रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची गोळाफेपटू दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना, रौप्यपदकाला गवसणी घातली.
पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी दीपा पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली नाही.
दीपा मालिकने सहा प्रयत्नात ४.६१ मीटर अंतरावर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. हे भारताचे रिओ पॅरालिम्पिकमधील तिसरे पदक आहे.
यापूर्वी रिओमध्ये उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलू याने सुवर्ण तर वरूण भाटीनेही कांस्यपदक पटकावत भारताचे पदकाचे खाते उघडले होते.
बहरिनच्या फतेमा नदीमने ४.७६ मीटर अंतरावर गोळा फेकत सुवर्णपदक तर ग्रीसच्या दिमीत्रा कोरोकिडाने ४.२८ मीटरसह कास्य पदक पटकाविले.
दीपा मलिक मणक्याच्या कर्गरोगाने त्रस्त असून, ती सेना अधिकाऱ्याची पत्नी व दोन मुलांची आईदेखील आहे.
जीएसटी परिषद स्थापनेस मंजुरी
राष्ट्रपतींनी जीएसटी घटना दुरुस्ती विधेकाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषद स्थापन करण्यास परवानगी दिली.
यानंतर जीएसटीचा अंतिम टप्प्याचा प्रवास सुरु होणार आहे. या परिषदेकडे कराची दररचना निश्चित करण्याची जबाबदारी असणार आहे.
या परिषदेची स्थापना ११ नोव्हेंबरपर्यंत केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतील. तर राज्यांचे अर्थमंत्री या परिषदेचे सदस्य असतील.
केंद्र सरकारने अप्रत्यक्ष करप्रणालीत १ एप्रिल २०१७ पर्यंत सुधारणा करण्याची वेळ निश्चित केली आहे. आता जीएसटी परिषद कशावर कर लावायचा आणि किती याची दररचना तयार करेल.
उत्पादन आणि सेवांवरील कर, पेट्रोलियम पदार्थांवरील कर, सरचार्ज, सेस असे कोणकोणते मुद्दे जीएसटीअंतर्गत येणार याचा ही समिती अभ्यास करणार आहे.
याशिवाय जीएसटी कायदा, जीएसटी कर आकारणी करण्याची पद्धत आणि त्याची रुपरेखा तयार करण्याची धूराही या परिषदेकडे असणार आहे.
जीएसटी कर आकारणीवरील तक्रारीचे निवारण करण्यासाठी काय करता येईल? याचाही ही परिषद अभ्यास करेल.
हे सर्व निर्णय उपस्थित सदस्यांच्या हजेरीत घेतले जाणार असून त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी उपस्थित सदस्यांपैकी २/३ मते मिळणे आवश्यक आहे. यात केंद्र सरकारच्या निर्णयाचे १/३ तर राज्यांचे २/३ वेटेज असणार आहे.
महाराष्ट्रातही मिशन भगीरथ
मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून मुक्तता करण्यासाठी तेलंगणच्या धर्तीवर ‘मिशन भगीरथ’ ही वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गावे व शहरांना बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणारा ४२ हजार कोटी रुपयांच्या खर्चातून आकाराला येत असलेल्या मिशन भगीरथ हा तेलंगण सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. संपूर्ण पाण्याचे स्रोत आटले गेल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. लातूरला रेल्वेने पाणी दिले गेले.
त्यामुळे मराठवाड्याला टॅंकरवाड्यातून मुक्त करण्यासाठी शहरे व गावांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी महाराष्ट्रातील पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे मुख्य अभियंता आदींसह तेलंगणा वॉटर ग्रीडच्या प्रकल्पाची पाहणी व अभ्यास केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व मंत्रिमंडळाने यास तत्त्वत: मान्यता दिल्याचे राज्य पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे.
राजखोवा यांना अरुणाचल राज्यपालपदावरून हटवले
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर राज्यपालपदावरुन हटवले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय पेच निर्माण झाला असताना राजखोवा यांनी घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
त्यांच्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजूर केल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरुन केंद्र सरकारला फटकारले होते व अरुणाचलमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली होती.
अरुणाचलच्या मुद्द्यावरुन राजखोवा यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केल्याचा दावा करत, गृहमंत्रालयाने राजखोवा यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती.
मात्र राजखोवा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींनी पदावरुन हटवल्यावरच मी जाईन अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शेवटी गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना राजखोवा यांना हटवण्याची शिफारस केली.
राजखोवा यांनी राजीनामा दिल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्याकडे अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
राजखोवा यांना जून २०१५ मध्ये अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद देण्यात आले होते.
वॉवरिन्काला यूएस ओपनचे विजेतेपद
स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काने जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या मानांकीत स्टॅन वॉवरिन्काचे हे पहिलेच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आहे.
तसेच त्याच्या कारकिर्दीतील हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिन्ही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे मिळविताना त्याने अंतिम सामन्यात जोकोविचलाच हरविले आहे.
वॉवरिन्काने अंतिम फेरीत जोरदार खेळ करत गतविजेत्या जोकोविचला ६-७, ६-४, ७-५, ६-३ असे पराभूत केले.
दिल्लीत इंडो-यूएस परिषद
भारत व अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक यासाठी दोन्ही देशांची दोन दिवसीय संयुक्त परिषद १४ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
वाणिज्य, प्रशासन व शिक्षण या क्षेत्रांतील तज्ज्ञ तसेच मान्यवर या परिषदेत सहभागी होतील.
दोन्ही देशांमधील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर कसा नेता येईल याबाबत परिषदेत विचार विनिमय करण्यात येईल.
या परिषदेचे उद्घाटन अमेरिकेतील भारतीय राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या हस्ते होईल. परिषदेला केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
आपचा शेतकरी जाहीरनामा
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने १२ सप्टेंबर रोजी शेतकरी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
बारा मुद्द्यांचा समावेश असलेल्या जाहीरनाम्यात मोफत वीज, व्याजमाफी, कर्जमाफीसारखी विविध आश्वासने देण्यात आली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा