आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण
- रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) १० ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पतधोरणात महागाई अजूनही उच्चांकावर असल्याने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा पवित्रा कायम ठेवला.
- राजन यांचा हा शेवटचा पतधोरण आढावा होता. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल ४ सप्टेंबर रोजी संपत आहे.
- त्याचप्रमाणे गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा शेवटचा पतधोरण आढावा असेल. यापुढचे ४ ऑक्टोबर रोजीचे पतधोरण ६ सदस्यांची समिती ठरवेल.
- रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून मायकेल पात्रा यांची या समितीवर निवड झाली आहे.
पतधोरण आढावा ठळक वैशिष्ट्ये | ||
---|---|---|
दर | पूर्वीचा | नवीन |
रेपो दर | ६.५ | ६.५ |
रिव्हर्स रेपो दर | ६ | ६ |
मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी | ७ | ७ |
बँक रेट | ७ | ७ |
सीआरआर | ४ | ४ |
एसएलआर | २१.२५ | २१.२५ |
स्वातंत्र्यदिनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रात आदरांजली
- कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मैफलीने सन्मान करण्यात येणार आहे.
- सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात येणार असून त्यानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
- चेन्नईस्थित शंकरा नेत्रालय या संस्थेच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी लाभणारे रेहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत.
- १९६६मध्ये सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते.
अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांची आत्महत्या
- कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते, सलग पाचवेळा आमदारकी तसेच मुख्यमंत्रिपदापर्यंत प्रवास केलेले कॉंग्रेसचे बंडखोर नेते कलिखो पूल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात ९ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
- फेब्रुवारी २०१६ ते जुलै २०१६ या काळात त्यांनी अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्या गटातील १२ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कालिखो पूल मुख्यमंत्री झाले होते.
- मात्र, १३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी कॉंग्रेसचे नबाम तुकी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- त्यानंतर तुकी यांनी मागार घेऊन पेमा खांडू यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते. पुढे खांडू मुख्यमंत्री बनल्यानंतरही पूल यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडले नव्हते.
- ४६ वर्षीय कालिखो पूल हे अरूणाचल प्रदेशचे १८वे मुख्यमंत्री होते. त्यांनी संघर्षमय प्रवासानंतर राजकीय जीवनात मोठे यश मिळवले होते.
- महाविद्यालयाच्या सरचिटणीसपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरूवात करणारे पूल १९९५मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आणि मंत्री झाले. आमदारकीच्या २३ वर्षांच्या काळात त्यांनी २२ वर्षे मंत्रीपद भुषविले होते.
- पूल यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
गुन्हेगार मंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिला
- राज्य विधिमंडळात जबाबदार मंत्री म्हणून कारभार हाकणाऱ्या विविध २९ राज्यांमधील ३४ टक्के मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत, अशी माहिती नुकतीच एका अहवालात उघड झाली आहे.
- विशेष म्हणजे गुन्हेगार मंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील १८ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
- ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) या दिल्लीतील संस्थेने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.
- देशभरातील २९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
- एडीआरने गुन्हेगारी स्वरूपाच्या मंत्र्यांसह त्यांची संपत्ती दाखविणारी माहितीही अहवालात समाविष्ट केलेली आहे. सर्व राज्यांमधील ७६ टक्के मंत्री कोट्यधीश असल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.
- राज्य विधान मंडळातील ६०९ मंत्र्यांच्या सर्वेक्षणामध्ये ४६२ मंत्री कोट्यधीशआहेत.
राज्यनिहाय गुन्हेगार मंत्र्यांची स्थिती | |
---|---|
राज्य | गुन्हेगार मंत्री |
महाराष्ट्र | १८ |
बिहार | ११ |
झारखंड | ९ |
तेलंगण | ९ |
दिल्ली | ४ |
मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर
- मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकारांवर भर देणारे मनोरूग्ण सुरक्षा व अधिकार दुरूस्ती विधेयक राज्यसभेत १३४ दुरूस्त्यांसह मंजूर झाले.
- यामुळे मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आता दाखल करता येणार नाही.
- पूर्वीच्या कायद्यात नियमनावर अधिक भर देण्यात आला होता तर दुरूस्ती विधेयकात मनोरूग्णांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील तसेच त्यांच्या अधिकारांबाबत विशेष जागरूकतेने भर देण्यात आला आहे.
- विधेयकातील तरतूदींनुसार मनोरूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातील. महिला व लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.
- मानसिकदृष्टया आजारी रूग्णाला रूग्णालयात ३० दिवस ठेवता येईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ९० दिवसांपर्यंत ही मुदत वाढवताही येईल.
- मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी देशात सुयोग्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब लक्षात घेउन वैद्यकीय अभ्यासक्रमात मनोरूग्ण चिकित्सा अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यात आल्या आहेत.
मायकेल फेल्प्सचे २१वे सुवर्णपदक
- अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला.
- तसेच ४ बाय २०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात मायकल फेल्प्सचा सहभाग असलेल्या अमेरिकेला सांघिक सुवर्णपदक मिळाले.
- एकाच दिवशी मायकल फेल्प्सने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या सुवर्णपदकांसह फेल्प्सच्या ऑलिम्पिकमधील एकुण पदकांची संख्या २५ वर पोहोचली आहे. यामध्ये २१ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
- २१ सुवर्णपदकांसह २५ पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.
- फेल्प्सने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण आणि २ कांस्य, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांवर आपले नाव कोरले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा