केंद्र सरकारकडून २९ जानेवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडला.
या अहवालानुसार आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असे अनुमान वर्तवण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.
तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
१ फेब्रुवारीला अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत भारताची तिसऱ्या स्थानी
सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत गेल्यावर्षी पहिल्या स्थानी असलेल्या भारताची यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
भारताचा विचार केला तर प्रसारमाध्यमे, उद्योग व अशासकीय संस्था यावरील लोकांचा विश्वास २०१७च्या तुलनेत घटला आहे.
अर्थात, विश्वास घटला असला तरी अद्याप विश्वसनीय गटातून बाहेर फेकले जाण्याएवढी घट नसल्याने भारत तिसऱ्या स्थानी राहू शकला आहे.
जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतरही केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास ढळलेला नसल्याचे हा निर्देशांक सांगत आहे.
एडलमन या संपर्कक्षेत्रातल्या कंपनीकडून गेदरवर्षी दावोस येथून ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स जाहीर करण्यात येतो. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
उद्योग व्यवसायस अशासकीय संस्था व प्रसारमाध्यमे यांच्याकडे जनता कुठल्या नजरेने बघते या निकषावरही भारत विश्वसनीय या कसोटीस उतरला आहे.
या निर्देशांकानुसार सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत पहिल्या दोन स्थानांवर चीन व इंडोनेशिया हे देश आहेत.
चीन २०१७ मध्ये ६७ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. यावर्षी चीनने ७ गुणांची कमाई करत ७४ गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
भारत गेल्या वर्षी ७२ गुणांसह पहिल्या स्थानी होता. मात्र, यावर्षी चार गुणांनी घट झाली असून ६८ गुणांसह भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये अमेरिकेला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले असून, अमेरिकेच्या रँकिंगमध्ये नऊ गुणांची घट झाली आहे.
कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे निधन
देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असलेले कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे २७ जानेवारी रोजी निधन झाले.
कृषी क्षेत्रातील सर्व प्रश्नांची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यावर त्यांनी उपायही सुचवले होते.
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे त्यांचा जन्म झाला. सध्या पाकिस्तानात असलेल्या लायलपूर येथील पंजाब कृषी विद्यापीठातून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली.
त्यानंतर कृषी क्षेत्रात स्नातकोत्तर पदवी घेऊन ते रॉकफेलर फेलोशिपवर अमेरिकेत गेले. तेथे ओहिओ स्टेट विद्यापीठातून त्यांनी कृषीशास्त्रात पीएचडी केली.
मेक्सिकन गव्हाच्या प्रजातीचे बियाणे भारतात आणून १९६०च्या मध्यावधीत हरितक्रांती घडवण्यात आली त्यात त्यांचाही सहभाग होता.
नोबेल विजेते नॉर्मन बोरलॉग व डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. पंजाबमधील कृषी संशोधनास वेगळी दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे माजी अध्यक्ष, पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त ही पदे त्यांनी भूषवली होती.
इंदिरा गांधी यांच्या काळात ते देशाचे कृषी आयुक्त होते. जागतिक बँकेत त्यांनी दहा वर्षे कृषितज्ज्ञ म्हणून काम केले होते.
जागतिक बँकेच्या श्रीलंका, नेपाळ व इंडोनेशिया देशांसाठीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यांनी केली.
त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांच्या पद्मश्री व पद्मभूषण या नागरी सन्मानांनी त्यांचा गौरव केला.
परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले
डोकलाम प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय गोखले यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार २९ जानेवारी रोजी स्वीकारला.
एस जयशंकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुढील २ वर्षांसाठी गोखले हा पदभार सांभाळतील.
विजय गोखले हे १९८१च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले आहे.
यापूर्वी त्यांनी परराष्ट्र खात्यात उपसचिव (अर्थ), संचालक (चीन व पूर्व आशिया, सहसचिव (पूर्व आशिया) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत त्यांनी मलेशियात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे.
तर ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ या कालावधीत ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. तसेच त्यांनी हाँगकाँग, बीजिंग आणि न्यूयॉर्कमध्ये काम केले आहे.
जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात ते चीनमध्ये भारताचे राजदूत होते. चिनी भाषा व तेथील राजनैतिक व्यवहारांची त्यांना माहिती आहे.
पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांसोबत भारताचे असलेले तणावपूर्ण संबंध हे त्यांच्यासमोरील आव्हान असेल.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान हा दौरा देखील गोखले यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे यांनी देशाचे परराष्ट्र सचिवपद सांभाळले आहे.
इन्डोनेशियन मास्टर्स स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपद
इन्डोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या ताय झ्यू यिंगने पराभूत केले.
जेतेपदाच्या लढतीत ताय झ्यू हिने सायना नेहवालचा अवघ्या २७ मिनिटांत २१-९, २१-१३ अशी मात केली.
पायाच्या दुखापतीतून सावरलेली सायना जवळपास वर्षभरानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती.
१२व्या क्रमांकावर असलेल्या सायनाला ताय झ्यू यिंग हिने गेल्या १० लढतींमध्ये ९ वेळा नमविले आहे.
२०११मध्ये सायनाने तैवानच्या या खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये सायनाने तायविरुद्ध स्वीस ओपनमध्ये विजय नोंदविला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा