पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ ऑगस्ट रोजी तेलंगणगमधील मिशन भगीरथच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गजवेल विधानसभा मतदार संघातील कोमतीबांदा खेड्यात मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाले.
याचवेळी मोदी यांच्या हस्ते हैदराबाद ते करीमनगर या १५२ किलोमीटर लांबीच्या मनोहराबाद-कोथापल्ली नव्या रेल्वमार्गाचा पायाभरणी समारंभही पार पडला.
२०१४मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाल्यानंतर मोदी यांची या राज्याला ही पहिलीच भेट आहे.
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दंड
गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला.
या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत.
फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मायकेल फेल्प्सने जिंकले १९वे सुवर्ण पदक
अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे.
मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये आजवरचे १९वे सुवर्ण पदक जिंकले आहे. १९ सुवर्णपदकांसह २३ पदकांची विक्रमी कामगिरी करणारा फेल्प्स हा जगातील पहिला जलतरणपटू ठरला आहे.
मायकेल फेल्प्सचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने ४ बाय १०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
अमेरिकेच्या संघात मायकेल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा समावेश होता.
फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजेच अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण आणि २ कांस्य पदकांची कमाई केली होती.
त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मायकेलने ८ सुवर्ण पदके कमावली, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांवर मायकेलने आपले नाव कोरले होते.
थायलंडमध्ये लष्कराच्या नव्या राज्यघटनेला मान्यता
थायलंडमध्ये झालेल्या सार्वमतात नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या राज्यघटनेच्या बाजूने कौल दिला.
थायलंडमध्ये राजकीय अस्थिरतेच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी लष्कराने सत्ता हस्तगत करत त्यांच्या मर्जीने चालणारे सरकार स्थापन केले होते.
लष्कराच्या पाठबळावरील सरकारने जुनी राज्यघटना बदलून नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात लष्कराला अनेक विशेषाधिकार दिले आहेत.
यासाठी झालेल्या मतदानात थायलंडमधील नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या नव्या मसुद्याच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच, यामुळे २०१७मध्ये नव्या राज्यघटनेनुसारच निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या राज्यघटनेच्या मसुद्याला देशातील मोठ्या पक्षांनी विरोध केला होता. सरकारने त्याविरोधात प्रचार करण्यासच बंदी घातली होती.
आता या मसुद्याच्या बाजूने मतदान झाल्याने याचे राज्यघटनेत रूपांतर होणार आहे. हा निकाल थायलंडची दिशा बदलविणारा ठरण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा