बलुचिस्तानमध्येही ‘मन की बात’
- ऑल इंडिया रेडिओवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम बलूच भाषेत प्रसारित करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
- त्यामुळे मोदींची ‘मन की बात’ आता लवकरच बलुचिस्तानमध्येही ऐकायला मिळणार आहे.
- यामुळे रेडिओच्या माध्यमातून बलुचिस्तानचा आवाज बुलंद होण्यास हातभार लागणार आहे.
- या निर्णयामुळे बलुचिस्तानमधील जनतेला ठाम मते मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
- स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या भूमिकेला बलूच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
- पाकिस्तानकडून बलुच नागरिकांवर होणाऱ्या अनन्वीत अत्याचाराचा मुद्दा पंतप्रधान नरेद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर लावून धरावा, अशी मागणी तेथील नेते व नागरीकांनी केली आहे.
- जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारताला कोंडीत पकडण्याची रणनीती आखलेल्या पाकिस्तानला भारताने बलुच प्रकरणाला वाचा फोडून कडवे प्रत्युत्तर दिले आहे.
सिंगूरमधील भूसंपादन बेकायदेशीर
- पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील टाटा नॅनो प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले आहे.
- पश्चिम बंगाल सरकारने १२ आठवड्यांमध्ये जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना परत करावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
- टाटा मोटर्सला सिंगूरमध्ये नॅनो गाड्यांचा प्रकल्प सुरु करण्यासाठी हजारो एकरची जमीन देण्यात आली होती.
- मात्र प्रकल्पासाठी राबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रीया बेकायदेशीर पद्धतीने राबवल्याचा आरोप करत शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती.
- कोलकाता हायकोर्टाने २००८मध्ये भूसंपादन प्रक्रियेला वैध ठरवले होते. या निर्णयाला शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
- सरकारने प्रकल्पासाठी केलेले भूसंपादन हे घाईगडबडीत आणि नियम धाब्यावर बसवून करण्यात आले असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले होते.
- गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांना मिळालेली भरपाईदेखील त्यांना सरकारला परत करण्याची गरज नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुवर्ण रोखे योजनेचा पाचवा टप्पा
- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण रोखे योजनेचा पाचवा टप्पा एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
- गोल्ड बाँडच्या माध्यमातून केंद्र सरकार गुंतवणूकदारांना धातूच्या खरेदीपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
- केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार बाँडसाठी १ सप्टेंबर २०१६ ते ९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
- या बाँडची विक्री सार्वजनिक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालये, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
- गोल्ड बाँड योजनेला अधिक आकर्षक बनविण्यासाठी केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यात बऱ्याच उपाययोजना केल्या.
- त्याअंतर्गत बाँडमध्ये गुंतवणुकीची किमान मर्यादा २ ग्रॅमवरून १ ग्रॅमवर आणण्यात आली.
- कोणीही व्यक्ती अथवा संस्था एका आर्थिक वर्षात ५०० ग्रॅमपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकणार नाही.
- सुरुवातीच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. दर सहा महिन्यांनी व्याज देण्यात येणार आहे.
- गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोल्ड बाँड योजना जाहीर करण्यात आली होती.
‘टीजेएसबी’ला यूपीआयचा वापर करण्याची अनुमती
- सहकार क्षेत्रातील अग्रणी ठाणे जनता सहकारी बँकेला (टीजेएसबी) भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा (यूपीआय) वापर करण्याची अनुमती दिली आहे.
- अशी मान्यता मिळवणारी ‘टीजेएसबी’ देशातील पहिली बँक आणि एकमेव सहकारी बँक ठरली आहे.
- यूपीआय प्रणालीसाठी टीजेएसबी बँकेने विकसित केलेले ‘ट्रान्सझॅप’ हे अॅप हे कार्यान्वित झाले आहे.
- यातून बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. पन्नास हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार कॅशलेस होणार आहेत.
- या सर्व प्रणालीत सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. हे अॅप गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
- यासाठी टीजेएसबी बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. ट्रान्सझॅप अॅप डाऊनलोड करणाऱ्या सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.
‘आप’ सरकारच्या निर्णयांच्या तपासणीसाठी समिती
- आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने दिल्लीत घेतलेले अनियमित व तकलादू निर्णय शोधण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केली.
- या समितीत माजी महालेखापाल व्ही. के. शुंगलू, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी आणि माजी दक्षता आयुक्त प्रदीप कुमार यांचा समावेश आहे.
- दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे प्रशासकीय प्रमुख नायब राज्यपाल नजीब जंग असल्याचा निर्णय नुकताच दिला आहे. ‘आप’ सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात अधिकारांचा वाद सुरू होता.
- ‘आप’ सरकारच्या निर्णयातील त्रुटी, अनियमितता तपासण्यासाठी दिल्ली शहरातील विविध विभागांनी जंग यांच्याकडे फायली सादर केल्या आहेत.
- या फायलींची तपासणी समिती करेल. समितीने अहवाल सादर केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
बराक ओबामा अखेरचा आशिया दौरा
- जागतिक तापमानवाढ, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आशियाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पुढील आठवड्यात आशियामध्ये येणार आहेत.
- त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील हा अखेरचा आशिया दौरा असेल.
- एका आठवड्याच्या या दौऱ्यादरम्यान ओबामा चीन आणि लाओसला भेट देणार आहेत. लाओसला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरतील.
- चार सप्टेंबरला चीनमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेला ओबामा उपस्थित राहणार असून, या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील.
एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वाधिक धावांचा विक्रम
- एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडच्या खात्यावर जमा झाला आहे.
- पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० षटकांमध्ये ३ गडींच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या.
- हेल्सच्या १७१ धावा आणि जॉस बटलच्या ५१ चेंडूत नाबाद ९० धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला हा पल्ला गाठता आला.
- या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात २७५ धावांत गारद झाला.
- यापूर्वी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता.
- श्रीलंकेने नेदरलँडविरुद्ध खेळताना २००६मध्ये ५० षटकांत ९ गडी गमावत ४४३ धावा केल्या होत्या.
- यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध ४३९ तर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध ४३८ धावा केल्या होत्या.