बहुप्रतीक्षित जीएसटी (वस्तू व सेवाकर) करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असलेले १२२वे घटनादुरुस्ती विधेयक सुधारणांसह लोकसभेत एकमताने मंजूर झाले.
राज्यसभेने या आधीच घटनादुरुस्ती विधेयकावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लोकसभेची मंजुरी केवळ औपचारिकताच होती.
४४३ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर ‘एआयएडीएमके’ पक्षाने विधेयकाविरुद्ध सभात्याग करून आपली नाराजी व्यक्त केली.
या घटनादुरुस्तीला निम्म्यांहून अधिक राज्यांच्या विधानसभांनी मंजुरी देणे गरजेचे असून, त्यानंतर दोन केंद्रीय कायदे व संबंधित राज्यांचा कायदा असे तीन कायदे केले जातील. त्यानंतर, जीएसटी करप्रणाली प्रत्यक्ष लागू होईल.
‘नीट’च्या विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी
भारतीय वैद्यक परिषद (सुधारणा) कायदा २०१६ आणि दंतवैद्यक (सुधारणा) कायदा २०१६ संसदेने पारित केलेल्या या दोन विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
यामुळे आता देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांमधील प्रवेशाकरिता एकच राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) होणार आहे.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालणे, अनेक परीक्षा देण्याचा त्रास टाळणे आणि समुपदेशनातील विद्यार्थ्यांचे शोषण थांबवणे या उद्देशांसाठी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय संस्थांतर्फे संचालित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी समान प्रवेश परीक्षा घेणे या कायद्यांनुसार अनिवार्य करण्यात आले आहे. हिंदी, इंग्रजी व तत्सम भाषांमध्ये ही परीक्षा घेण्याची तरतूद कायद्यात आहे.
९ ऑगस्ट : क्रांती दिन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला 'चले जाव'चा इशारा दिला.
या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता.
तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला.
१९४२च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्थानचा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता.
इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे.
जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वसंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते.
हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते.
कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून मरण पावले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा