क्रीडा विश्वातील सर्वांत मोठ्या ३१व्या ऑलिंपिक क्रीडा महाकुंभास ६ ऑगस्ट ऐतिहासिक मराकाना स्टेडियमवर सुरवात झाली. ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण अमेरिकेत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
देशातील आर्थिक मंदी, राजकीय विरोध आणि झिका विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचे संकट अशा अडचणींतूनही जागतिक तापमानवाढीबाबत जागरूकता निर्माण करणारा संदेश उद्घाटन सोहळ्यातून ब्राझीलने दिला.
प्रत्येक देशाला संचलनासाठी घेऊन येणाऱ्या मुलांच्या हातात एक रोपटे देण्यात आले होते. त्याचबरोबर विविध प्रकारची रोपटी व देशाची पाटी असणारा प्रतिनिधी सायकलवरून सर्वांत पुढे होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य बान की मून आणि ७८ हजार ब्राझीलवासीयांच्या उपस्थितीत ब्राझीलचे हंगामी राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमर यांनी ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन केले.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने तिरंगा हाती घेऊन ११९ भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व केले. भारताचे आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे पथक आहे.
शुभा मुदगल यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार
हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अभिधा निफाडे ‘वर्ल्ड ऍट स्कूल’ची जागतिक राजदूत
आयएलएस विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अभिधा निफाडे हिला संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड ऍट स्कूल’ उपक्रमाची जागतिक राजदूत होण्याची संधी मिळाली आहे.
मूळची नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरची असलेल्या अभिधाने सर परशुरामभाऊ महाविद्यालयात असताना ‘रोशनी’ संस्थेमार्फत सामाजिक कार्यात पाऊल ठेवले.
मासिक पाळी, महिला बचत गट, बाललैंगिक शोषण, शैक्षणिक उपक्रम आणि कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीवर तिने काम सुरू केले.
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांना कायद्याविषयी व त्यांच्या हक्कांविषयी जाणीव करून देण्याच्या उद्देशाने तिने वयाच्या २१व्या वर्षी ‘बिईंग लॉजिकल’ संस्थेची स्थापना केली
सध्या संस्थेमार्फत ती कायदेविषयक कार्यशाळा, मोफत कायदा सल्ला आणि मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम करते.
विजय मल्याविरुध्द पुन्हा अजामीनपात्र वॉरंट
देशातील बँकांचे नऊ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज बुडवलेले मद्यसम्राट विजय मल्या यांच्यावर दिल्ली न्यायालयाने २०१२मध्ये एक धनादेश न वटल्याच्या प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
मल्या यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हे वॉरंट बजावण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे मल्या यांना या खटल्यात व्यक्तिगत हजेरी लावावी लागणार आहे.
मल्या हे कर्जबुडवेगिरीच्या प्रकरणात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच ब्रिटनला पळाले असून, ते लंडनमध्ये असल्याचे सांगण्यात येते.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील डायल या संचालन आस्थापनेला मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीने १ कोटी रुपयांचा धनादेश जारी केला होता.
पण निधी कमी असल्याने तो वटला नाही. त्यानंतर डायलने जून २०१२ मध्ये मल्या यांच्या विरोधात ७.५ कोटींचे धनादेश न वटल्याच्या प्रकरणी चार खटले दाखल केले होते.
किंगफिशर एअरलाइन कंपनीने विमानतळावरील सेवा घेतल्यानंतर डायल आस्थापनेला पैसे अदा करणे आवश्यक होते. पण मल्या यांनी दिलेले धनादेश वटले नाहीत त्यामुळे पैसेही मिळाले नाहीत.
देशातील १७ बँकांचे ९ हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष विजय मल्या यांनी बुडवले आहे. त्यांच्याविरोधात धनादेश न वटल्याबाबत अनेक खटले विविध ठिकाणी दाखल आहेत.
इराणचा अणूशास्त्रज्ञ शहराम अमिरीला फाशी
हेरगिरी करणारा इराणचा अणूशास्त्रज्ञ शहराम अमिरी याचा गुप्तरीत्या मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने २०१०मध्ये हेरगिरी करताना त्याला अटक केले होते. त्यानंतर त्याला इराणला परत पाठविण्यात आले.
त्यानंतर तो रहस्यमयरीत्या गायब झाला होता. ब्रिटिश प्रसारण संस्था बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अमिरी याला याच आठवड्यात गुप्तरीत्या फाशी दिली गेली आहे.
अमिरीचा १९७७मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर २००९साली गेलेल्या मक्का यात्रेत तो बेपत्ता झाला होता. तो इराणमधला नावाजलेला अणू शास्त्रज्ञ होता.
रिओमध्ये जलतरणपटू अॅडम पीटीचा विश्वविक्रम
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनचा सुप्रसिद्ध जलतरणपटू अॅडम पीटीने स्वत:चाच जागतिक विक्रम मोडीत काढून नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
अॅडम पीटीने पुरूषांच्या १०० मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ५७.५५ सेकंदांची वेळ नोंदवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
अॅडमने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ५७.९८ सेकंदाची वेळ नोंदवली होती.
या विजयासह त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, त्याच्याकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा