रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू पी.व्ही.सिंधू हिने रौप्य पदकाची कमाई केली.
अतिशय चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूला १९-२१, २१-१२, २१-१५ असे हरवून सुवर्णपदक जिंकले.
जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या आणि सहाव्या मानांकित खेळाडूंना नमवून पी.व्ही.सिंधूने अंतिम फेरी गाठली होती.
अव्वल प्रतिस्पर्धी यांचे दडपण घेण्याऐवजी आपली कामगिरी उंचावत तिने आपल्यातील कौशल्य जागतिक व्यासपीठावर सिद्ध करून दाखवले.
बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकाविणारी सिंधू ही पहिलीच भारतीय आहे. ऑलिंपिक पदक मिळविणारी २१ वर्षीय सिंधू ही सर्वांत तरुण भारतीय खेळाडू आहे.
२०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती.
सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरि कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत.
सिंधूने मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २००४), विजयकुमार (लंडन २०१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २०१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत.
स्टेट बँक विलीनीकरणावर शिक्कामोर्तब
देशातील पहिल्या महिला बँकेसह पाच सहयोगी बँकांना विलीन करून घेण्याच्या निर्णयावर भारतीय स्टेट बँकेने शिक्कामोर्तब केले.
केंद्र सरकारने जूनच्या सुरुवातीलाच हे विलिनीकरण मंजूर केले आहे.
स्टेट बँकेच्या संचालक मंडळाने भारतीय महिला बँक व केवळ स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या तीन सहयोगी बँकांनाच सामील करून घेण्यावर शिक्कामोर्तब केले.
पाच पैकी अद्याप केवळ तीन सहयोगी बँका मुख्य बँकेत सहभागी झाल्या असल्या तरी बँक क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे.
उर्वरित दोन सहयोगी बँकांचे विलीनीकरण लवकरच पूर्ण होण्याबाबत आशा व्यक्त करण्यात आली आहे.
तसे झाल्यास ५० कोटी ग्राहक/खातेदारांसह स्टेट बँक ही २२,५०० शाखा व ५८,००० एटीएम असणारी बँक बनेल.
या रुपात स्टेट बँक ही जगातील अव्वल अशा ५० बँकांमध्ये गणली गेली आहे. स्टेट बँकेच्या सध्या १६,५०० शाखा तसेच १९१ विदेशी कार्यालये आहेत.
नरसिंग यादववर ४ वर्षांची बंदी
क्रीडा लवादने भारताचा मल्ल नरसिंग यादववर उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी ४ वर्षांची बंदी घातली आहे.
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते.
त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला क्लीन चीट दिली होती.
‘नाडा’च्या या निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती.
क्रीडा लवादाने या प्रकरणात नरसिंगला दोषी ठरवत त्याच्यावर बंदी घातली. तसेच त्याला रिओ सोडून जाण्याचे आदेशही देण्यात आले.
२०० मीटरमध्येही उसेन बोल्टची हॅट्रीक
रिओ ऑलिंपिकमध्ये १०० मीटर पाठोपाठ २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकाविले आहे.
उसेनने २०० मीटरचे अंतर १९.७८ सेकंदात पूर्ण केले. याच स्पर्धेत कॅनडाच्या ऍड्रे डे ग्रासे याला रौप्यपदक, तर फ्रान्सच्या क्रिस्तोफीला कांस्यपदक मिळाले.
ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई करत उसेनने हॅट्रीक करून नवा इतिहास रचला आहे.
यापूर्वी उसेनने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावताना हॅट्रीक केली आहे.
१०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सलग तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा उसेन हा जगातला पहिला धावपटू ठरला आहे.
आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील उसेन बोल्टचे हे आठवे सुवर्णपदक आहे.
जगातील सर्वात मोठे विमान एअरलॅण्डर १०
जगातील सर्वात मोठे विमान‘एअरलॅण्डर १०’ने १६ ऑगस्ट रोजी इंग्लंडमधील कार्डिंगटन एअरफिल्डवरून आपले पहिले यशस्वी उड्डाण केले.
या अवाढव्य विमानाच्या हवेतील यशस्वी उड्डाणासाठी गेल्या ८५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.
या चाचणीदरम्यान विमान अर्धा तासापर्यंत आकाशात उडत होते. हवेत उडण्यासाठी ‘एअरलॅण्डर १०’मध्ये हेलियम वायूचा वापर करण्यात येतो.
जास्त उंचीवर न उडू शकणाऱ्या या विमानाचा वेगदेखील कमी असणार आहे. याचा टॉप स्पीड ९२ एमपीएच इतका असेल.
सुरुवातीला सेनेचे सामान वाहून नेण्यासाठी वापरात येणारे हे विमान येणाऱ्या काळात इतर कारणांसाठीदेखील वापरात येईल.
९२ मीटर लांब आणि २६ मीटर उंच एअरलॅण्डर १०मध्ये एकाच वेळी १० हजार किलो समान वाहून नेण्याची क्षमता आहे.
आत्तापर्यंत सर्वात मोठे विमान म्हणून नावलौकीक असलेल्या ‘ए-३८०’ विमानापेक्षा हे विमान मोठे आहे.
हाफीज सईद मुस्लिम नसल्याच फतवा
जमात-उद-दावा दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदविरोधात दरगाह अल्ला हजरतने फतवा काढला आहे.
भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हाफिज सईदचा सहभाग असून तो मुस्लिम नसून दहशतवादाचा प्रसार करणारा आहे, असे या फतव्यातून सागंण्यात आले आहे.
फतव्यामध्ये म्हटले आहे की, ‘इस्लामिक दहशतवादी‘ हा मुस्लिम असू शकत नाही. इस्लाम व मुस्लिम नावाचा वापर करून तो जगभर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे.
या फतव्याच्या माध्यमातून मुस्लिमांना हाफीज सईदची भाषणे न ऐकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा