अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान २ गडी राखून पार केले. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली.
भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी फक्त पाकिस्तानने सलग दोन वेळा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.
अमेरिकेत २०१३नंतर पुन्हा शटडाऊनची नामुष्की
सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी मिळू न शकल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारवर शटडाऊनची नामुष्की आली आहे.
शटडाऊन झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे.
निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ मांडले जाते. त्याला अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आणि सिनेट सदस्यांची मंजुरी बंधनकारक असते.
स्टॉप गॅप बिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने मंजूर केले होते. मात्र सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही.
त्यामुळे आता अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू झाला असून, त्याचमुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली आहे.
त्यामुळे सोमवारपासून (२२ जानेवारी) अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत.
शटडाउनचा नागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही. ते कर्मचारी काम करतील मात्र निधीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना पगार दिला जाणार नाही.
मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी म्हणून २०१४ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आनंदीबेन या राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या.
त्याआधी २००२ ते २००७ दरम्यान आनंदीबेन यांनी राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
पाटीदार आरक्षण आंदोलन आणि दलित आंदोलन तीव्र झाल्यानंतर २०१६मध्ये आनंदीबेन यांनी फेसबुकवरून आपला राजीनामा दिला होता.
नव्या पीढीला संधी मिळावी, अशी अपेक्षा असून मला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर भाजपने राज्यात नेतृत्वबदल केला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आनंदीबेन लढल्या नाहीत. आपल्याजागी तरुण कार्यकर्त्याला तिकीट देण्यात यावे, असे त्यांनी पक्षाला सांगितले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा