भारताच्या ७०व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले.
हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र
हिमालयात पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, १४ शौर्यचक्रे, ६३ सेनापदके, २ नौसेना पदके आणि २ वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली.
मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे.
स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली.
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे.
लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर), ११ शौर्यचक्रे (यातील ६ मरणोत्तर) आणि ६३ सेनापदके जाहीर झाली असून, यातील १२ ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत.
‘ऑपरेशन मेघदूत’, ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन ऱ्हिनो’ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही २८ शौर्यपदके जाहीर झाली आहेत.
यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत.
दीपा कर्माकरला पदकाची हुलकावणी
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकरचे अंतिम फेरीत कांस्य पदक थोडक्यात हुकले.
दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी १५.०६६ गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अमेरिकेच्या सिमॉन बाईल्सने १५.९६६ गुणांसह सुवर्ण; तर रशियाच्या मारिया पासेकाने १५.२५३ गुणांसह रौप्यपदक जिंकले. स्वित्झर्लंडच्या गिरुलिया स्टीनग्रुबेर हिने १५.२१६ गुणांसह कांस्य पदक मिळविले.
ऑलिम्पिकच्या व्हॉल्ट जिम्नॅस्टिक्स प्रकारात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणारी दीपा ही भारताची पहिलीच जिम्नॅस्टिक्सपटू आहे.
दीपाने अंतिम फेरीत आपल्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी लँडींग केले, तर दुसऱ्या प्रकारात तिने जिम्नॅस्टिक्समधील सर्वात कठीण मानल्या जाणारा प्रोड्युनोव्हा प्रकार केला.
०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले. ‘प्रोड्युनोव्हा’मध्ये तिचा आव्हानांचा स्तर हा इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक होता.
उसेन बोल्टची हॅटट्रिक
जमैकाच्या उसेन बोल्ट याने ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास घडवला. ऑलिंपिक स्पर्धेच्या १०० मीटर शर्यतीचे त्याने सलग तिसरे विजेतेपद मिळवून त्याने हॅटट्रिक साधली.
अमेरिकेचा आव्हानवीर जस्टिन गॅटलिन याला शह देत बोल्टने ९.८१ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा