ऑल इंडिया रेडिओवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम बलूच भाषेत प्रसारित करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
त्यामुळे मोदींची ‘मन की बात’ आता लवकरच बलुचिस्तानमध्येही ऐकायला मिळणार आहे.
यामुळे रेडिओच्या माध्यमातून बलुचिस्तानचा आवाज बुलंद होण्यास हातभार लागणार आहे.
या निर्णयामुळे बलुचिस्तानमधील जनतेला ठाम मते मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या भूमिकेला बलूच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
पाकिस्तानकडून बलुच नागरिकांवर होणाऱ्या अनन्वीत अत्याचाराचा मुद्दा पंतप्रधान नरेद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पातळीवर लावून धरावा, अशी मागणी तेथील नेते व नागरीकांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारताला कोंडीत पकडण्याची रणनीती आखलेल्या पाकिस्तानला भारताने बलुच प्रकरणाला वाचा फोडून कडवे प्रत्युत्तर दिले आहे.
सिंगूरमधील भूसंपादन बेकायदेशीर
पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील टाटा नॅनो प्रकल्पासाठी झालेले भूसंपादन सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने १२ आठवड्यांमध्ये जमीन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना परत करावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
टाटा मोटर्सला सिंगूरमध्ये नॅनो गाड्यांचा प्रकल्प सुरु करण्यासाठी हजारो एकरची जमीन देण्यात आली होती.
मात्र प्रकल्पासाठी राबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रीया बेकायदेशीर पद्धतीने राबवल्याचा आरोप करत शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेतली होती.
कोलकाता हायकोर्टाने २००८मध्ये भूसंपादन प्रक्रियेला वैध ठरवले होते. या निर्णयाला शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
सरकारने प्रकल्पासाठी केलेले भूसंपादन हे घाईगडबडीत आणि नियम धाब्यावर बसवून करण्यात आले असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले होते.
गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांना मिळालेली भरपाईदेखील त्यांना सरकारला परत करण्याची गरज नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुवर्ण रोखे योजनेचा पाचवा टप्पा
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण रोखे योजनेचा पाचवा टप्पा एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
गोल्ड बाँडच्या माध्यमातून केंद्र सरकार गुंतवणूकदारांना धातूच्या खरेदीपासून लांब ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार बाँडसाठी १ सप्टेंबर २०१६ ते ९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
या बाँडची विक्री सार्वजनिक बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालये, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
गोल्ड बाँड योजनेला अधिक आकर्षक बनविण्यासाठी केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यात बऱ्याच उपाययोजना केल्या.
त्याअंतर्गत बाँडमध्ये गुंतवणुकीची किमान मर्यादा २ ग्रॅमवरून १ ग्रॅमवर आणण्यात आली.
कोणीही व्यक्ती अथवा संस्था एका आर्थिक वर्षात ५०० ग्रॅमपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकणार नाही.
सुरुवातीच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज मिळेल. दर सहा महिन्यांनी व्याज देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोल्ड बाँड योजना जाहीर करण्यात आली होती.
‘टीजेएसबी’ला यूपीआयचा वापर करण्याची अनुमती
सहकार क्षेत्रातील अग्रणी ठाणे जनता सहकारी बँकेला (टीजेएसबी) भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगमने (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा (यूपीआय) वापर करण्याची अनुमती दिली आहे.
अशी मान्यता मिळवणारी ‘टीजेएसबी’ देशातील पहिली बँक आणि एकमेव सहकारी बँक ठरली आहे.
यूपीआय प्रणालीसाठी टीजेएसबी बँकेने विकसित केलेले ‘ट्रान्सझॅप’ हे अॅप हे कार्यान्वित झाले आहे.
यातून बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. पन्नास हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार कॅशलेस होणार आहेत.
या सर्व प्रणालीत सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. हे अॅप गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
यासाठी टीजेएसबी बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. ट्रान्सझॅप अॅप डाऊनलोड करणाऱ्या सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे.
‘आप’ सरकारच्या निर्णयांच्या तपासणीसाठी समिती
आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने दिल्लीत घेतलेले अनियमित व तकलादू निर्णय शोधण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापनादिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केली.
या समितीत माजी महालेखापाल व्ही. के. शुंगलू, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी आणि माजी दक्षता आयुक्त प्रदीप कुमार यांचा समावेश आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारचे प्रशासकीय प्रमुख नायब राज्यपाल नजीब जंग असल्याचा निर्णय नुकताच दिला आहे. ‘आप’ सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात अधिकारांचा वाद सुरू होता.
‘आप’ सरकारच्या निर्णयातील त्रुटी, अनियमितता तपासण्यासाठी दिल्ली शहरातील विविध विभागांनी जंग यांच्याकडे फायली सादर केल्या आहेत.
या फायलींची तपासणी समिती करेल. समितीने अहवाल सादर केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
बराक ओबामा अखेरचा आशिया दौरा
जागतिक तापमानवाढ, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आशियाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पुढील आठवड्यात आशियामध्ये येणार आहेत.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील हा अखेरचा आशिया दौरा असेल.
एका आठवड्याच्या या दौऱ्यादरम्यान ओबामा चीन आणि लाओसला भेट देणार आहेत. लाओसला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरतील.
चार सप्टेंबरला चीनमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेला ओबामा उपस्थित राहणार असून, या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील.
एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वाधिक धावांचा विक्रम
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडच्या खात्यावर जमा झाला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० षटकांमध्ये ३ गडींच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या.
हेल्सच्या १७१ धावा आणि जॉस बटलच्या ५१ चेंडूत नाबाद ९० धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला हा पल्ला गाठता आला.
या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात २७५ धावांत गारद झाला.
यापूर्वी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता.
श्रीलंकेने नेदरलँडविरुद्ध खेळताना २००६मध्ये ५० षटकांत ९ गडी गमावत ४४३ धावा केल्या होत्या.
यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध ४३९ तर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध ४३८ धावा केल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा