फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटातसाक्षी मलिकने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनीबेकोव्हला नमवत भारताला रिओ ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले.
ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत पदक पटकावणारी साक्षी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
सायना नेहवाल (बॅडमिंटन), मेरिकोम (बॉक्सिंग), कर्नम मल्लेश्वरी (वेटलिफ्टिंग) यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
हरयाणा सरकारने राज्याचा गौरव वाढवणाऱ्या साक्षीला सरकारी सेवेत नोकरी देण्याची तसेच अडीच कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
साक्षी सध्या उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपीक असून रेल्वेनेही तिला पदोन्नती देण्याची तसेच ५० लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
साक्षी मलिकचे पदक भारताचे कुस्तीमधील पाचवे पदक ठरले आहे, तर साक्षी मलिक ही भारताची चौथी ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान ठरली आहे.
१९५२ मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळवले होते.
सुशीलकुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक व २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनेदेखील कांस्यपदक आपल्या नावावर केले होते.
त्यानंतर आता २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत कुस्तीतले पाचवे पदक मिळवले आहे.
चार नव्या रेल्वेगाड्या लवकरच सुरु करणार
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची रेल्वेसेवा सुरू करणार आहे.
‘अंत्योदय एक्स्प्रेस’सह चार नव्या गाड्या काही महिन्यांत सुरू करण्याची घोषणाकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामुळे पर्यावरणाची हानी
आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची मोठी हानी झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काढला आहे.
या कार्यक्रमामुळे पर्यावरणाचे इतक्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले की त्याची पुन्हा भरपाई होऊ शकत नाही, असेही या समितीने नमूद केले आहे.
श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने यमुनेच्या काठावर मार्च महिन्यात जागतिक संस्कृती महोत्सव घेतला होता.
या महोत्सवामुळे पर्यावरणाची हानी झाली काय याचा अभ्यास करण्यासाठी एनजीटीने जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होती.
या समितीने आपला अहवाल नुकताच एनजीटीच्या सुपूर्द केला. या अहवालात म्हटले आहे की, कार्यक्रमाचे मुख्य स्थळ म्हणून वापर करण्यात आलेले पूरक्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
सपाटीकरणासह पूरक्षेत्राची दबाई करण्यात आल्यामुळे जल संचयासाठी जागा उरली नाही. अनेक वनस्पती आणि झाडेझुडपेही नाहीशी होऊन जैवविविधतेचा ऱ्हास झाला आहे.
द आर्ट ऑफ लिव्हिंगने हा अहवाल फेटाळला असून, पर्यावरण हानीचे आरोप अवैज्ञानिक, पक्षपाती असल्याचे म्हटले आहे.
पर्यावरणीय हानीच्या भरपाईसाठी एनजीटीने गेल्या मार्चमध्ये द आर्ट ऑफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावून आणखी नुकसान होऊ न देण्याचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
सचिनने महाराष्ट्रातील गाव दत्तक घेतले
दुष्काळात होरपळणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजे हे दुर्गम गाव सचिन तेंडूलकरने दत्तक घेतले आहे.
संसद आदर्श ग्राम योजनेत सचिनने महाराष्ट्रातले पहिले गाव म्हणून डोणजेची निवड केली. यापूर्वी सचिनने आंध्रप्रदेशातील एक गाव दत्तक घेतले आहे.
डोणजे गाव सीना कोळेगाव प्रकल्पात बाधित झालेलं गाव आहे. पण कायम क्रिकेटचं वेड असलेल्या या गावाची पंचक्रोशीतली ओळख म्हणजे या गावात भरणारे क्रिकेटचे सामने.
राज्यात ज्या वेळी क्रिकेटचा फारसा प्रचार व प्रसार नव्हता, त्या वेळी या गावात ग्रामीण भागातले क्रिकेटचे सामने अत्यंत लोकप्रिय होते.
या गावाला संसद आदर्श ग्राम योजनेतून सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतल्याने या गावाचा आता कायापालट होण्याची आशा निर्माण झाली आहे.
प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारत आघाडीवर
ब्लूबाइट्स या संस्थेने टीआरए रिसर्च या संस्थेबरोबर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
‘इंडियाज् मोस्ट रेप्युटेड ब्रँड्स’ असे या सर्वेक्षण अहवालाचे नाव आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित औषध कंपनी म्हणून १९६८पासून कार्यरत असणाऱ्या व ३०२९.५ कोटी रुपये महसूल असणाऱ्या ल्युपिन कंपनीची निवड झाली आहे.
जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यांमध्ये देशातील ५८ कंपन्यांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पहिल्या चारही कंपन्या भारतीय आहेत.
ल्युपिन खालोखाल सन फार्मा कंपनीला तर त्यानंतर सिप्ला कंपनीला लोकांची पसंती मिळाली आहे. चौथ्या क्रमांकावर डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज् ही कंपनी आहे.
सर्वाधिक प्रतिष्ठित दहा भारतीय कंपन्या : ल्युपिन, सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज्, ग्लेनमार्क, झायडस कॅडिला, बायोकॉन, अरविंदो, पिरामल फार्मा, अजंता फार्मा.
‘रणथंबोरच्या राणी’चा मृत्यू
‘रणथंबोरची राणी’ अशी ओळख असलेली वाघीण ‘मछली’चा १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
मछली गेल्या काही दिवसांपासून आजारी होती, तिने खाणेपिणेही सोडले होते. वनविभागाने एक पथक डॉक्टरांसह मछलीच्या देखभालीसाठी पाठवले होते.
मछली १९ वर्षांची होती. सामान्यपणे वाघ १३ ते १५ वर्षांपर्यंत जगतात मात्र १९ वर्षे जगलेल्या मछलीच्या बाबतीत अपवाद ठरला.
मछली वाघीण ही रणथंबोरची राणी म्हणून ओळखली जायची. तिच्या चेहऱ्यावर माशासारख्या खुणा असल्याने तिला मछली हे नाव पडले होते.
रणथंबोरला भेट देणाऱ्या पर्यटकांचे ती खास आकर्षण होती. गेल्या दहा वर्षात तिच्या वास्तव्यामुळे रणथंबोर उद्यानाच्या उत्पन्नात १ कोटी डॉलरची भर पडली.
जगातील ‘मोस्ट फोटोग्राफ्ड’ अर्थात सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण अशी मछलीची ख्याती होती. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा