अक्षरधामचे निर्माते व स्वामी नारायण पंथ म्हणून प्रसिद्ध बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे आध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज नारायण स्वरूपदास यांचे सारंगपूर येथे १३ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
भगवान स्वामीनारायण परंपरेतील ते पाचवे गुरू होते आणि गेली सात दशके त्यांनी भारतातील आणि जगभरातील १७ हजार शहरांचा प्रवास करून संस्थेचे कार्य वाढविले होते.
अतिशय निरलस, तसेच प्रेमळ गुरू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म ७ डिसेंबर १९२१ रोजी बडोद्याजवळील एका गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता.
वयाच्या १८ व्या वर्षी ते ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराजांच्या संपर्कात आले आणि साधू नारायण स्वरूप म्हणून ओळखले जाऊ लागले.
शास्त्रीजी महाराजांनी त्यांची निष्ठा आणि काम पाहून १९५०साली बीएपीएसच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली, तेव्हा ते अवघे २९ वर्षांचे होते.
शास्त्रीजी महाराजांचे १९५१साली निधन झाल्यानंतर, आधी योगी महाराज यांची आणि नंतर प्रमुख स्वामी महाराजांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली.
तेव्हापासून जवळपास ७ दशके प्रमुख स्वामी महाराज देशात आणि विदेशात समाजसेवा आणि सत्संग कार्यात गुंतले होते. आदिवासींच्या विकासात त्यांचा सहभाग होता.
नैसर्गिक आपत्तीतही ते व अनुयायी मदत करताना दिसत. त्यांनी दिल्ली व गांधीनगरप्रमाणे देशात आणि परदेशात ११०० स्वामीनारायण मंदिरांची उभारणी केली.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, दलाई लामा, नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्यापासून जगभरातील अनेक नेत्यांनी प्रमुख स्वामी महाराजांच्या कार्याची अनेकदा प्रशंसा केली होती.
शेतकरी दिन तिथीनुसार साजरा होणार
राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शिवसेना युती सरकारने शेतकरी दिन तिथी नुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन (२९ ऑगस्ट) म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.
२०१४पासून २९ ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यासाठी त्यांचे नातू व तत्कालीन राज्य सरकारमधील कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता. यंदा नारळी पौर्णिमा १७ ऑगस्ट रोजी असल्याने शेतकरी दिन १७ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
तिथीनुसार हा दिन साजरा करण्यात येणार असल्याने दरवर्षी नारळी पौर्णिमेला बदलत्या तारखेनुसार हा दिन साजरा केला जाईल.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. तो वर्षानुवर्षे याच तारखेला होत आहे.
मात्र, शेतकरी दिन दोन वर्षे २९ ऑगस्टला साजरा केल्यानंतर आता तो तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ललिता बाबर अंतिम फेरीत
साताऱ्याच्या मराठमोळ्या ललिता बाबरने रिओ ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे.
१९८४मध्ये पी. टी. उषाने ४०० मी. हर्डल्स शर्यतीत ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर पात्रता फेरीतून अंतिम फेरी गाठणारी ललिता दुसरीच भारतीय धावपटू आहे.
प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत ललिताने ९ मिनिटे १९.७६ सेकंदात शर्यत पूर्ण करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
ही कामगिरी करताना आशियाई विजेत्या ललिताने सुधा सिंगने नोंदविलेला ९ मिनिटे २६.५५ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
अतुलनीय देशसेवेसाठी शौर्य पुरस्कार जाहीर
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत.
भारताच्या ७०व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्कारांमध्ये १ अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदके, २ नौसेना पदके आणि २ वायुसेना पदकांचा समावेश आहे.
हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.
सुवर्णपदकाने फेल्प्सच्या कारकीर्दीचा शेवट
अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या रिओ ऑलिंपिक अभियानाचा शेवट ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावून केला.
रिओ ऑलिंपिकमध्ये मायकेल फेल्प्सने ५ सुवर्ण व १ रौप्यपदक मिळविले. फेल्प्सने आपल्या जलतरणाच्या कारकिर्दीत २३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ ब्राँझपदकांसह एकूण २८ पदके मिळविलेली आहेत.
फेल्प्सने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण आणि २ कांस्य, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्यपदकांवर आपले नाव कोरले होते.
२३ सुवर्णपदकांसह २८ पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील एकमेव जलतरणपटू आहे.
हे फेल्प्सचे शेवटचे ऑलिंपिक आहे. या ऑलिंपिकनंतर निवृत्त होणार असल्याचे फेल्प्सने यापूर्वीच जाहीर केले होते.
फराहचे धावताना ट्रॅकवर पडूनही पुन्हा उठत सुवर्णपदक
ग्रेट ब्रिटनच्या मोहम्मद फराहने १०,००० मीटर शर्यतीत धावताना ट्रॅकवर पडूनही पुन्हा उठत सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.
फराहने आपल्या कारकिर्दीतील ऑलिंपिकमधील हे तिसरे सुवर्णपदक मिळविले आहे. यापूर्वी फराहने लंडन ऑलिंपिकमध्ये १०,००० मीटर आणि ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.
२५ लॅपच्या या शर्यतीत १०व्या लॅपवेळी तो मैदानावर कोसळला. पण, त्याने पुन्हा उठून शर्यत कायम ठेवली. त्यावेळी त्याला अमेरिकेचा सहकारी गॅलेन रुपने पाठबळ दिले.
अखेर त्याने शेवटच्या दोन लॅपमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. फराहने १०,००० मीटर अंतर २७ मिनीट ५.१७ सेकंदांत पूर्ण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा