भारताच्या देवेंद्र झाझरिया याने आपल्याच विश्वविक्रमी कामगिरीला मागे टाकत रिओ पॅरालिंपिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
पॅरालिंपिक स्पर्धेत त्याने मिळविलेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. पॅरालिंपिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
झाझरियाने यापूर्वी २००४अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत ६२.१५ मीटर भालाफेक करून विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई केली.
रिओत त्याने आपलीच कामगिरी मागे टाकत ६३.९७ मीटरचा नवा जागतिक उच्चांक नोंदवला. झाझरिया हा सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.
झाझरियाच्या सुवर्णपदकाने पॅरालिंपिक स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण, एक रौप्य, एक ब्राँझ अशी चार पदके झाली आहेत.
मूळ राजस्थानचा असलेल्या झाझरिया याला २००४ मध्ये ‘अर्जुन’ आणि २०१२ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.
वयाच्या आठव्या वर्षी झाडावर चढताना झाडाजवळून गेलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून झाझरियाला आपला डावा हात गमवावा लागला. यानंतरही त्याने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जिद्दीने झेप घेतली.
‘फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्रियांका चोप्राच्या नावाचा समावेश करण्यात आला असून, या यादीत ती आठव्या स्थानावर आहे.
प्रियांका हि फोर्ब्सच्या टीव्ही स्टार यादीत समावेश होणारी पहिली भारतीय महिला अभिनेत्री आहे.
गेल्यावर्षी एबीसीच्या ‘क्वांटिको’ मालिकेमधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.
प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या सिनेमातून ती हॉलिवूड सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती ड्वेन जॉनसन या अभिनेत्यासोबत दिसणार आहे.
याशिवाय नुकताच तिचा हॉलिवूडच्या ‘द न्यू रॉयल रिस्ट’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
नुकतीच फोर्ब्सने जगातील सर्वात महागड्या चित्रपट अभिनेत्रीची यादी जाहीर केली होती. त्यात दीपिका पदुकोण १०व्या क्रमांकावर होती.
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन करार
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान १५ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय शिखर वार्ता होऊन तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामध्ये दहशतवादी, आर्थिक गुन्हेगारांचे हस्तांतरण अशा महत्त्वपूर्ण करारांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अध्यक्ष अश्रफ गनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिष्टमंडळीय वाटाघाटींमध्ये प्रामुख्याने दहशतवाद आणि त्यामुळे उपखंडाला उत्पन्न झालेला धोका यावर व्यापक चर्चा झाली.
चर्चेचा प्रमुख भर दहशतवाद आणि त्याच्याशी संबंधित अन्य मुद्यांवर होता. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या तस्करीच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली.
अफगाणिस्तानला भारताकडून काही शक्तिशाली शस्त्रे, उपकरणे आणि हेलिकॉप्टर हवी आहेत. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
अफगाणिस्तानला भारताने १ अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत देण्याचे भारताने मान्य केले आहे. याखेरीज औषधे, गहू व अन्य जीवनावश्यक वस्तूंची मदतही केली जात आहे.
तसेच या भेटीत सौरऊर्जेबाबत सहकार्य करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
एंब्रेअर विमान खरेदी कराराची सीबीआयकडून चौकशी
२००८च्या एंब्रेअर विमान खरेदी करारात लाच घेतली गेल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत.
स्वदेशी रडारने सज्ज अशा तीन विमानांसाठी ब्राझीलची विमाननिर्मिती कंपनी एंब्रेअर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या दरम्यान २००८मध्ये हा करार झाला होता.
डीआरडीओसाठी वैमानिक पूर्वसूचना आणि नियंत्रणप्रणालीने (एअरबोर्न अर्ली वॉर्निग अँड कंट्रोल सिस्टीम) सुसज्ज असलेली तीन विमाने खरेदी करण्यात आली होती.
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात झालेला हा करार लाचखोरीच्या आरोपांमुळे अमेरिकी अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे.
डीआरडीओने या प्रकरणी ब्राझीलच्या कंपनीकडून अहवाल मागवला होता त्यात असे म्हटले होते, की गेल्या पाच वर्षांतील दलालीच्या आरोपांची आम्ही चौकशी करीत आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा