नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस (यूपीआय) प्रणालीला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे.
यूपीआय ही खातेक्रमांकाशिवाय मोबाईल क्रमांकावर आधारित बॅंकिंगची सुविधा देणारी प्रणाली आहे.
यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळून अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल.
यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे पाठवणे आणि स्वीकारणे यासारखे व्यवहार क्षणार्धात पूर्ण करता येणार आहेत.
गुगल प्ले स्टोअरवर यूपीआय-एनेबल्ड मोबाइल ऍप पुरवणाऱ्या बॅंकांच्या ग्राहकांना यूपीआयचा वापर करून बॅंकिंग व्यवहार करता येतील.
यूपीआयद्वारे एका वेळी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्स्फर करता येते व ही सुविधा अव्याहतपणे (२४*७) उपलब्ध असते.
सध्या १९ बॅंकांनी ही सुविधा देऊ केली आहे. नजीकच्या भविष्यात उर्वरित बॅंकाही ही सेवा उपलब्ध करून देतील.
‘एनपीसीआय’चे एमडी व सीइओ : ए. पी. होटा
ख्रिस्तियानो रोनाल्डोला युईएफए बेस्ट प्लेअर पुरस्कार
पोर्तुगालचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोला युरोपचा २०१६ या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
रोनाल्डोने रिअल माद्रिदमधील त्याचा सहकारी गॅरेथ बॅले व अॅटेलिटिको माद्रिदचा खेळाडू अन्तोनी ग्रिझमन यांना मागे टाकून हा पुरस्कार मिळवला.
चॅम्पियन्स लीगच्या येणाऱ्या सत्रातील ड्रॉच्या घोषणेनंतर त्याला युईएफए बेस्ट प्लेअरचा पुरस्कार घोषीत करण्यात आला.
रोनाल्डोच्या शानदार खेळामुळे रियल माद्रिदने २०१५-१६मध्ये चॅम्पियन्स लीग किताब पटकावला. त्याच्याच नेतृत्वात पोर्तुगालने पहिल्यांदा युरो कप जिंकला आहे.
रोनाल्डोने हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. रोनाल्डोने याआधी २०१४मध्ये हा पुरस्कार मिळवला होता. २०१५मध्ये बार्सिलोनाचा स्टार स्ट्राईकर लियोनेल मेस्सीने मिळवला.
महिलांच्या गटात हा पुरस्कार नॉर्वेची अदा हेगरबर्गला मिळाला.
पृथ्वीसदृश प्रॉक्झिमा-बी या ग्रहाचा शोध
पृथ्वीपासून जवळपास चार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या पृथ्वीसारख्याच दुसऱ्या ग्रहाचा शोध संशोधकांनी लावला आहे.
हा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असून, प्रॉक्झिमा-बी असे त्याला नाव देण्यात आले आहे.
या ग्रहाची आकारासहित बहुतेक वैशिष्ट्ये पृथ्वीसारखीच असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत.
या ग्रहावरील वातावरणाचे अस्तित्व व सजीवांचा अधिवास याबाबत मात्र अद्याप संशोधन सुरू आहे.
प्रॉक्झिमा-बी हा ग्रह प्रॉक्झिमा सेन्शॉरी या लाल लघुताऱ्याच्या शेजारीच आहे.
ब्रिटिश संशोधकांच्या पुढाकाराने युरोपियन शास्त्रज्ञांनी हे संशोधनपर लिखाण केले आहे.
या लिखाणासाठी संशोधकांनी १६ वर्षांपासून माहिती संकलन केले. चिलीमधील युरोपियन साऊदर्न ऑब्जर्व्हेटरी टेलेस्कोपच्या साह्याने संशोधकांनी या ग्रहाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.
सतबीरसिंग कदियान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा
भारतीय लोकदलाचे नेते आणि हरियाना विधानसभेचे माजी अध्यक्ष सतबीरसिंग कदियान यांना इफ्को भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्रकुमार मिश्रा यांनी ही शिक्षा सुनावली.
कदियान यांच्याव्यतिरिक्त युको बॅंकेचे माजी सहायक व्यवस्थापक विनायक नारायण देवस्थळी, अनिलकुमार मल्होत्रा, युको बॅंकेचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक सुनील गोरवरा यांनाही न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
तसेच ८४ वर्षीय करुणापती पांडे यांच्या वयाचा विचार करीत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
मुख्य आरोपी असलेले कदियान हे लोकनियुक्त प्रतिनिधी होते. त्याचप्रमाणे ते विधानसभेचे अध्यक्षही होते. कदियान हे इफ्कोचेही अध्यक्ष होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा