चालू घडामोडी : १२ जानेवारी

सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर न्यायमुर्तींकडून ताशेरे

 • आतापर्यंत जपल्या गेलेल्या न्यायालयीन शिष्टाचाराच्या चौकटीला छेद देत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तीनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले.
 • सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
 • सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला.
 • या प्रकरणी सरन्यायाधिशांना दोन महिन्यांपूर्वी एक पत्रही पाठवले होते असे सांगत चेलमेश्वर यांनी ते पत्र सार्वजनिक केले.
 • पण या पत्राला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे २ महिन्यांच्या घटनाक्रमानंतर त्यांना माध्यमांसमोर येणे गरजेचे वाटले.
 • त्यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच गेल्या काही दिवसांत त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांनी दिलेल्या निर्णयांवर गंभीर आक्षेप घेतले.
 • ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही, तर न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य आणि पर्यायाने लोकशाही धोक्यात येईल, असा गंभीर इशारा देत, या न्यायाधीशांनी यासंबंधी काय करावे, याचा निर्णय जनतेच्या न्यायालयाकडे सोपविला.
 या ऐतिहासिक घटनेमागील कारणे 
 • गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
 • तसेच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.
 • या चौघांपेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिले जात होते, याबाबत चौघांनीही नाराजी व्यक्त केली होती, असेही सांगितले जात आहे.
 सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातील काही ठळक मुद्दे 
 • सर्वोच्च न्यायालयानेकाढलेल्या काही आदेशांमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे.
 • मुख्य न्यायमूर्ती हे इतर न्यायमूर्तींपेक्षा वर किंवा खाली नसतात. ते केवळ समकक्षांमधले पहिले असतात.
 • कोणता खटला कोणत्या खंडपीठापुढे यावा, हे ठरवण्याचे नियम आहेत. या नियमांचेपालन न करता अलीकडे काही महत्त्वाचे खटले मर्जीतील विशिष्ट न्यायमूर्तींना देण्यात येत आहेत.
 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याबद्दल 
 • न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५वे सरन्यायाधीश असून, २८ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
 • त्यापूर्वी १० ऑक्टोबर २०११ ते २७ ऑगस्ट २०१७ पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 • ते डिसेंबर २००९ ते मे २०१० पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तर २४ मे २०१० ते १० ऑक्टोबर २०११ पर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
 त्या चार वरिष्ठ न्यायाधीशांबद्दल 
जस्टिस जस्ती चेलमेश्वर
 • आंध्र प्रदेशात २३ जून १९५३ रोजी जन्मलेले जस्टिस चेलमेश्वर १९९७मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले.
 • २००७मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१०मध्ये ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
 • त्यानंतर ऑक्टोबर २०११पासून त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.
 • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते असून, आधार नसलेल्यांना सरकारी सेवांपासून वंचित ठेवता येत नाही, असा निकाल त्यांनी दिला होता.
 • चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते जून २०१८मध्ये निवृत्त होतील.
जस्टिस रंजन गोगोई
 • मूळ आसामचे असलेल्या रंजन गोगोई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. त्यांचे वडील के सी गोगोई हे आसामचे मुख्यमंत्री होते.
 • २००१मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे.
 • २३ एप्रिल २०१२पासून गोगोई सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.
 • नोव्हेंबर २०१८मध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा निवृत्त झाल्यावर ती जबाबदारी ज्येष्ठतेप्रमाणे गोगोई यांच्याकडे येणे अपेक्षित आहे.
जस्टिस मदन भीमराव लोकूर
 • न्या. मदन लोकूर यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५३ रोजी झाला. दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर लोकूर यांनी १९७७साली दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
 • त्यांनी गुवाहाटी आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
 • सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि रेवेन्यू आणि सर्व्हिस लॉ विषयांमध्ये लोकूर तज्ज्ञ आहेत.
 • डिसेंबर १९९० ते १९९६ या काळात त्यांनी केंद्र सरकारचे अधिवक्ता म्हणून काम केले आहे तसेच अनेक खटल्यांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.
 • तर ४ जून २०१२ रोजी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
जस्टिस कुरियन जोसेफ
 • कुरियन जोसेफ यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९५३ रोजी केरळमध्ये झाला. १९७९साली त्यांनी केरळ उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
 • केरळ उच्च न्यायालयात कुरियन जोसेफ यांनी दोनवेळा मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
 • २०१३ मध्ये त्यांना हिमाचाल प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले.
 • तर ८ मार्च २०१३ ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी ते निवृत्त होतील.

शास्त्रज्ञ के सिवन इस्त्रोच्या चेअरमनपदी नियुक्त

 • प्रसिद्ध शास्त्रज्ञ के सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
 • ते ए एस किरण कुमार यांची जागा घेतील. २ जानेवारी २०१५ रोजी कुमार यांची इस्त्रोच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती.
 • सिवन यांनी १९८०मध्ये मद्रास इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती.
 • त्यानंतर १९८२साली त्यांनी बंगळुरूमधील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनियरिंगमधून पदव्युत्तर पदवी मिळवली होती.
 • २००६साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून त्यांनी एअरोस्पेर इंजिनियरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली होती.
 • सिवन यांनी १९८२साली इस्रोमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पावर काम केलेले आहे.
 • तसेच त्यांनी एंड टू एंड मिशन प्लानिंग, मिशन डिझाइन, मिशन इंटिग्रेशन आणि अॅनॅलिसिस यामध्ये विपूल योगदान दिले आहे.
 • सिवन हे सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

इस्त्रोचे ऐतिहासिक १००वे उपग्रह प्रक्षेपण

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) १२ जानेवारी रोजी पीएसएलव्ही सी- ४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात पाठवत नवा इतिहास रचला.
 • श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे इस्त्रोचे ऐतिहासिक १००वे उपग्रह प्रक्षेपण होते.
 • ३१ उपग्रहांमध्ये यात भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. त्यात भारताच्या हवामान बदल टिपणाऱ्या ‘कार्टोसॅट-२’ या उपग्रहाचाही समावेश आहे.
 • याबरोबरच अमेरिकेचे सर्वाधिक १९, दक्षिण कोरियाचे ५ आणि कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी १ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.
 • कार्टोसॅट-२ हा उपग्रह ७१० किलोग्रॅमचा असून तो भारताचा ‘अवकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे.
 • आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्याचे महत्त्वाचे कामही हा उपग्रह करणार आहे.
 • इस्रोने १९९९पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.
 • फेब्रुवारी २०१७मध्ये इस्रोने एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा एकाचवेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम मोडीत काढला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा