७ रेसकोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर
- भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘७ रेसकोर्स रोड’चे नवी दिल्ली महानगरपालिकेकडून ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्यात आले आहे.
- भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी नामबदलाचा प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.
- ‘७ रेसकोर्स’ या नावात बदल करून ‘७ एकात्म मार्ग’ किंवा ‘लोककल्याण मार्ग’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव होता. परंतु शेवटी ‘लोककल्याण मार्ग’वर एकमत झाले.
- त्यामुळे ‘रेसकोर्स रोड’चे पंतप्रधानांचे निवासस्थान आता ‘७ लोककल्याण मार्ग’ या नावाने ओळखले जाईल.
- ‘७ रेसकोर्स रोड’वर पंतप्रधानांच्या निवासस्थानासह अनेक प्रसिद्ध राजकीय व्यक्तींची निवासस्थाने आहेत.
- माजी पंतप्रधान राजीव गांधी हे ‘७ रेसकोर्स रोड’वर राहणारे पहिले पंतप्रधान होते. १९८४मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते आपल्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यामध्ये वास्तव्याला होते.
- माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी ‘७ रेसकोर्स रोड’ या बंगल्याला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले. त्यापूर्वीचे पंतप्रधान हे संसदेकडून दिल्या जाणाऱ्या बंगल्यांमध्ये राहात असत.
- पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय ज्याला पीएमओ असेही म्हणतात ते रायसीना हिल्सवरील साऊथ ब्लॉकमध्ये आहे.
आरबीआय पतधोरण समितीवर तीन सदस्यांची नियुक्ती
- केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीवर तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- आगामी ४ वर्षांसाठी चेतन घाटे, पामी दुआ आणि रविंद्र ढोलकिया या सदस्यांची नियुक्ती पतधोरण समितीवर करण्यात आली आहे.
- आगामी काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक या समितीच्या सदस्यांसह सल्लामसलत करून व्याजाचे दर निश्चित करतील.
- पतधोरण समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांपैकी चेतन घाटे हे सध्या भारतीय सांख्यिकी संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
- तर पामी दुआ या दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी आजपर्यंत गुंतवणूक, विनिमय दर या विषयांवर संशोधन केले आहे.
- रविंद्र ढोलकिया हे अहमदाबाद आयआयएमध्ये १९८५पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे त्यांच्या अभ्यासाचा विषय आहेत.
- पतधोरण समितीत अजून तीन सदस्यांची नियुक्ती होणे बाकी असून सर्व सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही समिती व्याजदर निश्चितीचे काम करेल.
- व्याजदरांच्या निश्चितीचा निर्णय घेताना या समितीमधील प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार असेल.
- व्याजदराचा निर्णय घेताना समसमान मते पडल्यास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे मत निर्णायक ठरेल.
- या समितीने घेतलेल्या सर्व निर्णयांची अंतिम जबाबदारी आरबीआयच्या गव्हर्नरवर असेल.
स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शनमध्ये वाढ
- विविध वर्गवारीतील देशभरातील स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शन योजनेनुसार दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये केंद्र सरकारने सरासरी २० टक्क्यांनी वाढ केली आहे.
- ही वाढ दरमहा सुमारे पाच हजार रुपयांची असेल. याखेरीज स्वातंत्र्यसैनिकांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळेल व त्यात सहामाही सुधारणा होईल.
- पेन्शनमधील ही वाढ व महागाईभत्त्याची सुधारित पद्धत यंदाच्या १५ ऑगस्टपासून लागू होईल.
- यानुसार पेन्शनचे वितरण संबंधितांच्या ‘आधार’शी संलग्न खात्यांतूनच करावे, असे निर्देशही सर्व संबंधित बँकांना देण्यात आले आहेत.
- गेल्या पाच दशकांत या योजनेनुसार एकूण १,७१,६०५ स्वातंत्र्यसैनिक व पात्रता निकषांत बसणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मंजूर करण्यात आले.
- सध्या ३७,९८१ स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो. त्यापैकी ११,६९० प्रत्यक्ष स्वातंत्र्यसैनिक आहेत, २४,७९२ त्यांच्या पत्नी किंवा पती आहेत तर १,४९० पात्र मुली आहेत.
मुकेश अंबानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती
- फोर्ब्ज मासिकाने भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला आहे.
- यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वाधिक २२.७ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
- गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.
- त्यांच्यानंतर यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर १६.९ अब्ज डॉलरची संपत्ती असलेले सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप संघवी यांचा क्रमांक लागला आहे.
- या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हिंदूजा बंधुंचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण १५.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
- यादीमध्ये याआधी तिसऱ्या क्रमांकवर असलेले विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांची संपत्ती १५ अब्ज डॉलर आहे.
- यंदाच्या यादीचे वैशिष्ट म्हणजे पतंजली आयुर्वेदचे आचार्य बाळकृष्ण यांनादेखील यादीत ४८व्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्याकडे एकुण २.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
- योगगुरू बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने अलीकडच्या काळात विविध उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांमुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का बसला आहे.
- भारतातील आघाडीच्या शंभर श्रीमंतांकडे एकुण ३८१ अब्ज डॉलर अर्थात २५.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२९वी जयंती
- पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांची १२९वी जयंती २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली गेली.
- अनुभवरूपी शिक्षकाकडून धडे घेतलेले भाऊराव म्हणजे आदर्शवादी शिक्षणतज्ज्ञ होते. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री होती.
- भाऊरावांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण विटा व कोल्हापूर येथे झाले.
- कष्ट करण्यास तयार असणारे मनगट, अभ्यासानुवर्ती न जाता सामाजिक परिस्थितीचा विचार करणारा मेंदू त्यांना लाभला होता.
- सामाजिक विषमतेची त्यांना चीड होती. जातिधर्माच्या नावावर चाललेले अंधश्रद्धेचे नियम ते विद्यार्थिदशेतच मोडत.
- ४ ऑक्टोबर १९१९मध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ला नर्ले (ता. वाळवा) येथे वसतिगृह काढले.
- १९२४ला रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे केले. तेथेच सर्व जातिधर्माच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले.
- १९२७मध्ये धनिणीच्या बागेत शाहू बोर्डिंग सुरू केले. या बोर्डिंगला महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन या कार्याची स्तुती केली.
- भाऊरावांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाईंचा सिंहाचा वाटा होता. गावोगावी फिरून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले.
- १९४०मध्ये सातारा येथे संस्थेचे पहिले हायस्कूल सुरू केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थेस भेट दिली.
- संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून भाऊरावांच्या कार्याचे महत्त्व लोकांना पटवून देत. जून १९४७मध्ये त्यांनी पहिले छत्रपती शिवाजी कॉलेज काढले.
- भाऊरावांनी १९४६ ते १९५३ या कालावधीत सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. जातीभेद नष्ट करण्याचे महान कार्य केले.
- १६ जानेवारी १९५९ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने डी. लिट. पदवी देऊन गौरविले.
- श्रम आणि बुद्धीची सांगड घालणाऱ्या क्रांतिवीर भाऊरावांचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले.
|| या महान शिक्षणतज्ज्ञास विनम्र अभिवादन ||
सुधारित डान्स बार कायद्याला स्थगिती नाही
- राज्यातील सुधारित डान्स बार कायद्याला स्थगिती देण्याची डान्स बार मालकांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे फेटाळली आहे.
- डान्स बारवर नियम व बंधने आणणारा राज्य सरकारचा कायदा जाचक असल्याचा दावा करत डान्स बार मालकांनी याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.
- या कायद्याला स्थगिती देण्याची त्यांची मागणी होती. न्यायालयाने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
- नव्या कायद्यातील नियम बारबालांच्या हिताचे व कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा