चालू घडामोडी : १० सप्टेंबर

पॅरालिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक

  • रिओ येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिकमध्ये उंच उडी प्रकारात मरियप्पन थांगावेलू याने सुवर्णपदक तर वरुण भाटी याने ब्राँझपदक मिळवित इतिहास रचला.
  • मरियप्पनने १.८९ मीटर उंच उडी मारत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर भाटीने १.८६ मीटर उडी मारून ब्राँझ पटकाविले.
  • उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून देणारा मरियप्पन थांगावेलू पहिला खेळाडू ठरला आहे.
  • पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदकासाठी ५० लाख तर कांस्य पदकासाठी ३० लाख रुपये देऊन गौरवण्यात येणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले होते.
  • पॅरालिंपिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (जलतरण, १९७२ हेझवर्ग) आणि देवेंद्र झाझरिया (भालाफेक, २००४ अथेन्स) यांनी सुवर्णपदके मिळविलेली आहेत.
  • पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताने एकूण ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ ब्राँझ अशी १० पदके मिळविलेली आहेत.
  • पॅरालिम्पिकची सुरूवात १९४८मध्ये झाली होती. या खेळात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून त्रिशा जोर्नची ओळख आहे. तिने एकूण ५५ पदके पटकावली असून त्यात ४१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

उत्तर कोरियाची पुन्हा एकदा अणुचाचणी

  • ९ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अणुचाचणी केली. हिरोशिमावरील अणूबॉम्ब हल्ल्यापेक्षा या चाचणीची क्षमता अधिक जास्त होती.
  • गेल्या दहा वर्षांमध्ये पाचव्यांदा उत्तर कोरियाने अणूचाचणी करून शक्तिशाली देशांना झटका दिला आहे.
  • या चाचणीमुळे उत्तर कोरियातील अणुचाचणी स्थळ पुंगेरीमध्ये ५.३ रिश्टर स्केलचे कृत्रिम भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
  • या कृत्रिम भूकंपाचे धक्के जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनाही जाणवले. पुंगेरीपासून जपानची राजधानी टोकियो सुमारे १००० किलोमीटर दूर आहे. तरीही तिथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
  • उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनीही ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली चाचणी असल्याचा दावा केला आहे.
  • याआधी ६ जानेवारी रोजी उत्तर कोरियाकडून अणुचाचणी करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे कृत्रिम भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती.
  • यापूर्वी केलेल्या चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समूहानेही उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहेत. 
  • २००६ मध्ये उत्तर कोरियाने त्यांची पहिली अणुचाचणी केली होती. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांनी एकूण पाच वेळा त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. 

हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये १४ लाख लोकांचा मृत्यू

  • वर्ल्ड बँक, इन्सिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१३साली हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये १४ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.
  • हवा प्रदुषणामुळे झालेल्या वेगवेगळ्या आजारांमुळे जगभरात २०१३साली एकूण ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • विशेष म्हणजे यामधील ६० टक्के मृत्यू सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या चीन (१६ लाख ) आणि भारतात (१४ लाख) झाले आहेत. 
  • हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, हृदयाचे आजार होतात, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
  • १ लाख लोकांच्या मागे मृत्यूचे प्रमाण पाहिल्यास जगभरातील देशांमध्ये चीन सहाव्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश ११, श्रीलंका १२ आणि पाकिस्तान १५व्या क्रमांकावर आहे.

पंकज अडवाणीला कांस्यपदक

  • भारताचा स्नूकर खेळाडू पंकज अडवाणीने प्रतिष्ठेच्या ६ रेड स्नूकर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.
  • या स्पर्धेत पदक पटकावणारा पंकज अडवाणी हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा