भारतात मुस्लिम समाजात निरक्षरांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण जैन धर्मात असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने २०११च्या जनगणनेच्या आधारे धर्म आणि लिंगाधारित ही शैक्षणिक आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.
मुस्लिमांच्या १७.२२ कोटी लोकसंख्येपैकी ७.३५ कोटी लोक निरक्षर आहेत. यातील २.८२ कोटी सहा वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत.
९६.६ कोटी हिंदूंपैकी ३५.१६ कोटी (३६.४० टक्के) हिंदू निरक्षर आहेत. ख्रिश्चनांच्या २.७८ कोटी संख्येपैकी ७१.३७ लाख निरक्षर आहेत.
साक्षरतेच्या बाबतीत सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण जैन धर्मात ८६.४० टक्के ऐवढे आहे. त्यानंतर ख्रिश्चन समाजाचा क्रमांक लागतो. या समाजात साक्षरतेचे प्रमाण ७४.३० टक्के ऐवढे आहे.
बौद्ध धर्मात साक्षरतेचे प्रमाण ७१.८ टक्के, शीखांमध्ये ६७. ५ टक्के, हिंदूंमध्ये ६३. ६ टक्के आणि मुसलमानांमध्ये ५७. ३ टक्के ऐवढे आहे.
देशातल्या सर्व धर्मांना एकत्र करुन बघितले तर एकूण लोकसंख्येच्या ५.६३ टक्के लोकांनाच पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेता आले.
संपूर्ण देशाचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या ३६.९० टक्के लोकसंख्या निरक्षर आहे.
डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत
ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत झाला असून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
रूसेफ यांच्यावर राष्ट्रीय अंदाजपत्रकात अवैधरित्या बदल केल्याचा आरोप होता. ८१ पैकी ६१ सिनेट सदस्यांनी त्यांच्याविरोधात मतदान केले.
रूसेफ यांचे विरोधक मायकल टेमर यांची ब्राझीलच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
टेमर हे माजी राष्ट्राध्यक्ष असून रूसेफ यांची सत्ता उलथवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
७५ वर्षीय टेमर हे चीनमधील जी २० देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होऊन आपल्या कार्याला प्रांरभ करतील.
रूसेफ यांनी २०१४ मध्ये अंदाजपत्रकात बदल करून राजकीय कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या ब्राझील आर्थिक संकटात आहे.
रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत झाला असला तरी त्यांच्यावर आठ वर्ष कोणतेही पद घेण्यावर बंदी लादण्याचा ठराव मात्र संमत झालेला नाही.
चीनकडून पाकिस्तानला आठ अत्याधुनिक पाणबुड्या
चीनकडून पाकिस्तानला आठ अत्याधुनिक युद्धसज्ज पाणबुड्या मिळणार आहेत.
२०२८पर्यंत पाकिस्तानला या पाणबुडय़ा मिळणार आहेत. ५ अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम पाकिस्तान या पाणबुड्यांसाठी मोजणार आहे.
या नव्या अत्याधुनिक पाणबुड्यांमुळे पाण्याखालून अणुहल्ला करण्याची क्षमता पाकिस्तानला प्राप्त होणार आहे.
सध्या पाकिस्तानी नौदलाकडे ऑगस्टस प्रकारातील पाच आणि ‘एमजी ११०’ प्रकारच्या तीन पाणबुड्या आहेत.
टेन स्पोर्ट्सचे सोनी नेटवर्क्सकडून अधिग्रहण
माध्यम क्षेत्रातील झी समूहातील टेन स्पोर्ट्ससह काही वाहिन्यांची सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने २,५७९ कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
झी एंटरटेनमेंट अखत्यारीतील टेन स्पोर्ट्स नेटवर्क्सद्वारे टेन स्पोर्ट्ससह टेन क्रिकेट, टेन गोल्फ एचडी, टेन१-२-३ आदी वाहिन्याही आता सोनीच्या व्यवसायांतर्गत समाविष्ट झाल्या आहेत.
टेन स्पोर्ट्स नेटवर्क्समधील टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट, टेन स्पोर्ट्स आदी चॅनेलचे मालदीव, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व देशांमध्ये प्रसारण होते.
झी समूहाने टेन स्पोर्ट्स दुबईस्थित अब्दुल रेहमान बख्तीर यांच्या मालकीच्या ताज ग्रुपमार्फत २००६मध्ये खरेदी केले होते.
५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
नोटीस बजावूनही विवरणपत्राच्या व लेखापरीक्षणाच्या प्रती सादर न केल्यामुळे आणखी ५७ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता २४८ झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे ३६५ राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र व लेखापरीक्षणाची प्रत दर वर्षी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांना मुक्त चिन्ह वाटपात प्राधान्य मिळणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या ३६५ पैकी आता नोंदणी कायम असलेले केवळ ११७ पक्ष आहेत. त्यात १७ मान्यताप्राप्त; तर १०० मान्यता नसलेल्या पक्षांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा