उरी येथील भारतीय लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
आठ सदस्य देशांच्या गटाचे अध्यक्षपद नेपाळकडे असल्यामुळे भारताने नेपाळला आपला निर्णय कळविला आहे.
एका देशाकडून अन्य देशांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप होत असून, सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचा निषेधार्थ भारताने या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताशिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही परिषदेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
पाकिस्तान निर्माण करत असलेल्या परिस्थितीमुळे परिषद यशस्वी होऊ शकत नाही, असा अप्रत्यक्ष आरोप या देशांनी केला आहे.
इस्त्राईलचे माजी पंतप्रधान शिमॉन पेरेस यांचे निधन
इस्त्राईलचे नोबेल पारितोषिक विजेते माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानशिमॉन पेरेस यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
इस्त्राईलच्या स्थापनेत आणि देशाला शांततेच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी उद्युक्त करण्यात शिमॉन पेरेस यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
इस्रायलच्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर शिमॉन यांनी वाहतूक, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचा कार्यभार समर्थपणे सांभाळला होता.
१९९५-१९९६ या कालावधीमध्ये ते इस्रायलचे आठवे पंतप्रधान झाले आणि २००७साली ते इस्रायलचे नववे राष्ट्राध्यक्ष झाले.
पेरेस यांनी दोन वेळा इस्राईलचे पंतप्रधानपद भूषविले होते. त्यांनी २००७ ते २०१४ या काळात इस्राईलचे अध्यक्षपदही सांभाळले होते.
शिमॉन पेरेस यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेले बेन गुरियान - अ पॉलिटिकल लाईफ हे पुस्तक विशेष गाजले.
त्यांची डेव्हीड्स स्लींग, अँड नाऊ टुमारो, एंटेबी डायरी, द न्य मिडल इस्ट, फॉर द फ्युचर ऑफ इस्रायल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या ‘ओस्लो करारा’संदर्भात बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भात पेरेस यांना १९९४मध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत व इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.
२०१२साली बराक ओबामा यांच्याहस्ते त्यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय जगभरातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते.
पेरेस यांच्या निधनानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शोक व्यक्त केला आहे.
गुरगावचे गुरुग्राम असे नामांतर
हरयाणातील गुरगाव जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापुढे गुरगाव शहर व जिल्हा ‘गुरुग्राम’ या नावाने ओळखले जाणार आहे.
केंद्र सरकारने हा नामांतराचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.
महाभारतापासून प्रेरणा घेऊन हरयाणा सरकारने हा प्रस्ताव ठेवला होता. मागील एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली होती.
१ नोव्हेंबर २०१६ रोजी हरयाणा राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
पनवेल राज्यातील २७वी महापालिका
पनवेल नगरपालिकेचा महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना राज्य सरकारने २७ सप्टेंबर रोजी जारी केली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महापालिकांची संख्या आता २७ झाली आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच नैना (दि न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लूएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्रातील ३० गावांना महापालिकेतून वगळण्यात आले आहे.
सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, पळस्पे आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन होणार आहे.
नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरांतील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन पनवेल आणि परिसराचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिका स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
२०११च्या जनगणनेनुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या ५ लाख ४५ हजार असली तरी, सध्या या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ८ लाखांच्या आसपास असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा