चालू घडामोडी : ३ जानेवारी
निवडणूक बाँड
- निवडणुकीतील काळ्या पैशाच्या वापराला लगाम घालण्यासाठी निवडणूक बाँडची नवीन संकल्पना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडली आहे.
- सध्याच्या घडीला बऱ्याचशा राजकीय पक्षांना देणग्या अज्ञात व्यक्तींकडून रोख रकमेच्या स्वरूपात दिल्या जातात. याला पर्याय म्हणून या बाँडची संकल्पना मांडण्यात आले आहे.
- बाँडच्या स्वरूपात देणगी देताना देणगीदार बँकेच्या मध्यस्थीने देणगी देऊ शकतील.
- राजकीय पक्षांना देणगी देण्यास इच्छुक असलेल्यांना स्टेट बँकेतून या बाँडची खरेदी करता येईल आणि विशिष्ट बँक खात्यांमध्येच हे बाँड वटवता येतील.
- जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या प्रत्येक महिन्यात १० दिवसांसाठी हे बाँड स्टेट बँकेच्या काही ठरावीक शाखांमध्ये उपलब्ध असतील.
- हे बाँड १५ दिवसांसाठी वैध असतील. त्यावर देणगीदाराचे नाव नसेल, मात्र देणगीदाराला बँकेत आपले ‘केवायसी’ तपशील सादर करावे लागतील.
- जरी याला बाँड म्हटले गेले असले, तरी प्रॉमिसरी नोटसारखे स्वरूप असलेल्या या बाँडवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. याची रक्कम राजकीय पक्षाला मिळेपर्यंत देणगीदाराचा निधी बँकेच्या ताब्यात असेल.
- २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय भाषणात १ फेब्रुवारी २०१७ रोजी जेटली यांनी निवडणूक बाँडची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती.
अॅड. मधुकर किंमतकर यांचे निधन
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य अॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
- त्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- रामटेकमध्ये १० ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या मधुकरराव किंमतकर यांचे प्राथमिक शिक्षण रामटेकला झाले.
- १९५५मध्ये पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. नरेंद्र तिडके यांच्या आग्रहास्तव मॉडेल मिल कामगार चळवळीत सहभागी झाले.
- त्यांनी १९५८मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली.
- महाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सेवादलात सहभागी झाले होते. १९८०मध्ये त्यांनी काँग्रेसकडून रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.
- १९८२मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे वित्त, नियोजन कामगार, विधि व न्याय या विभागाचा कार्यभार होता.
- राजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीपासूनच विदर्भाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले होते. सरकार या भागाकडे लक्ष देत नसल्याची त्यांची धारणा होती.
- १९८५च्या विधानसभा निवणुकीत ते पराभूत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांची राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. १९९०पर्यंत या पदावर कार्यरत होते.
- १९९२मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९२ ते ९८ या काळात विधान परिषद सदस्य होते.
- १९९४ मध्ये राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ते या मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून काम करीत होते.
- अलीकडेच त्यांना रामटेक भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
चित्ता हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता
- हवामानातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि चित्ता हा नामशेष होण्याची भिती एका संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे.
- नॅशनल जिओग्राफीच्या बीग कॅट इनिशिएटीव्ह उपक्रमाअंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे.
- नॅशनल जिओग्राफीने चित्ता हा प्राणी नामशेष होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
- इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर या संघटनेही आधीच चित्ता या प्रजातीचा ‘असुरक्षित’ प्राण्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
- पुढील पंधरा वर्षांमध्ये चित्त्यांची संख्या ५३ टक्क्यांनी कमी होण्याची भिती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
- या संशोधनामध्ये नामिबीया, बोसवाना, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे असा सर्वात मोठा जंगली प्रदेश असणाऱ्या देशांमध्येही एकूण ३५७७ चित्तेच जिवंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- चित्त्यांच्या नैसर्गिक आधिवास असणाऱ्या जागेपैकी ९० टक्क्यांहून अधिक जागेत मानवाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळेच चित्ता आणि माणसांचा संघर्ष वाढत आहे.
- संशोधकांच्या मते जगभरातील जंगलांमध्ये केवळ ७ हजार १०० चित्ते उरले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा