चालू घडामोडी : ४ ऑगस्ट
पुष्पकमल दहल नेपाळच्या पंतप्रधानपदी
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे (सीपीएन) प्रमुख आणि माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
- नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानामध्ये प्रचंड यांच्या बाजूने ३६३ मते पडली, तर विरोधात २१० मते पडली. एकूण ५९५ सदस्यांच्या सभागृहामध्ये २२ जणांनी मतदान केले नाही.
- प्रचंड हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल (माओवादी) या पक्षाचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी २००८ ते २००९ या काळात प्रचंड यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी काम केले होते.
- तत्कालीन लष्करप्रमुखांना निलंबित करण्याच्या निर्णयावरून प्रचंड यांचे लष्कराशी मतभेद झाले होते. त्यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनामा दिला होता.
- प्रचंड यांनी सहा सदस्यीय मंत्रिमंडळ स्थापन केले असून त्यामध्ये दोन उपपंतप्रधान आहेत.
- कृष्णबहादूर माहरा हे उपपंतप्रधान असून त्यांच्याकडे अर्थखाते सोपविण्यात आले आहे. नेपाळी कॉंग्रेसचे नेते विमलेंद्र निधी हे दुसरे उपपंतप्रधान असून त्यांच्याकडे गृहखाते देण्यात आले आहे.
- नवे सरकार स्थापन करण्यासाठी नेपाळी कॉंग्रेस, सीपीएन-माओवादी सेंटर यांनी मधेशी फ्रंटशी हातमिळवणी केली असून, मधेशी पक्षांचा पाठिंबा प्राप्त करण्यासाठी तीन समान मुद्द्यांवर आघाडी केली आहे.
- आघाडी सरकारमधून माओवादी पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर मागील महिन्यात सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष असलेल्या पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला होता.
- नवी राज्यघटना लागू झाल्यापासून नेपाळमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे.
आनंदीबेन पटेल यांचा गुजरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे सुपुर्द केला.
- नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे सांगत आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे फेसबुकवरुन जाहीर केले होते.
- रिक्त झालेल्या गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदासाठी विजय रूपानी किंवा नितीन पटेल यांच्या नावांची सर्वाधिक चर्चा आहे.
- निवडणूक तोंडावर आलेल्या गुजरातमध्ये पटेल यांच्या कारकिर्दीत पाटीदार व दलित समाजांच्या आंदोलनांनी पेट घेतला. याचा जबरदस्त फटका भाजपला बसू शकतो.
२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये ५ नव्या खेळांचा समावेश
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
- समितीने ज्या पाच खेळांना पुढील ऑलिम्पिकमध्ये समावेशास मंजुरी दिली त्यात बेसबॉल/सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्डींग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लायंबिंग या खेळांचा समावेश आहे.
- ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या २८ खेळांचा समावेश असून त्यात पाच खेळांची भर पडून स्पर्धेतील एकूण खेळांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे.
- २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल व सॉफ्टबॉलचा समावेश होता. आता पुन्हा एकदा हे खेळ ऑलिम्पिकचा भाग बनले आहेत.
नीता अंबानी यांची आयओसीच्या सदस्यपदी नियुक्ती
- रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
- रिओ दी जनेरो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत नीता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य मिळविणाऱ्या नीता अंबानी पहिल्या भारतीय महिला आहेत.
- जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी नीता अंबानी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी किमान ३९ मतांची आवश्यकता असते. नीता अंबानी यांनी ७१ मते मिळवून सदस्यत्वाचा मान मिळविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा