ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्तनवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे लवकरच त्यांची जागा घेतील.
भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९८०च्या बॅचचे असलेल्या सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून बराच काळ काम केले आहे. अत्यंत मुत्सद्दी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रशासकीय कारभार सांभाळायचा आहे.
राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका संबंध कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
सरना यांनी २००८ ते २०१२ या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
मॉस्के, वॉर्सा, तेहरान, जीनिव्हा, थिंपू आणि वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
याशिवाय श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरणजितसिंग सिद्धू यांची नियुक्ती झाली आहे.
विसरनाई चित्रपट ऑस्करमध्ये
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तमीळ चित्रपट विसरनाई यावर्षीच्या ऑस्करमधील उत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या गटात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे.
पुढील वर्षीच्या ऑस्करमध्ये परदेशी चित्रपटांच्या गटातील २९ चित्रपटांशी भारताचा विसरनाई हा चित्रपट स्पर्धा करणार आहे.
गुन्हेगारीपट असलेल्या विसरनाई चित्रपटाचा निर्माता अभिनेता धनुष हा असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन वेत्रीमारन यांनी केले आहे.
एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. दिनेश रवी, आनंदी आणि आडुकुलम मुरुगदास यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
पोलिसी क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निरागसतेचा होणारा लोप याचे दर्शन चित्रपट घडवितो.
या चित्रपटाला उत्कृष्ट तमीळ चित्रपट, उत्कृष्ट सहायक अभिनेता समुथीरकनी आणि उत्कृष्ट संपादन किशोर टी असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इटालिया पुरस्कार’ मिळाला होता.
टाईम्सच्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्था
‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रँकिंग्ज २०१६-१७’च्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे.
या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. गेल्या १२ वर्षांत प्रथमच यूकेमधील शिक्षण संस्था या क्रमवारीत अग्रस्थानी राहिली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर तिसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे.
बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘आयआयएस्सी’ ही या क्रमवारीत सर्वांत पुढे असलेली भारतीय संस्था ठरली आहे.
या यादीत पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय शिक्षण संस्था नाही. तर पहिल्या ४०० विद्यापीठांमध्ये केवळ दोनच भारतीय शिक्षण संस्था आहेत.
त्यामध्ये आयआयएस्सी (२०१ ते २५०मध्ये) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-मुंबई) (३५१ ते ४००मध्ये) या संस्थांचा समावेश आहे.
आयआयटी-दिल्ली, आयआयटी-चेन्नई आणि आयआयटी-रुरकी या भारतीय शिक्षण संस्थाही 'टाइम्स'च्या यादीत आहेत.
याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत.
एकूण ९८० शिक्षण संस्थांच्या या क्रमवारी यादीत यंदा दक्षिण आशियातील ३९ शिक्षण संस्था असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुपटीने वाढली आहे.
यात श्रीलंकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबोचा समावेश आहे, तर पाकिस्तानच्या सात संस्थांचा यात समावेश आहे.
गुजरातमध्ये ऍट्रॉसिटी खटल्यांसाठी १६ विशेष न्यायालये
दलित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दलित आदिवासी अत्याचाराच्या (ऍट्रॉसिटी) खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी गुजरातमध्ये १६ विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
याबाबत गुजरातच्या विधी विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात असून, गुजरातमधील ही सर्व न्यायालये १ ऑक्टोबरपासून कार्यरत होणार आहेत.
या न्यायालयांमध्ये फक्त ऍट्रॉसिटी कायदा १९८९, संदर्भातीलच खटल्यांची सुनावणी होणार असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
१५ जिल्ह्यांमध्ये ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. अहमदाबादमध्ये शहर दिवाणी न्यायालय आणि ग्रामीण न्यायालय अशी दोन न्यायालये असणार आहेत.
गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानेच ही सर्व न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
उणा येथे दलित तरुणांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दलित संघटनांनी आंदोलन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा