चालू घडामोडी : ६ सप्टेंबर
डॉ. ऊर्जित पटेल आरबीआयचे २४ वे गव्हर्नर
- रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार ६ सप्टेंबर रोजी स्वीकारला. ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत.
- वृद्धीला चालना देणारे धोरण आखणे आणि महागाईचे नियंत्रण अशा दुहेरी आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरपासून गृहीत धरला जाईल.
- जानेवारी २०१३पासून ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर ११ जानेवारी २०१६ रोजी त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी ३ वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली होती.
- ऊर्जित पटेल यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सेवेत होते. १९९६ ते १९९७ या काळात ते नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्तीवर आले.
- या काळात त्यांनी कर्ज बाजार, बँकिंग सुधारणा, पेन्शन सुधारणा आणि विदेशी चलन वाढविण्याबाबत त्यांनी रिझर्व्ह बँकेला बहुमोल सल्ला दिला.
लंडनमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेची जागतिक परिषद
- संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद ८ व ९ सप्टेंबर दरम्यान लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार आहे.
- १०० पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत.
- या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पंतप्रधान मोदींनी निवड केली आहे.
- गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या पीस किपींग ऑपरेशनसह विविध विषयांवर चर्चा करण्यास राष्ट्रप्रमुखांची परिषद न्यूयॉर्कला झाली होती.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मोदींसह ५० राष्ट्रप्रमुख या परिषदेला उपस्थित होते.
- वांशिक व अन्य प्रकारचे संघर्ष चालू असलेल्या जगभरातील अनेक देशांमध्ये राष्ट्रसंघाकडून त्रयस्थ देशांचे शांतीसैनिक तैनात केले जातात.
- सध्या भारताचे ६,८०० जवान आणि पोलीस अधिकारी शांतीसैनिक म्हणून जगभरातील संघर्षभूमीवर कार्यरत आहेत. अशा प्रत्यक्ष सहभागामध्ये भारताचा वाटा जगात दुसऱ्या क्रमांकाचा आहे.
- शांतता मोहिमेत भारताचा प्रत्यक्ष सहभाग सर्वाधिक आहे, पण निर्णयप्रक्रियेमध्ये फारसे स्थान नाही. हाच मुद्दा या परिषदेत डॉ. भामरे मांडतील.
युपी सरकारची समाजवादी स्मार्टफोन योजना
- विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता मोफत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे.
- नागरिक आणि सरकार यांच्यात संवाद साधता यावा, यासाठी सरकारने समाजवादी स्मार्टफोन या नावाने योजना सुरू करण्याचे ठरविले आहे.
- मात्र, या योजनेतून सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या वारसांना वगळण्यात आले आहे.
- सरकारच्या विविध योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहचावी, असाही उद्देश या योजनेचा आहे.
- स्मार्टफोनचे वाटप २०१७मध्ये करण्यात येणार असून, जो पहिला येईल आणि पहिली नोंदणी करेल त्यालाच स्मार्टफोन मिळेणार आहे.
- या स्मार्टफोनमध्ये सरकारच्या योजनांची संपूर्ण माहिती ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
- कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार टाळण्यासाठी या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.
- ज्यांचे वय १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्षे झाले आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखांपेक्षा कमी आहे, तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- उत्तर प्रदेशात झालेल्या २०१२मधील निवडणुकीत समाजवादी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले असून, त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे वचन पूर्ण केले आहे.
उत्तर कोरियाची पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी
- चीनमध्ये ‘जी-२०’ परिषद सुरु असताना आपली क्षमता दाखवून देण्याच्या उद्देशाने उत्तर कोरियाने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली.
- पूर्व समुद्र किनाऱ्यावर जपानी समुद्रात उत्तर कोरियाने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.
- दोन आठवड्यांपूर्वीही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. पाणबुडीतून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.
- चीनमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ परिषदेसाठी जगभरातील सर्व मोठे नेते हजर असताना क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्यामुळे उत्तर कोरियाच्या या कृतीकडे संशयाने पाहिले जाते आहे.
- अमेरिकेसह संपूर्ण जगालाच आव्हान देण्याचा प्रयत्न उत्तर कोरियाकडून सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा