इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांचे स्वागत केले.
भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान नेतन्याहू दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
यापूर्वी २००३मध्ये एनडीए सरकारच्या काळात इस्रायचे तत्कालिन पंतप्रधान एरियल शेरॉन भारत भेटीवर आले होते.
जागतिक उत्पादन निर्देशांकात भारताला ३०वे स्थान
जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) १०० देशांच्या यादीत भारताला ३०वे स्थान दिले आहे.
जागतिक आर्थिक मंचाने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल (रेडिनेस फॉर द फ्यूचर ऑफ प्रॉडक्शन रिपोर्ट) जाहीर केला असून त्यात जपानचा पहिला क्रमांक आहे.
त्यानंतर दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश अनुक्रमे पहिल्या १० स्थानी आहेत.
ब्रिक्स देशांमध्ये चीन ५, रशिया ३५, ब्राझील ४१, दक्षिण आफ्रिका ४५व्या क्रमांकावर आहे. भारताचा ३०वा क्रमांक लागला आहे.
या अहवालातील स्थान ठरवताना औद्योगिक धोरण, सामूहिक कृती हे निकष लावण्यात आले आहेत.
या शंभर देशांचे ४ गटात वर्गीकरण केले आहे. त्यात अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, वारसा आणि नव क्षमताधारी यांचा समावेश आहे.
यामध्ये भारत हंगेरी, मेक्सिको, फिलीपीन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांच्यासमवेत वारसा गटात आहे.
तर चीन हा अग्रमानांकित देशात असून ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे नवोदित देशात समाविष्ट आहेत. अग्रमानांकित पंचवीस देशांची उत्पादन क्षेत्रातील स्थिती भक्कम आहे.
भारत हा जगातील ५वा मोठा उत्पादनक्षम देश असून त्याचे उत्पादन मूल्य २०१६मध्ये ४२० अब्ज डॉलर्स होते.
भारताचे उत्पादन क्षेत्र तीन दशकात ७ टक्क्यांनी वाढले असून त्यामुळे देशांतर्गत उत्पन्नात १६ ते २० टक्के भर पडली आहे. मानवी भांडवल व शाश्वत साधने ही भारतासाठी दोन महत्त्वाती क्षेत्रे आहेत.
बाजारपेठ आकारात भारत ३रा असून महिला सहभाग, व्यापार कर, नियामक क्षमता, शाश्वत साधने यात ९०वा आहे.
उत्पादनाच्या प्रमाणात भारत ९वा तर गुंतागुंतीत ४८वा आहे. भारताचे स्थान श्रीलंका (६६), पाकिस्तान (७४), बांगलादेश (८०) यांच्यापेक्षा चांगले आहे.
चौथ्या औद्योगिक क्रांतीस अनुकूलतेत अमेरिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड, ब्रिटन, नेदरलँड हे पहिल्या ५ व चीन २५वा तर भारत ४४वा आहे.
१५ जानेवारी : भारतीय सैन्य दिन
१५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिनानिमित्त देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील अमर जवान ज्योति येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत, नौदलाचे प्रमुख सुनील लांबा आणि हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती.
या ऐतिहासिक क्षणानिमित्त भारतीय सेनेकडून दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा