पाकिस्तानच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह विधेयक अखेर २७ सप्टेंबर रोजी मंजूर झाले.
या विधेयकामुळे पाकमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील विवाहांना कायद्याचे संरक्षण मिळणार आहे.
याशिवाय ‘तलाक’ आणि जबरदस्तीने करण्यात येणाऱ्या धर्मांतरालाही यामुळे लगाम बसणार आहे.
पाकमध्ये गेल्या ६६ वर्षांपासून हिंदू विवाहांची नोंदणी होत नव्हती. नवा कायदा अमलात आल्यानंतर विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
हिंदूंसोबतच जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ख्रिश्चन समाजही असून या सर्वांना हिंदू विवाह कायदा लागू होणार आहे.
भारत अमेरिका ‘युद्ध अभ्यास २०१६’
भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला. ‘युद्ध अभ्यास २०१६’ या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.
युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला.
या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे २२५ जवान आणि अमेरिकी सैन्याचे २० इन्फन्ट्री रेजिमेंटचे २२५ सैनिक सहभागी झाले होते.
अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या २००४पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.
या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.
उत्तम सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१६ जाहीर करण्यात आला.
पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्यांनी एकमताने उत्तम सिंग यांची निवड केली.
या समितीत सचिव वल्सा नायर सिंह, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा समावेश होता.
उत्तम सिंग यांचा जन्म २५ मे १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील सतारवादक होते. त्यांनी वडिलांकडून बालपणापासूनच संगीताचे धडे गिरवले.
मुंबईत आल्यानंतर ते तबला व व्हायोलिन वादन शिकले. तीन वर्षे व्हायोलिन वादनाचे काम केले.
१९६३नंतर त्यांनी नौशाद, मदन मोहन, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, राहुल देव बर्मन यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकारांसोबत काम केले.
त्यांना संगीतकार जगदीश खन्ना यांची साथ लाभली. या जोडगोळीने अनेक भाषांतील चित्रपटांसाठी काम केले.
‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ या हिंदी, तसेच अनेक तमिळ आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले.
पेंटरबाबू, क्लर्क याशिवाय यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्मन, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
१९९७मध्ये ‘दिल तो पागल है’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.
२००२मध्ये ‘गदर एक प्रेमकथा’ या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक) मिळाला.
गुगलला १८ वर्षे पूर्ण
जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलला २७ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्यांनी खास डुडल सादर केले.
जगात कोणत्याही गोष्टीची ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
४ सप्टेंबर १९९८ला गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली होती.
पेज आणि ब्रेन यांनी गूगलचे नाव आधी ‘बॅकरब’ असे ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस यांचे निधन
युवक बिरादरी आणि अभिव्यक्ती या संस्थांच्या संस्थापिका आणि संस्कृत, हिंदी आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा सबनीस कर्करोगाने निधन झाले.
त्या अविवाहित होत्या. गिरगावातील प्रसिद्ध डॉ. बी. एस. सबनीस यांच्या त्या एकुलत्या एक कन्या होत्या.
रेखा सबनीस यांचे इंग्रजी, संस्कृत, हिंदी व मराठी या भाषांवर चांगलेच प्रभुत्व होते.
प्रायोगिक रंगभूमीबरोबरच व्यावसायिक रंगभूमीवर साहित्य संघाच्या ‘लेक लाडकी’ या नाटकात त्यांनी काम केले.
प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी ‘आक्रोश’, ‘भूमिका’, ‘द स्क्वेअर सर्कल’, ‘पार्टी’, आशाद एक दिन, मुक्ती अशा चित्रपटांतून काम केले.
२७ डाउन, भूमिका या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ओम शिवपुरी, अमरीश पुरी, नसिरुद्दीन शहा या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
‘पार्टी’ या चित्रपटासाठी त्यांनी सहदिग्दर्शनाचेही काम केले होते. १९७४मध्ये चालू झालेल्या छबिलदास चळवळीमध्ये त्यांनी आविष्कार या नाट्यसंस्थेबरोबर सहभाग घेतला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा