चालू घडामोडी : २८ जानेवारी

रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियन ओपनचे विक्रमी विजेतेपद

  • स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मारिन सिलिचला ६-२, ६-७, ६-३, ३-६ आणि ६-१ असे नमवत पुरुष एकेरीच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदावर आपले नाव कोरले.
  • रॉजर फेडररचे हे ऑस्ट्रेलियन ओपनचे सलग दुसरे आणि एकूण सहावे विजेतेपद आहे. गेल्यावर्षीही फेडररने सिलिचला हरवूनच हे विजेतेपद जिंकले होते.
  • रॉजर फेडररचे टेनिस करिअरमधले २०वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. त्यामुळे पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू फेडरर ठरला आहे.
  • याबरोबरच त्याने सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा रॉय एमर्सन यांच्या ६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरीही केली.
  • स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्रोएशियाचा सिलिच हे दोघेही आत्तापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत.
  • यापैकी ९ वेळा रॉजर फेडरर तर एकदा सिलिच विजयी झाला आहे. सिलिचने २०१४ मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता.
  • ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात धडक देण्याची फेडररची ही ३०वी वेळ होती. त्याच्या नावावर आता ऑस्ट्रेलियन ओपनची ६, विम्बल्डनची ८, फ्रेंच ओपनचे १ आणि अमेरिकन ओपनची ५ विजेतेपदं आहेत.
  • आतापर्यंत तीन महिला टेनिसपटूंनी एकेरीची २० हून अधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावण्याची किमया केली आहे.
  • मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर सर्वाधिक २४ जेतेपदं असून सेरेना विल्यम्सने २३, तर स्टेफी ग्राफनं २२ ग्रँडस्लॅम ट्रॉफींवर नाव कोरले आहे. या क्लबमध्ये रॉजर फेडररच्या रूपाने पुरुष टेनिसपटूने प्रवेश केला आहे.
  • सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे ५ खेळाडू
    • रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) : २०
    • राफेल नदाल (स्पेन) : १५
    • पीट सँप्रस (अमेरिका) : १४
    • रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया) : १२
    • नोवाक जोकोविच (सर्बिया) : १२
  • सर्वाधिक ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे खेळाडू
    • रॉजर फेडरर ( स्वित्झर्लंड) : ६
    • रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया) : ६
    • नोवाक जोकोविच (सर्बिया) : ६
    • जॅक क्रॉफोर्ड (ऑस्ट्रेलिया) : ४
    • आंद्रे अगासी (अमेरिका) : ४
    • केन रॉसवेल (ऑस्ट्रेलिया) : ४

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला.
  • प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी साकारला होता.
  • चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होती.
  • मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते.
  • याशिवाय आभूषण देणारा दरबारी, गागाभट्ट, या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवण्यात आले होते.
  • दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे तर मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.
  • यावेळी संचलनात राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ सादर झाले होते.
  • प्रथम क्रमांक पटकावण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. १९९२ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता.
  • २०१५मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. आता २ वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला.
  • गेल्या वर्षी लोकमान्य टिळक यांच्यावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला होता.

गुरु सिद्धेश्वर स्वामी यांनी पद्मश्री नाकारला

  • कर्नाटकातील विजयपूर येथील ‘ज्ञान योगाश्रम’चे आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झालेला यंदाचा ‘पद्मश्री’ किताब त्यांनी नाकारला आहे.
  • आपण सन्यासी असल्याने असल्याने पुरस्कारांमध्ये मला स्वारस्य नाही, त्यामुळे हा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
  • २०१५मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. आपल्याला हा पुरस्कार खूपच उशीरा देण्यात आला असे त्यांनी म्हटले होते.

दिव्यांगाना केंद्राचे चार टक्के आरक्षण

  • आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम), मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता आणि अ‍ॅसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
  • ‘अ’,‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील थेट भरतीच्या पदांपैकी ४ टक्के जागा विवक्षित प्रमाणात अपंगत्व (बेंचमार्क डिसेबिलिटी) असलेल्या दिव्यांगांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत.
  • ठराविक प्रकारच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्वास ‘बेंचमार्क डिसेबिलिटी’ म्हटले जाते.
  • केंद्र सरकारच्या सर्व खात्यांमध्ये अंध व अधूदृष्टी, कर्णबधीर, सेलेब्रल पाल्सीसह अवयव व्यंगता असलेले, स्नायूंचा शक्तीपात झालेले, खुजेपणाने उंची खुंटलेले आणि अ‍ॅसिडहल्ल्याने बाधीत झालेले अशा लोकांसाठी प्रत्येकी एक टक्का जागा राखून ठेवण्यात येणार आहेत.
  • तसेच ऑटिझम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षणात मंद असलेले व मनोरुग्ण यांच्यासाठीही हे १ टक्का आरक्षण लागू असेल.
  • याआधी सन २००५मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण होते. २०१६साली नवा दिव्यांग हक्क कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे.
  • दिव्यांगासाठी असलेल्या राखीव जागांवर फक्त याच प्रवर्गातील व्यक्ती नेमल्या जाव्यात आणि त्या जागा रिकाम्या असतील तर त्यावर अनुसुचित जाती व जमातींच्या व्यक्तींची नेमणूक न करण्याची तरतूदही नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा