चालू घडामोडी : ११ जानेवारी

आंचल ठाकूरला आंतरराष्ट्रीय स्किईंग स्पर्धेत कांस्यपदक

  • भारताच्या आंचल ठाकूरने तुर्कीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एल्पाइन एजदर ३२०० स्किईंग स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर स्किईंगमध्ये हे भारताचे पहिलेच पदक असून, आंचलच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच हे शक्य झाले आहे.
  • मनालीची आंचल ठाकूर ‘विंटर गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे महासचिव रोशन ठाकूर यांची कन्या असून, माजी ऑलिम्पिक खेळाडू हिरालाल यांनी तिला प्रशिक्षण दिले आहे.
  • आंचलला या खेळाच्या सरावासाठी ‘इंटरनॅशनल स्किई फेडरेशन’ने (एफआयएस) आर्थिक सहाय्य केले होते.
  • केंद्र सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय तिने या खेळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

स्वाती महाडिक यांना जिजाऊ पुरस्कार

  • जिजाऊ जन्मोत्वानिमित्त दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार हा यावर्षी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला आहे.
  • मराठा सेवा संघाच्यावतीने १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • स्वाती महाडीक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाडा येथे ४१व्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते.
  • त्याच्या अंत्यविधी वेळी त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात जाऊन देश सेवा करण्याचा निर्धार केला होता आणि त्यांनी भारतीय सैन्यात लेप्टनंट म्हणून रूजू होऊन आपला हा निर्धार पूर्ण केला.
  • अशा या देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या कर्तृत्ववान महिला स्वाती महाडिक यांचा आदर करत मराठा सेवा संघाने या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार केला आहे.
  • सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीच्या त्या रहिवाशी आहेत. पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

बर्कशायर हॅथवेच्या उपचसंचालकपदी भारतीय वंशाचे अजित जैन

  • बर्कशायर हॅथवे इंक कंपनीने भारतीय वंशाचे वरिष्ठ अधिकारी अजित जैन यांना इन्शूरन्स ऑपरेशन विभागच्या उपचसंचालकपदी बढती दिली आहे.
  • सध्या कंपनीच्या विमा विभागाचे टॉप एक्झिक्युटीव्ह असलेले अजित जैन हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म ओडिशा येथे झाला आहे.
  • याशिवाय बर्कशायर हॅथवे एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेगरी अॅबेल यांची नॉन इन्शूरन्स बिझनेस ऑपरेशनसाठी उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या दोघांचाही समावेश बर्कशायरच्या संचालक मंडळात करण्यात आला असून, त्यामुळे संचालक मंडळाची संख्या १२ वरून १४ वर पोहोचली आहे.
  • आता हे दोघेही कंपनीची धुरा सांभाळण्यासाठी वॉरेन बफे यांचा उत्तराधिकारी होण्याच्या अगदी निकट पोहोचले आहेत.
  • वित्त सेवा पुरवणारी बर्कशायर हॅथवे ही कंपनी जगातील बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे. बर्कशायर हॅथवेच्या मालकीच्या ९०हून अधिक संस्था आहेत.
  • ८७ वर्षीय वॉरेन बफे या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९६५पासून बफे हे बर्कशायरचे संचालक आहेत.
  • तर गेल्या चार दशकांपासून बफे यांच्यासाठी काम करणारे ९४ वर्षाचे चार्ली मंगर हे कंपनीचे उपसंचालक आहेत. या दोघांच्या हाती कंपनीची सूत्र आहेत.
  • बीएनएसएफ रेलरोड, जिको ऑटो इन्शूरन्स, डेअरी क्वीन आइसक्रीम, सीज कँडिजबरोबर अनेक औद्योगिक आणि रासायनिक उद्योगांमध्ये बर्कशायर हॅथवे कार्यरत आहे.
 अजित जैन यांच्याबद्दल 
  • अजित जैन यांचा जन्म १९५१मध्ये ओडिशात झाला होता. १९७२मध्ये त्यांनी आयआयटी खडगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये बीटेक पदवी मिळवली.
  • १९७३ ते ७६ दरम्यान त्यांनी आयबीएममध्ये सेल्समन म्हणून काम केले. १९७६ मध्ये आयबीएमने भारतातील काम थांबवले. त्यामुळे जैन यांची नोकरी गेली.
  • १९७८मध्ये ते अमेरिकेत गेले आणि हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण करून मँकेजी अँड कंपनीत काम सुरू केले.
  • १९८६मध्ये त्यांनी मँकेजी सोडून वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेमध्येकाम सुरू केले. अजित जैन सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात.

भारतात जाणाऱ्यापर्यटकांना अमेरिकेचा काळजी घेण्याचा सल्ला

  • अमेरिकेने भारतात जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनावलीमध्ये (अॅडव्हायजरी) भारताला दुसऱ्या स्तरावर तर पाकिस्तानला तिसऱ्या स्तरावर ठेवण्यात आले आहे.
  • अमेरिकेत स्तराच्या आधारे अन्य देशांना सुरक्षिततेसंदर्भाचे अनुमान लावले जातात व यावरुन अमेरिकी नागरिकांना त्यावर सतर्क केले जाते.
 या अॅडव्हायजरीमधील अमेरिकी नागरिकांसाठीच्या सूचना: 
  • दहशतवादी कारवाया आणि काश्मिरी लोकांचा उद्रेक पाहता जम्मू काश्मीरला (लेह-लडाख वगळता) भेट देणे टाळावे.
  • भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किलोमीटर परिसरात सातत्याने लष्करी कारवाया होत आहेत, तिथून प्रवास टाळावा.
  • महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी
  • भारतात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे महिलांनी अधिक काळजी घ्यावी
  • अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या सात राज्यांमध्ये जाण्याची परवानगी नाही.
 पर्यटकांसाठी सुरक्षा स्तर 
  • पहिला स्तर : या पातळीमध्ये जर एखाद्या देशाचा समावेश असले तर पर्यटक नियमीत काळजी घेऊन प्रवास करू शकतात.
  • दुसरा स्तर : या गटातील देशात प्रवास करु शकता पण थोडी अधिक काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. उदा- भारत
  • तिसरा स्तर : या गटातील देशांमध्ये अतिशय महत्त्वाचे किंवा आणिबाणीचे काम असेल तरच जा असा सल्ला दिला जातो.कारण या देशात गेल्यास जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. उदा- पाकिस्तान
  • चौथा स्तर : या गटातील देश पर्यटानासाठी अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे अशा देशांमध्ये प्रवास करू नये. उदा- अफगाणिस्तान

ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींचा समावेश

  • ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या मूळ भारतीय वंशाचे असलेल्या दोन खासदारांचा पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
  • इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक तसेच सुएला फर्नांडिस अशी या दोन खासदारांची नावे आहेत.
  • ऋषी सुनक व सुएला फर्नांडिंस भारतीय वंशाचे असले तरी दोघांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. सुएला या मूळ गोव्याच्या रहिवासी आहेत.
  • ऋषी सुनक हे २०१५साली पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षामध्ये त्यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
  • त्यांचे ऑक्सफर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण झाले आहे. सुनक हे ब्रेक्झिटचे कट्टर समर्थक आहेत.
  • गृहनिर्माण, स्थानिक स्वराज्य संस्था या खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिले आहे.
  • ब्रेक्झिेटशी संबंधित खात्याचे मंत्रीपद सुएला फर्नांडिस यांना देण्यात आले आहे. ब्रेक्झिटचा फर्नांडिस यांनी धडाडीने प्रचार केला होता.
  • याशिवाय मूळ भारतीय वंशाचे आलोक शर्मा यांच्याकडे याआधी गृहनिर्माण खाते होते. त्यांना आता मंत्रिमंडळ फेरबदलात रोजगार खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा