भारतीय वंशाचे नाशिकला जन्मलेले वैज्ञानिक रमेश रासकर यांना ‘लेमेलसन एमआयटी’चा प्रतिष्ठेचा ५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी जगातील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी नवप्रवर्तनात्मक संशोधन केले असून जीवनातील समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
रासकर हे एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रीसर्च ग्रुपचे संस्थापक असून मीडिया आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेत सहायक प्राध्यापक आहेत.
२००८मध्ये त्यांनी एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर लॅब स्थापन केली. तेथे प्रतिमाचित्रण यंत्रे तयार केली जातात.
त्यांच्या नावावर सध्या ७५ पेटंट असून १२० शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘फेमटो फोटोग्राफी’ या अल्ट्रा फास्ट इमेजिंग सिस्टीमचा शोध लावण्यात त्यांचा सहभाग होता.
कमी खर्चातील डोळ्यांची काळजी घेणारी तंत्रे त्यांनी विकसित केली असून त्यांच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुस्तकाची पाने न उघडता पुस्तक वाचता येते.
रासकर हे संशोधन क्षेत्रातील उमदे नेतृत्व असून त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावून समाजाला जोडण्याचे काम केले. जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते काम करीत आहेत.
पतंजलीचे प्रमोटर देशातील श्रीमंतांच्या यादीत
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीचे प्रमोटर आचार्य बाळकृष्ण यांचा देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला आहे.
हुरून इंडिया २०१६ यांनी प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाळकृष्ण हे २५व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २५,६०० कोटी रूपये इतकी सांगण्यात आली आहे.
२०१६मध्ये पतंजलीच्या व्यवसायात सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. पतंजली कंपनीची उलाढाल ही ५ हजार कोटी रूपये इतकी आहे.
बाळकृष्ण यांच्यावर शैक्षणिक कागदपत्रात हेराफेरी, बनावट पासपोर्ट आणि विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी आरोप होते. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना क्लिन चिट दिली होती.
बाळकृष्ण हे नेपाळचे नागरिक असून बरेली पासपोर्ट कार्यालयात हरिद्वारच्या पत्त्यावर पासपोर्ट बनवल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली होती.
बाळकृष्ण यांनी सहलेखकांसमवेत आतापर्यंत ४१ शोधनिबंध लिहिले आहेत. हे सर्व शोधपत्र योग, आयुर्वेद आणि औषधांसंबंधी आहेत. सध्या ते पंतजलीशी संबंधित ९ पदांवर कार्यरत आहेत.
पतंजली भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारा कंज्युमर ब्रँड आहे. पतंजली आयुर्वेच्या ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मालकी हक्क बाळकृष्ण यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
पतंजलीबरोबर गत दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या बाळकृष्ण यांनी २०११मध्ये आपल्यावर ५०-६० कोटींचे वैयक्तिक कर्ज असल्याचेही सांगितले होते.
जगातील पहिली चालकरहित बस फ्रान्समध्ये
जगातील पहिली चालकरहित बस फ्रान्समधील लायन येथे सुरू झाली असून ती या शहरातील काही भागात सेवा देणार आहे.
या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटांचा मार्ग प्रवासी पार करू शकतील, त्यात पाच थांबे आहेत.
चालकरहित बसमध्ये १५ प्रवासी बसू शकतात व त्या इलेक्ट्रिक बसेस आहेत. लिडार रडार तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले आहे व त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकांचा वापर केलेला आहे.
भारतीय वंशाच्या डायने गुजराती अमेरिकेत न्यायाधीशपदी
भारतीय-अमेरिकन वंशाच्या डायने गुजराती यांची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे.
अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयातील न्यूयॉर्क खंडपीठात न्यायाधीशपदी डायने गुजराती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकी सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्विकारतील.
भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत.
दामोदर गुजराती यांनी १९६०मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच १९६५मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा