भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) २८ ऑगस्ट रोजी स्वदेशी बनावटीच्या स्क्रॅमजेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली.
‘इस्रो‘च्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून या स्क्रॅमजेट इंजिनाची चाचणी घेण्यात आली.
पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती आणि उपग्रह प्रक्षेपणावरील खर्चात मोठी कपात करण्यासाठी अशा प्रकारच्या इंजिनाची आवश्यकता आहे.
भारतीय बनावटीचे स्क्रॅमजेट इंजिन असलेल्या आरएच ५६० रॉकेटद्वारे ही चाचणी घेण्यात आली.
पूर्नवापरायोग्य आरएलव्ही ५६० रॉकेटमध्ये वापरण्यासाठी स्क्रॉमजेट इंजिनाची निर्मिती तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्रामध्ये करण्यात आली आहे.
स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या मदतीने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते.
यानाच्या पारंपारीक इंजिनामध्ये इंधन आणि ऑक्सिडायजर दोन्ही असते. इथे स्क्रॅमजेट इंजिनमध्ये वातावरणातील ऑक्सिजन यानातील इंधन प्रज्वलित करण्यासाठी ऑक्सिडायजरचे काम करणार आहे.
संबंधित चाचणी २८ जुलै रोजीच घेण्यात येणार होती. मात्र, भारतीय हवाईदलाचे मालवाहू विमान बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहिमेमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
सुगम्य भारत अभियान
देशातील २६ कोटी अपंग जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुगम्य भारत अभियान’ सुरू केले आहे.
३ डिसेंबर २०१५ या आंतरराष्ट्रीय अंपग दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या समाजकल्याण आणि सबलीकरण विभागामार्फत हे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले.
टप्प्याटप्प्याने राबविल्या जाणाऱ्या या अभियानातील पहिल्या टप्प्यात देशातील ५० शहरांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक या चार शहरांचा समावेश झाला आहे.
याअंतर्गत या शहरांतील सर्व शासकीय इमारतींमध्ये अपंगांसाठी किती सोयीसुविधा उपलब्ध आहेत, याचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.
अपंगांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी, त्यांच्या प्रती असलेली लोकांची मानसिकता दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, या संदर्भातील माहिती या कृती आराखड्याद्वारे सरकारला सादर करायची आहे.
समाजातील दुर्बल, दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात यांनी पुढे येण्यासाठी सरकारने पावले उचण्याच्या दृष्टीने देशात सुगम्य भारत अभियान राबविले जात आहे.
सानिया मिर्झाला कनेक्टिकट ओपनचे विजेतेपद
भारताच्या सानिया मिर्झा हिने रोमानियाच्या मोनिका निकुलेस्कूच्या साथीत कनेक्टिकट ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सानियाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. तसेच, सानियाचे हे मोसमातील सातवे आणि एकूण ३९वे विजेतेपद ठरले.
सानियाने मोनिकाच्या साथीने मिळविलेले हे पहिलेच जेतेपद ठरले.
अंतिम लढतीत सानिया-मोनिका या जोडीने कॅटरीना बोंडारेन्को आणि चिआ-जुंग चुआंग या जोडीवर ७-५, ६-४ अशी मात करत विजेतेपद पटकावले.
यापूर्वी सानिया-मोनिका या २०१०मध्ये एकत्र खेळल्या होत्या. त्या वेळी त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
गेल्या आठवडय़ात चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हासोबत सानियाने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले आहे.
पेस-बेगमन जोडीला विन्स्टन-सालेम ओपनचे उपविजेतेपद
भारताचा लिअँडर पेस आणि त्याचा जर्मनीचा जोडीदार आंद्रे बेगमन यांना एटीपी विन्स्टन-सालेम ओपन टेनिस स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गुलेर्मो गार्सिया-लोपेझ (स्पेन) आणि हेन्री कोंटिनेन जोडीने पेस-बेगमन जोडीचा ४-६, ७-६ , १०-८ असा पराभव केला आणि पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
या बरोबरच ४३ वर्षीय पेसचे एटीपी वर्ल्ड टूरचा कारकिर्दीतील ५६वा किताब पटकावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा