गाने जगाची परिक्रमा करत असलेल्या भारतीय नौदलातील महिला केपहॉर्नला पोहोचल्या आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून भारतीय नौदलातील सहा महिला या साहसी मोहिमेवर मार्गस्थ झाल्या होत्या.
या प्रवासादरम्यान समुद्रातील कठीण समजला जाणारा मार्ग ‘ड्रेक पॅसेज’ त्यांनी यशस्वीरित्या पार केला.
एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासाचा पहिला टप्पा फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया) होता. त्यानंतर लिटलटन (न्यूझीलँड) हा दुसरा टप्पा त्यांनी डिसेंबर २०१७मध्ये गाठला.
आता पोर्ट स्टॅन्लेनंतर ते केप टाऊनच्या दिशेने रवाना होणार आहेत. नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी करीत आहेत.
सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जागतिक मंचावर ‘नारीशक्ती’चे दर्शन घडविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा