गेली ९२ वर्षे स्वतंत्रपणे मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प यापुढे स्वतंत्रपणे न मांडता तो सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यास मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली.
तसेच केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसाऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
याशिवाय यापुढे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात व खातेपुस्तकांत खर्चाची नियोजन खर्च व नियोजनबाह्य खर्च अशी विगतवारी करण्यात येणार नाही.
मंत्रिमंडळाने वित्त मंत्रालयाचे अर्थसंकल्पीय सुधारणांचे वरील तीन प्रस्ताव संमत केले. हे तिन्ही बदल २०१७-१८च्या आगामी अर्थसंकल्पापासून लागू होतील.
अर्थसंकल्प २८ किंवा २९ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी मांडण्यास तत्त्वत: मंजुरी दिली गेली आहे.
अर्थसंकल्प मंजुरीच्या आणि विनियोजनाच्या सर्व संसदीय प्रक्रिया नवे वित्तीय वर्ष सुरू होण्याआधी म्हणजे मार्चअखेर पूर्ण व्हाव्यात हा हेतू आहे.
नव्या वेळापत्रकानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे १५ दिवस आधी सुरू करावे लागेल.
स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला तरी रेल्वेची वित्तीय आणि कार्यात्मक स्वायत्तता अबाधित राहील व रेल्वेच्या मागण्यांवर स्वतंत्रपणे चर्चा होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सानिया-बाबरेराला जपान ओपनचे जेतेपद
भारताची सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीने टोरे पॅन पॅसिफिक (जपान ओपन) टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले.
सानिया-बाबरेराने अंतिम लढतीत चेंग लिअँग व झाओक्युअॅन यांग या चिनी जोडीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.
मागील चार वर्षांतील सानियाचे हे तिसरे जपान खुल्या स्पर्धेचे जेतेपद आहे. याआधी तिने कारा ब्लॅकसह २०१३ व २०१४मध्ये अजिंक्यपद पटकावले होते.
सानिया-बाबरेराची एकत्र खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात सानिया-बाबरेरा जोडीने सिनसिनाटी खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
मात्र, अमेरिकन खुल्या स्पर्धेत सानिया-बाबरेरा जोडीला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.
सानियाने या वर्षांत आत्तापर्यंत आठ डब्लूटीए जेतेपदे पटकावली आहेत. त्यामध्ये हिंगीससह जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.
तसेच तिने ब्रिस्बेन, सिडनी, सेंट पिटर्सबर्ग, इटालियन आणि कॉनेक्टिकट खुल्या स्पर्धेतही बाजी मारली आहे. सानियाने कारकिर्दीत एकूण ४० दुहेरी गटातील जेतेपदे जिंकली आहेत.
रशिया पाकिस्तान युद्धसराव
पाकिस्तान बरोबर दहशतवाद विरोधी युद्धसराव करण्यासाठी रशियन सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकिस्तान बरोबरचा युद्धसराव रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण हा सराव रद्द झालेला नाही.
फक्त हा युद्धसराव पाकव्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नसून, पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे होणार आहे.
पाकिस्तान आणि रशियामध्ये प्रथमच असा युद्धसराव होत असून, या सरावाला ‘फ्रेन्डशिप २०१६’ असे नाव देण्यात आले आहे.
फ्रेन्डशिप २०१६अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्धसराव चालणार आहे. रशियाचे २०० जवान यात भाग घेणार आहेत.
रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे रशियाच्या पाकिस्तानसोबतच्या युद्ध सरावावर इतकी चर्चा सुरु आहे.
शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश तर, पाकिस्तान अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.
व्याघ्रसंवर्धनासाठी सरकारची प्रस्तावित योजना
छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे.
वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली नेक कॉलर, ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल.
आगामी दोन वर्षांत या उपकरणांची निर्मिती भारतात होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली.
एनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी (डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला आहे.
त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना, जिम कॉर्बेट, काझीरंगा, सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे.
नेक कॉलर, ड्रोनसारख्या उपकरणांमुळे वाघाच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
सोबतच जंगलातील मानवी हस्तक्षेपास प्रतिबंध करणेही यामुळे शक्य होणार असून, परिणामी शिकारीला आळा घालण्यात यश मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा