सरोगसी विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली आहे. भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्कांच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे.
सरोगसीमधील अनैतिकतेला आळा घालण्याचा प्रयत्न या विधेयकातून करण्यात आला आहे.
सरोगसीचा व्यवसाय करण्यावर बंदी घालण्याची तसेच अविवाहित जोडप्यांसाठी सरोगसीद्वारे अपत्य न देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक
भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांच्या ऑपरेटिंग मॅन्युअलच्या गोपनीय माहितीचा समावेश असल्याचा संशय आहे.
या माहितीमध्ये पाणबुड्यांचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपण प्रणाली आणि पाणबुडीतील दिशादर्शन प्रणालीचा समावेश होता.
ही माहिती पाकिस्तान किंवा चीनसारख्या देशांच्या हाती पडल्यास सागरी संरक्षणाच्यादृष्टीने भारतासाठी धोका उत्त्पन्न होऊ शकतो.
हिंदूंपेक्षा मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक
घटस्फोट किंवा विवाहानंतर विभक्त होण्याचे प्रमाण हिंदूंपेक्षा मुस्लिमांमध्ये अधिक असल्याची माहिती जनगणननेच्या २०११च्या अहवालातून समोर आली आहे.
भारतामध्ये ख्रिश्चन आणि बुद्ध धर्मियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर जैन धर्मात सर्वाधिक कमी घटस्फोट होत असल्याचे आढळून आले आहे.
साक्षी मलिक बेटी बचाओ बेटी पढाओची ब्रँड ऍम्बेसिडर
रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाना सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच साक्षीला हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते अडीच कोटी रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून देण्यात आला.
साक्षी ही हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा खास गावातील रहिवाशी आहे. साक्षीने ५८ किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले होते.
शारदा गैरव्यवहारप्रकरणी नलिनी चिदंबरम यांना समन्स
शारदा चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजाविण्यात आले आहे.
ईडीकडून शारदा चिटफंट घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
शारदा चिटफंडचे अध्यक्ष सुदीप्त सेन यांनी २०१३ मध्ये सीबीआयला पत्राद्वारे दिलेल्या कबुलीनंतर या घोटाळ्यात नलिनी चिदंबरम यांचे नाव पुढे आले होते.
नलिनी या चेन्नईस्थित वरिष्ठ वकील असून सीबीआयकडून त्यांची तपासणी सुरू होती.
काँग्रेस नेते मतांगसिंह यांच्या पत्नी मनोरंजना सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर शारदा समुहाकडून वकिलीच्या शुल्कापोटी नलिनी चिदंबरम यांना एक कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.
मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ टपाल पाकीट
संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर भारतात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.
भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.
त्यावर २०१०मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे.
मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे तयार करण्यात येणार आहे.
तामिळनाडू तृतीयपंथीयांना पोलीस दलात स्थान देणारे पहिले राज्य
राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
प्रत्यक्षात निवड होऊन तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा त्यांना इतर दोन लिंगासोबत समान हक्क देणारे देशातील ते पहिले राज्य ठरेल.
तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलीस शिपायांच्या भरतीच्या आदेशात पात्र तृतीयपंथी व्यक्तीही अर्ज करू शकतील, असे नमूद केले आहे.
जे ‘तृतीयलिंगी’ म्हणून अर्ज करतील त्यांना शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता व आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाचे निकष लागू होणार आहेत.
यापूर्वीही राज्यामध्ये तृतीयपंथींना अर्ज करण्यास मज्जाव नव्हता. फक्त त्यांना पुरुष मानावे की स्त्री याविषयी सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्यांच्या अर्जांवर पुढे कारवाई केली जाऊ शकत नव्हती.
दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेमध्ये टपाल तिकीट
दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेतील टपाल विभागातर्फे (यूएसपीएस) टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते.
सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे.
त्यावर ‘फॉरएव्हर यूएसए २०१६’ हे शब्द असतील. ५ ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे व नोव्हेंबरमध्ये ते व्यवहारात आणले जाईल.
सॅली अँडरसन यांनी तिकिटावरील दिव्याचे छायाचित्र काढले असून, या प्रकल्पाचे कला संचालक विल्यम गिकर हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा