केरळमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण व्यवस्थापक डॉ. एम व्ही पैली यांचे वयाच्या ९८व्या वर्षी ३० डिसेंबर रोजी निधन झाले.
त्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली होते. ५ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांचा जन्म पुलिकुन्नू या बेटवजा गावात झाला.
लखनऊ विद्यापीठातून त्यांनी कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हावर्ड विद्यापीठाची एलएलएम ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली.
त्यांनी १९६२मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले.
राज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
कायदा आणि व्यवस्थापन यांचे जाणकार असलेल्या पैली यांनी लखनऊ, पाटणा, दिल्ली येथे प्राध्यापकी केली.
त्यांच्या आग्रहामुळे कोचीनमधील ‘क्युसॅट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठात केरळमधील पहिला व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू झाला.
‘क्युसॅट’मधून निवृत्तीनंतर ते कोचीमधील ‘आशियाई विकास व उद्योजकता संस्थे’च्या प्रमुखपदी राहिले.
देशभरच्या शिक्षण क्षेत्राची नेमकी नस ओळखून, गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्युसॅट’मार्फत त्यांनी ‘एम व्ही पैली पुरस्कार’ सुरू करविला. रोख १ लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
देशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००६साली ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
भीमा-कोरेगावमध्ये दगडफेक आणि हिंसाचार
पुणे-अहमदनगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला.
वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले होते.
ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते.
यावेळी रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले. या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेचे पडसाद २ जानेवारी रोजी राज्याच्या अन्य भागांमध्ये उमटले.
अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणारी २५५ दशलक्ष डॉलरची मदत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखली आहे.
दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या सहकार्यावरच आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अमेरिकेने पाकला ठणकावले आहे.
पाकिस्तान व अमेरिकेचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असून पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याने अमेरिका पाकवर नाराज आहे.
जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील ९/११ हल्ल्यांचा सूत्रधार हाफिद सईद याला पाकने नजरकैदेतून मुक्त केले होते.
यानंतर सईदने राजकीय पक्ष सुरु करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला हा दणका दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा