चालू घडामोडी : १७ सप्टेंबर

क्षेपणास्त्र विनाशिका मोरमुगाओचे जलावतरण

 • भारतीय नौदलाच्या मोरमुगाओ या दिशादर्शक क्षेपणास्त्र विनाशिकेचे मुंबईत १७ सप्टेंबर रोजी जलावतरण करण्यात आले.
 • नौदलाच्या माझगाव डॉकयार्ड लिमिटेड (एमडीएल)ने मोरमुगाओची बांधणी केली आहे. आयएनएस विशाखापट्टणमच्या श्रेणीतील ही युद्धनौका आहे.
 • मोरमुगाओ ही १५बी प्रकल्पातील दुसरी युद्धनौका असून ही भारतीय नौदलातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक आहे.
 • नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा व त्यांच्या पत्नी रीना लांबा यांच्या उपस्थितीत मुंबईच्या समुद्रात मोरमुगाओचा जलावतरण सोहळा पार पडला.
 • या युद्धनौकेची बांधणी पूर्ण झाली असून, अद्याप यावर क्षेपणास्त्र बसविण्यात आली नाहीत. पुढील दोन वर्षांत ही नौदलात सहभागी होणार आहे.
 क्षेपणास्त्र विनाशिका : मोरमुगाओ 
 • मारूमुगाओचे पाण्यातील आकारमान ७३०० टन असून ही युद्धनौका ३० नॉट इतक्या वेगाने प्रवास करू शकते.
 • या युद्धनौकेवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवर हवेत मारा करणारी आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे तैनात असतील.
 • या युद्धनौकेवरून पाणबुडीविरोधी युद्धतंत्राने सुसज्ज असलेली हेलिकॉप्टर्सही वाहून नेता येतील.
 • आगामी काळात या विनाशिकेवर सहा ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येणार आहेत.
 • ही नौका ५६ किमी प्रतीतास वेगाने ७५ हजार किमीपर्यंत सागरी सीमांचे संरक्षण करणार आहे.
 • या नौकेवर तैनात असलेली सर्व क्षेपणास्त्रे ही स्वदेशी बनावटीची असणार आहेत.
 • मारमुगाओवर ईस्त्राइलमध्ये विकसित झालेली मल्टी फंक्शन सर्व्हिलान्स थ्रेट अलर्ट रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र विनाशक म्हणून तिची ओळख झाली आहे.

महाराष्ट्र सरकारद्वारे व्हॅटची दरवाढ

 • महाराष्ट्र सरकारने १७ सप्टेंबरपासून मूल्यवर्धित करात (व्हॅट) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सरकारने १६ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करून व्हॅटचे दर वाढविल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. दरवाढीचा हा बदल तातडीने म्हणजे १७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे.
 • शेड्यूल ‘सी’मधील ज्या वस्तूंवर सध्या ५.५ टक्के कर आहे, त्या वस्तूंवर ६ टक्के कर लावला आहे.
 • ज्या वस्तूंवर शेड्यूल ‘ई’ म्हणजे सर्वसाधारण दर सध्या १२.५ टक्के आहे, तो आता १३.५ टक्के करण्यात आला आहे.
 • पेट्रोल, डिझेल विक्रीच्या किमतीवर आधारित आणि प्रतिलिटर कर असे दोन प्रकारे कर लावले जातात. प्रतिलिटर कर रु. ४.५ वरून रु. ६ केला आहे.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला एपीएक्युजीचे सदस्यत्व

 • हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) प्रतिष्ठेचे समजले जाणारे अशिया-पॅसिफिक एअरोस्पेस क्लॉलिटी ग्रुपचे (एपीएक्युजी) सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.
 • एपीएक्युजीचे सदस्यत्व इंटरनॅशनल एअरोस्पेस क्वॉलिटी ग्रुप अंतर्गत प्राप्त करणारा भारत हा जगात सातवा देश आहे. हे सदस्यत्व ‘मतदानाच्या हक्कासह पूर्ण सदस्यत्व’ या वर्गातील आहे.
 • इतर देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया, तैवान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि जपानचा समावेश आहे.
 • एअरोस्पेस क्वॉलिटीमध्ये सुधारणा घडविण्याचे काम करणाऱ्या एअरोस्पेस क्वॉलिटीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे एचएएल जागतिक पातळीवर पोहोचला आहे.
 • आता एचएएल जागतिक पातळीवरील कार्यक्रमांत सहभागी होऊ शकेल तसेच सध्याचा आणि नवा दर्जा सुधारणे व त्याचा आढावा घेणे यातही त्याला भाग घेता येईल.

चीनमध्ये जगातील सर्वात उंच पुल

 • चीनमध्ये जगातील सर्वात उंच पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, डोंगराळ भागात नदीवर बांधलेल्या या पुलाचे नाव बेईपांजियांग आहे. 
 • गुझ्झू प्रांताच्या खोऱ्यातील या पुलाची उंची ५६५ मीटर (१८५४ फूट) म्हणजेच २०० मजली इमारतीएवढी असून, तो जगातील सर्वात उंच पूल आहे.
 • १३४१ मीटर लांबीचा बेईपांजियांग पूल येत्या तीन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.
 • झेझियांग प्रांताच्या हांगझू शहराचा महामार्ग आणि गुझ्झू प्रांतातील रुली शहराला जोडणाऱ्या या पुलाचे काम २०१३मध्ये सुरू करण्यात आले होते.
 • पूल उभारणीवर १ अब्ज येन अर्थात १५ कोटी डॉलर एवढा खर्च झाला आहे. 
 • चीनमध्ये अनेक उंच पूल आहेत. तथापि, स्वत:च्या बांधणीची (स्ट्रक्टर) उंची विचारात घेतल्यास सर्वाधिक उंचीचा पूल असण्याचा मान आजही फ्रान्समधील मिलाऊ व्हायदक्त या पुलाकडे आहे. त्याची उंची ३४३ मीटर (११२५ फूट) आहे.

ब्रिटनमध्ये पहिली प्लॅस्टिकची नोट चलनात

 • कागद व कापड यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या चलनी नोटा वापरणाऱ्या ब्रिटनमध्ये १५ सप्टेंबर रोजी पहिली प्लॅस्टिकची नोट चलनात आली आहे.
 • ब्रिटनमध्ये सध्या ५, १०, २० व ५० पौंडाच्या नोटा चलनात आहेत. यापैकी ५ पौंड मूल्याच्या नोटा सर्वप्रथम पॉलिमरवर छापण्यात आल्या आहेत.
 • १० आणि २० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अनुक्रमे सन २०१७ व २०२०मध्ये चलनात आणल्या जातील.
 • मात्र ५० पौंडाच्या प्लॅस्टिकच्या नोटा काढण्याचा विचार सध्या तरी बँक ऑफ इंग्लंडने केलेला नाही.
 • ५ पौंडाच्या प्लॅस्टिक नोटेवर एका बाजूला दुसरे महायुद्ध जिंकणारे ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे, तर दुसऱ्या बाजूला महाराणी एलिझाबेथ यांचे छायाचित्र आहे.
 • चर्चिल यांच्या चित्राच्या खाली त्यांनी पंतप्रधान या नात्याने १३ मे १९४० रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये केलेल्या पहिल्या भाषणातील ‘मी तुम्हाला रक्त, कष्ट, अश्रू आणि घामाशिवाय दुसरे काही देऊ शकत नाही’ हे वचन छापलेले आहे.

शक्तिशाली मेरांती वादळाचा चीनला तडाखा

 • जगभरात यावर्षीच्या सर्वाधिक शक्तिशाली वादळांपैकी एक असलेले मेरांती वादळ चीनच्या फुजियान प्रांतात धडकल्याने या क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले.
 • शियामेन शहरातील शियानगानमध्ये आलेले हे वादळ दक्षिण फुजियान प्रांतात १९४९नंतर आलले सर्वात शक्तिशाली वादळ आहे.
 • यामुळे परिसरातील पाणी आणि वीज पुरवठा पूर्णत: ठप्प पडला असून वेगवान हवा आणि पावसाने थैमान घातले आहे.
 • या वादळाचा वेग ताशी २३० किमी असून, या वादळाने धडक दिल्यानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा