चालू घडामोडी : २१ ऑगस्ट
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा
- प्रस्तावित नवीन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात एखाद्या कामासाठी लैंगिक संबंधाची मागणी करणे हाही भ्रष्टाचाराचा गुन्हा ठरवण्यात आला आहे. सध्या हा कायदा संसदीय समितीपुढे मांडला आहे.
- सरकारी सेवकांनी एखाद्या कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय लाच देणे हा तर गुन्हा आहेच शिवाय काम करण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी करणे हाही गुन्हा आहे.
- सध्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अस्तित्वात आहे. पण आता नवीन कायद्यात भ्रष्टाचाराच्या व्याख्येची व्याप्ती वाढवली असून त्यात खासगी क्षेत्राचाही समावेश करण्यात आला आहे.
- खासगी क्षेत्रातही लाचखोरी हा प्रथमच गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी एखाद्या कामासाठी लाच घेतली, तर त्यांनाही या कायद्यानुसार शिक्षा होणार आहे.
- त्यासाठी सात वर्षे तुरुंगवास व दंड अशी शिक्षा सुचवण्यात आली आहे. लाच देणाऱ्यांना शिक्षा करण्याची शिफारसही त्यात आहे.
ऑलिम्पिकमध्ये अदिती अशोक ४१व्या क्रमांकावर
- ऑलिम्पिकमध्ये ११२ वर्षानंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात अदिती अशोकने ७६ गुणांसह ४१व्या क्रमांक मिळविला.
- या खेळासाठी विविध देशांच्या संघांमधून एकूण ६४ तर जगातील सर्वोत्कृष्ट १० गोल्फपटू सहभागी झाले होते.
- दक्षिण कोरियाच्या इन्बी पार्कने सुवर्ण, न्यूझीलंडच्या को लिडीयाने रौप्य, तर चीनच्या फेंग शॅनशॅनने ब्रॉंझपदक मिळविले.
- आदिती १८ वर्षांची असून केवळ सहा महिन्यांपूर्वीच तिने व्यावसायिक पदार्पण केले, तर गोल्फ खेळायला तिने चार वर्षांपूर्वीच प्रारंभ केला आहे.
- रियोमार येथिल ऑलिम्पिक गोल्फ कोर्सवर झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अदिती सातव्या क्रमांकावर होती, खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तिला ७६ गुणांवर समाधान मानावे लागले.
यजमान ब्राझीलला फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक
- माराकाना स्टेडियममध्ये झालेल्या या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ब्राझीलने जर्मनीचा पराभव करत पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले.
- ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील हा अंतिम सामना निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये लागला.
- पेनेल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक विवेरटोनने पीटरसन नील्सचा अडविलेला गोल आणि कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव केला.
- पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलला आजवर एकदाही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. १९८४, १९८८ व २०१२मध्ये त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
- कांस्यपदकाच्या लढतीत नायजेरियाने उमर सादिकीच्या दोन गोलच्या जोरावर होंडुरासचा ३-२ असा पराभव केला.
ब्रिटनच्या फराहचे विक्रमी सुवर्णपदक
- ब्रिटनचा धावपटू मो. फराहने रिओमध्ये १०,००० मी. पाठोपाठ ५००० मी. धावण्याची शर्यतही जिंकत या ऑलिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक मिळविले.
- यापूर्वी त्याने लंडन ऑलिंपिकमध्येही दोन ५००० आणि १०,००० हजार मीटर शर्यतीत सुवर्ण मिळविले होते.
- ऑलम्पिकच्या मैदानी स्पर्धेच्या इतिहासात लांब पल्ल्याच्या धावपटूंमध्ये ५ व १० हजार मीटर शर्यतीत जेतेपद राखणारा तो दुसरा धावपटू ठरला.
- यापूर्वी फिनलँडच्या लॅसी विरेन यांनी सलग दोन ऑलिंपिकमध्ये (१९७२ व १९७६) या दोन्ही शर्यतीत सुवर्णपदके मिळविली होती.
- आता फराहने या विक्रमाची बरोबरी केली आहे. फराहने ५००० मीटरची ही शर्यत १३ मिनिटे ३.३० सेकंदांत पूर्ण करत आपले वर्चस्व राखले.
- या स्पर्धेत अमेरिकेच्या चेलिमो पॉल याने रौप्य आणि इथिओपियाच्या गेब्रीहेवेट हॅगोस याने ब्राँझपदक मिळविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा