अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने बांगलादेशावर ५-४ अशी मात करत १८ वर्षांखालील आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपदपटकावले.
स्पर्धेच्या साखळी सामन्यात यजमान बांगलादेशने अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत भारतावर अशाच फरकाने विजय मिळवला होता.
भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे पराभूत करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
भारताने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे. यापूर्वी २००१मध्ये भारताने विजेतेपद पटकाविले होते.
सामन्याच्या ६९व्या मिनिटाला भारताच्या अभिषेकने भारतासाठी पाचवा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
हार्दिकसिंग या सामन्याचा सामनावीर ठरला, तर भारताचा पंकजकुमार रजकला सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळाला.
बिहारचा दारूबंदी निर्णय बेकायदा
बिहारमध्ये नितीशकुमार सरकारच्या दारूबंदी निर्णयाला पाटणा सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवले आहे.
बिहारमध्ये दारूबंदी कायदा २०१६ अंतर्गत दारू विक्रीस बंदी घालण्यात आली होती. हा कायदा गांधी जयंतीपासून (२ ऑक्टोबर) लागू केला जाणार होता.
दारूबंदीसाठी तयार करण्यात आलेला हा कायदा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारा असल्याचा सांगत न्यायालयाने हा कायदा रद्द केला.
एखाद्याच्या घरी मद्य मिळाले तर कुटुंबातील सर्व सदस्यांना अटक करण्याची तरतूद या कायद्यात आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र ठरवण्यात आला होता.
ज्यामध्ये फक्त न्यायालयाद्वारेच जामीन मिळत असत. पोलीस ठाण्यामार्फत जामीन मिळत नाही.
त्यामुळे ही अधिसूचना घटनेतील तरतुदींशी विसंगत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत ही अधिसूचना रद्द केली.
दारूबंदी कायद्यान्वये बिहारमध्ये दारूची निर्मिती, तिची विक्री आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.
त्यामुळे बिहार सरकारला वर्षांला किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते.
गोल्फसम्राट अरनॉल्ड पाल्मर यांचे निधन
गोल्फला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे अमेरिकेचे महान खेळाडू अरनॉल्ड पाल्मर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
गोल्फसम्राट म्हणून लोकप्रियता लाभलेल्या पाल्मर यांनी १९५८, १९६०, १९६२ व १९६४ मध्ये मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अमेरिकन ओपन गोल्फ स्पर्धेत त्यांनी १९६०मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. ब्रिटिश खुली स्पर्धा त्यांनी १९६१ व १९६२मध्ये जिंकली.
२००४मध्ये त्यांनी सलग ५० मास्टर्स स्पर्धामध्ये भाग घेतला होता. १९५४मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी अमेरिकन हौशी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यावसायिक स्पर्धामध्ये ६२ वेळा अजिंक्यपद पटकाविले.
एका मोसमात एक लाख डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणारे ते पहिले खेळाडू होते.
त्यांनी सांघिक स्पर्धेत सहा वेळा रायडर चषक स्पर्धेत भाग घेतला. १९७४मध्ये त्यांची गोल्फच्या हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली.
त्यांना अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. क्रीडा क्षेत्रातील राजदूत म्हणून अनेक जाहिराती मिळविणारे ते पहिले अमेरिकन क्रीडापटू होते.
पाकिस्तानी कलाकार व गायकांना चित्रपटात बंदी
पाकिस्तानी गायक आणि कलाकारांना चित्रपटांत घेऊ नये, अशा प्रकारचा ठराव इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या (इम्पा) बैठकीत झाला.
उरी येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर निर्मात्यांची संघटना असलेल्या ‘इम्पा’ची अंधेरी येथे ही सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी काही निर्माते उपस्थित होते.
या बैठकीत पाकिस्तानी कलाकार व गायकांना चित्रपटात घेऊ नये, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.
‘इम्पा’चे अध्यक्ष टी. पी. अगरवाल यांच्या ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या चित्रपटातील एक गाणे पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी गायलेले होते. आता हे गाणे दुसरा भारतीय गायक गाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा