जीएसटी विधेयक आसाम विधानसभेत मंजूर
- आसाम विधानसभेने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयक सर्वसंमतीने मंजूर केले.
- केंद्र शासनानंतर संपूर्ण देशात समान कर पद्धत राबविण्याचा प्रस्ताव असलेले जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम पहिले राज्य ठरले आहे.
- संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले जीएसटी विधेयक आसाम विधानसभेत सर्वसंमतीने मंजूर केले गेले. विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि एआययूडीएफच्या सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला.
- संसदेच्या मान्यतेनंतर जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी २९ पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
- आसामचे मुख्यमंत्री : सर्वानंद सोनोवाल
संसदेचे पावसाळी अधिवेशन समाप्त
- संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्ट रोजी समाप्त झाले त्याचबरोबर संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले.
- भारताच्या करसुधारणांमधे स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले वस्तू व सेवा कराबाबतचे (जीएसटी) १२२वे घटना दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आणि त्यातील दुरुस्त्यांसह लोकसभेनेही ते संमत केले.
- या २० दिवसांच्या अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर झाली त्यापैकी १३ मंजूर झाली तर राज्यसभेत १४ विधेयके मंजूर करण्यात आली.
- उभय सभागृहांत प्रत्येकी २० दिवसांच्या कामकाजात लोकसभेत १२१ तास तर राज्यसभेत ११२ तास कामकाज झाले.
- काश्मीरमधील तणाव व सद्यस्थितीबाबत उभय सभागृहात गंभीर वातावरणात चर्चा झाली. काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन करीत सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करणारा एक प्रस्तावही दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला.
- लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या भाषणानंतर संसदेचे कामकाज संस्थगित झाले.
शौचालय निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम
- राज्यातील नागरी लोकवस्तीची वाटचाल हागणदारीमुक्तीकडे सुरू असून, ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
- तर महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.
- महाराष्ट्रात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात १,६४,८७१ शौचालयांची उभारणी झाली आहे, तर ८८,११७ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे.
- ‘स्वच्छ भारत शहर अभियाना’स महाराष्ट्रात १५ जून २०१५ रोजी सुरवात झाली. या कार्यक्रमांतर्गत राज्यात ८.३२ लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
- देशांतर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा क्रमांक सर्वप्रथम लागतो. महाराष्ट्रात आतापर्यंत १०० शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.
- राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे. यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त १७ हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
- यामध्ये केंद्र सरकार ४ हजार, राज्य सरकार ८ हजार रुपये व स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त ५ हजार रुपये इतकी मदत करते. उरलेला खर्च लाभार्थीला उचलावा लागतो. एका शौचालयासाठी २० हजार रुपये खर्च येतो.
सर्वाधिक शौचालय निर्मिती केलेली राज्ये | |
---|---|
महाराष्ट्र | १,६४,८७१ |
गुजरात | १,५९,३७१ |
मध्यप्रदेश | १,३१,५२९ |
आंध्रप्रदेश | १,२७,७१२ |
छत्तीसगड | ७६,११२ |
अपडेट्स : रिओ २०१६
विकास क्रिशन यादवचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
- भारताचा बॉक्सिंगपटूविकास क्रिशन यादव याने बॉक्सिंगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, आता तो पदकापासून एक सामना दूर आहे.
- माजी आशियाई सुवर्णपदक विजेता विकासने ७५ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी तुर्कस्तानच्या ओंडर सिपल याचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
- रिओ ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहचणारा विकास हा पहिला भारतीय खेळाडू आहे.
- विकासचा उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या बेक्तेमीर मेलीकुझीव याच्याशी लढत होणार आहे. मेलीकुझीव हा जागतिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता आहे.
केटी लिडेकीला चौथे सुवर्णपदक
- अमेरिकेची महिला जलतरणपटू केटी लिडेकीने ८०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत रिओ ऑलिंपिकमधील चौथे सुवर्णपदक पटकाविले.
- अंतिम फेरीत तिने ८ मिनिट ०४.७९ सेकंदात ८०० मी. अंतर पार करत विश्वविक्रम नोंदविला. यापूर्वी तिने ८ मिनिट ०६.६८ सेकंदांत हे अंतर पार केले होते.
- लिडेकीचे या ऑलिंपिकमधील हे चौथे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने २०० मीटर फ्रीस्टाईल, ४०० मीटर फ्रीस्टाईल, ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपद मिळविले.
- लिडेकीचे हे ऑलिंपिकमधील एकूण पाचवे सुवर्णपदक आहे. तिने २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये एक सुवर्ण मिळविले होते.
फेल्प्सला कारकिर्दीतील २७वे पदक
- अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या रिओ ऑलिंपिक अभियानाचा शेवट १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक मिळवून केला.
- त्याने या ऑलिंपिकमध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळविले. मायकेल फेल्प्सच्या कारकिर्दीतील हे एकूण २७वे पदक आहे. यामध्ये २२ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
- फेल्प्सने या ऑलिंपिकमध्ये ४ सुवर्णपदके मिळविलेली आहेत. त्याने २०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मिडले व रिले आणि ४ बाय ४०० मीटर मिडले प्रकार अशी चार सुवर्ण पटकाविली आहेत.
- या ऑलिंपिकनंतर निवृत्त होणार असल्याचे फेल्प्सने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. फेल्प्सने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये आठ सुवर्णपदके मिळविली होती.
नदाल-लोपेझला पुरुष दुहेरीत सुवर्णपदक
- स्पेनच्या राफेल नदालने मार्क लोपेझच्या साथीने रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले.
- नदाल व लोपेझ यांच्या जोडीने रोमानियाच्या फ्लोरीन मर्जिया आणि होरिया तेकायू यांचा ६-२,३-६,६-४ असा पराभव केला.
- नदाल आणि लोपेझ हे लहानपणीचे मित्र आहेत. नदालला मे महिन्यात आपल्याला मनगटाच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार घ्यावी लागली होती.
एनपीसीआयचे *९९# मोबाइल ॲप सादर
- राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशनने (एनपीसीआय) अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेन्टरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) या प्रणालीवर आधारित *९९# हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे.
- हे अॅप्लिकेशन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणारी युनियन बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक ठरली आहे.
- युनियन बँकेने हे अॅप यूएसएसडी मंचावर अॅड्रॉइड प्रणालीच्या साह्याने लाँच केले आहे. या अॅपचे नाव बँकेने 'युनियन बँक *९९#' असे ठेवले आहे.
- ग्राहकांना आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेणे, मिनी स्टेटमेंट पाहणे, पैसे हस्तांतरित करणे असे व्यवहार करणे या अॅपमुळे सोपे होणार आहे.
मेस्सीने निवृत्ती मागे घेतली
- अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने जुलै महिन्यात कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर तडकाफडकी जाहीर केलेली निवृत्ती मागे घेतली आहे.
- २९ जुलै रोजी ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेतील अंतिम सामन्यात चिलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये झालेल्या पराभवानंतर मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली होती.
- अनेक सामन्यांमध्ये अर्जेंटिनासाठी तारणहार ठरलेल्या मेस्सीला अखेरपर्यंत देशाला मोठ्या स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.
- मेस्सी २००५मध्ये अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघात दाखल झाला होता. त्यानंतर एकाही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद संघाला मिळवता आले नाही.
- याउलट बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने बार्सिलोनाला प्रतिष्ठीत 'ला लिगा' स्पर्धेचे ८ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे.
आयआयजीजे संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी किरीट भन्साली
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी (IIGJ) संस्थेच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी किरीट भन्साली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- तर संचालकपदी नमिता पांड्या, अनिल विरानी, अशोक गजेरा यांची निवड करण्यात आली आहे.
- नवनियुक्त अध्यक्ष किरीट भन्साली हे प्रख्यात उद्योजक आहेत. तसेच, जागतिक स्तरावरील ‘स्काय जेम्स अँड स्मितल जेम्स’चे भागीदारही आहेत.
- भन्साली हे जेम ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल आणि भारत डायमंड बोर्सचे सदस्यही आहेत.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी संस्थेने बीए डिगरी इन ज्वेलरी या अभ्याक्रमासाठी मेवार विद्यापीठाशी सहकार्य घेतले आहे.
- तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी संस्था सध्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहयोगाने ज्वेलरी व्यवस्थापन क्षेत्रातही संशोधनात्मक अभ्यास करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा