चालू घडामोडी : ३ सप्टेंबर

तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता

  • निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे.
  • राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी एखाद्या पक्षाला किमान चार राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे.
  • निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वितरण) आदेश १९६८मधील ही एक अट तृणमूल काँग्रेसने पूर्ण केली आहे.
  • तृणमूल काँग्रेस हा सध्या पश्चिम बंगाल, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशामधील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे.
  • आता भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे सात मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष झाले आहेत.
  • एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास, या पक्षाचे निवडणूक चिन्ह देशभरातील कुठल्याही निवडणुकीत इतर कुणाला वापरता येत नाही.
  • इतर नोंदणीकृत, मात्र मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना अनेक ‘मुक्त चिन्हांमधून’ निवडणूक चिन्हाची निवड करावी लागते.
  • मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी पक्षाला खालील तीनपैकी कमीतकमी एक निकष पूर्ण करावा लागतो.
  • पक्षाने ३ वेगवेगळ्या राज्यातून लोकसभेतील किमान २ टक्के (सध्या ११ जागा) जिकल्या पाहिजेत.
  • पक्षाला चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे.
  • लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाला किमान ४ राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळवणे आवश्यक आहे तसेच लोकसभेत ४ जागा जिंकल्या पाहिजेत.

भारत आणि इजिप्त दरम्यान सहकार्य करार

  • आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला सर्वांत मोठा धोका असलेल्या दहशतवादाचा सर्व पातळ्यांवर सामना करण्यासाठी भारत आणि इजिप्त यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सीसी यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये परस्परांमधील सुरक्षा सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला गेला.
  • इजिप्त हा देश ईशान्य आशिया तसेच पश्चिम आशियामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. 
  • दोन्ही देशांनी सुरक्षा व्यापार, प्रशिक्षण तसेच क्षमतानिर्माण वाढविण्याच्या निर्णयांसह अन्य अनेक क्षेत्रांतील संबंधांना चालना देण्यासाठी सहमती दर्शविली. 
  • दोन्ही देशांनी व्यापारी तसेच वाणिज्य संबंधही भक्कम करण्याचा निर्णय घेतला.

नरेंद्र मोदी एकदिवसीय व्हिएतनाम दौऱ्यावर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिएतनाम दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, माहिती व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
  • व्हिएतनामचे अध्यक्ष ट्राम दाई क्वांग, पंतप्रधान गुयेन जुआन फुक आदी नेत्यांनी मोदींशी चर्चा केली.
  • संरक्षण सहकार्यांतर्गत व्हिएतनामला ५० कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणाही मोदींनी केली. १५ वर्षामधील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच व्हिएतनाम दौरा आहे.
  • दक्षिण चीन समुद्रावरुन व्हिएतनाम चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • हनोई येथे ३ सप्टेंबर रोजी सकाळी नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. मोदींना व्हिएतनामच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनरही दिला.
  • व्हिएतनाम दौऱ्यानंतर मोदी चीनमधील हाँगझोऊ येथे रवाना होतील. हाँगझोऊ येथे ४ आणि ५ सप्टेंबर रोजी जी-२० परिषद पार पडणार आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंचा ‘आवाज-ए-पंजाब’

  • भाजपचे बंडखोर नेते माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी ‘आवाज- ए-पंजाब’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षामुळे राजकीय समीकरणे आमूलाग्र बदलू शकतात.
  • भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार परगतसिंग आणि बियांस बंधू यांच्या पुढाकाराने या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
  • जुलै २०१६मध्ये सिद्धूने भाजपमधून बाहेर पडत राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता.
  • सिद्धूंसारखा नेता आम आदमी पक्षामध्ये यावा म्हणून अरविंद केजरीवालांनीही प्रयत्न सुरु केले होते.
  • ‘आप’ने आपल्यालाच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार करावे, अशी अट सिद्धू यांनी केजरीवालांना घातली होती.
  • याबद्दल एकवाक्यता न झाल्यामुळे त्याने नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय सिद्धू यांनी घेतला आहे.

स्पेस-एक्सच्या रॉकेटचा उड्डाणापूर्वी स्फोट

  • खासगी मालकीची अवकाश कंपनी असलेल्या ‘स्पेस-एक्स’च्या रॉकेटचा उड्डाणापूर्वी प्रक्षेपण तळावरच स्फोट झाला. 
  • फ्लोरिडातील केप कॅनाव्हेराल येथील प्रक्षेपण तळावर २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
  • या घटनेत फेसबुकचेही मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग असलेला उपग्रह या स्फोटात भस्मसात झाला. 
  • इस्राईलमध्ये संदेशवहनासाठी वापरण्यात येणारा फेसबुकच्या मालकीचा उपग्रह या रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात येणार होता.
 ‘ऍमॉस-६’ उपग्रह 
  • आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भागात ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी फेसबुकद्वारे ऍमॉस-६ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार होता.
  • इस्राईलच्या यूटेलसॅट कम्युनिकेशन्स या कंपनीतर्फे या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • इंटरनेट डॉट ओआरजी या प्रकल्पाच्या अंतर्गत फेसबुककडून या उपग्रहाचा उपयोग करण्यात येणार होता.
  • ऍमॉस-६ उपग्रहाची किंमत सुमारे २० कोटी डॉलर ऐवढी होती.
 ‘स्पेस-एक्स’ 
  • टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक असलेले इलॉन मस्क हे ‘स्पेस-एक्स’चेही संस्थापक आहेत.
  • ‘पे-पल’सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांशी संबंधित असलेले मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या स्थानी आहेत.
  • मंगळावर मानवाची वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मस्क यांना अवकाश पर्यटन सुरू करायचे आहे.
  • त्यासाठी मस्क यांनी या कंपनीची स्थापना केली असून, ‘नासा‘सारख्या अनेक संस्था ‘स्पेस-एक्स’कडून अवकाश मोहिमांसाठीच्या साहित्याची खरेदी करतात.  

उझबेकिस्तानचे राष्ट्रपती कारिमोव्ह यांचे निधन

  • उझबेकिस्तानचे राष्ट्रपती इस्लाम कारिमोव्ह यांचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
  • कडव्या इस्लामवादाचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे कारिमोव्ह हे गेल्या २७ वर्षांपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी होते.
  • १९९१मध्ये सोव्हिएत रशियामधून बाहेर पडल्यावर कारिमोव्ह यांनी सत्ता काबीज केली होती.
  • सोव्हिएत रशियातून बाहेर पडण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्वही कारिमोव्ह यांनी केले आहे.
  • कडव्या इस्लामवादाचे विरोधक असले तरी कारिमोव्ह हे स्वतः हुकूमशहा होते. त्यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे उझबेकिस्तानवर पाश्चिमात्य देशांनी निर्बंधही घातले होते.  
  • सत्तेवर आल्यापासून कारिमोव्ह यांनी त्यांच्या विरोधकांना तुरुंगात डांबून, तुरुंगात त्यांच्यावर अमानूष अत्याचारही केले होते.
  • कारिमोव्ह यांनी अमेरिकेविरोधातही कणखर भूमिका घेतली होती. स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली अमेरिकेने उझबेकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लुडबूड करु नये असे खडे बोल त्यांनी सुनावले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा