चालू घडामोडी : १ जानेवारी

विदर्भाला पहिले रणजी करंडक विजेतेपद

 • इंदूरच्या होळकर मैदानावर सुरु असलेल्या रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने दिल्लीचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी चषकावर नाव कोरले.
 • आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रणजी सामन्याची अंतिम फेरी गाठणाऱ्या विदर्भाने सांघिक खेळाच्या बळावर दिल्लीचा ९ गडी राखून पराभव केला.
 • विदर्भाने दिल्लीला पहिल्या डावात २९५ आणि दुसऱ्या डावात २८० धावात रोखलं. तर विदर्भाने पहिल्या डावात ५४७ धावांचा डोंगर उभा केला होता.
 • दुसऱ्या डावात विदर्भासमोर विजयासाठी २९ धावांचे आव्हान होते. चौथ्या दिवसाअखेर विदर्भाने एका गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष पार केले.
 • विदर्भाने उपांत्य सामन्यात ८ वेळा रणजी करंडक विजेत्या कर्नाटकचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
 • तर अंतिम फेरीत ७ वेळा रणजी करंडकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या दिल्लीला पराभूत करत आपले पहिले रणजी विजेतेपद पटकावले.
 • ही मानाची स्पर्धा जिंकणारा विदर्भ हा १७वा संघ ठरला. सामन्यात हॅट्ट्रिकसह ८ बळी टिपणारा रजनीश गुरबाणी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
 • याआधी विदर्भाने २००२-०३ आणि २०११-१२ या सत्रात दोनदा उपांत्य फेरी तर १९७०-७१ तसेच १९९५-९६ या सत्रात दोनदा उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

परराष्ट्र सचिवपदी विजय केशव गोखले यांची नियुक्ती

 • केंद्र सरकारने विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली आहे. जानेवारी २०२०पर्यंत (२ वर्षे) ते परराष्ट्र सचिवपदाचा पदभार सांभाळतील.
 • सध्याचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांचा २८ जानेवारीला कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी विजय गोखलेंना बढती देण्यात आली आहे.
 • गोखले हे १९८१च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी चीन, जर्मनी आणि मलेशिया या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.
 • परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी डायरेक्टर (चायना अँड इस्ट एशिया) आणि जाँइंट सेक्रेटरी (ईस्ट एशिया) या पदांवर काम केले आहे.
 • गोखले सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) पदावर कार्यरत आहेत. ते मँडारिन भाषेत उत्तम संवाद साधू शकतात.
 • त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताला चीनविषयक समस्या सोडवण्यास आणि पूर्व आशियाई देशांशी संबंध अधिक दृढ करण्यास मदत होणार आहे.

‘जस्ट वन मोअर डे’ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान

 • लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘जस्ट वन मोअर डे’ या चित्रपटाने स्थान मिळविले आहे.
 • अमेरीकेतील भारतीय वंशाचे हौशी चित्रपट निर्माते पुनम आणि आशिष सहस्त्रबुध्दे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळविले आहेत.
 • या चित्रपटातील निक या भूमिकेसाठी नऊ वर्षीय रिषीला लॉस एंजलिस चित्रपट महोत्सवात बेस्ट यंग अॅक्टरचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
 • या चित्रपटात एका लष्करी कुटूंबाची कथा सांगितली आहे. या कुटूंबाच्या आयुष्यातील भावनिक रोलर कोस्टरवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.
 • आशिष सहस्त्रबुध्दे यांनी चार दिवस सासुचे आणि समांतर (ईटिव्ही मराठी), दामिनी (दुरदर्शन), यह दिल क्या करे (झीटिव्ही), अफलातून (सब टिव्ही) या टिव्ही मालिकांसाठी काम केले आहे.

1 टिप्पणी:

 1. magil mahinyatil chalu ghadamodi vachtana tya shevati pasun te survati paryant dakhavalya jatat.
  krupaya vachatana soeskar tharel asha padhatine dakhavave
  example- january 1 t0 31

  उत्तर द्याहटवा