इस्त्रोच्या पीएसएलव्ही सी ३५ या प्रक्षेपकाने आठ उपग्रहांसह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेप घेतली.
एकूण आठ उपग्रहांमध्ये तीन भारताचे, तीन अल्जेरियाचे, कॅनडा आणि अमेरिकेचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.
२ तास १५ मिनिटाच्या या मिशनमध्ये प्रथमच पीएसएलव्ही-सी३५ दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे आठ उपग्रह प्रस्थापित करणार आहे.
५००व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी क्रिकेट सामन्यात १९७ धावांनी विजय मिळवत, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयाचे फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा शिल्पकार ठरले.
भारताने दिलेल्या ४३४ धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव २३६ धावांत संपुष्टात आला. भारताचा हा १३०वा कसोटी विजय ठरला.
अश्विनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले. यामुळे त्याने पुन्हा एकदा दोन्ही डावात दहा बळी मिळविण्याची कामगिरी केली.
अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला.
भारतीय संघाची ही ५००वी कसोटी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळली गेली.
भारतीय बॉक्सिंग महासंघ स्थापन
२६ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय बॉक्सिंग महासंघाची (बीएफआय) स्थापना करण्यात आली आहे.
‘स्पाइस जेट’चे कार्याध्यक्ष व व्यवस्थापक अजय सिंह यांची बीएफआयच्या अध्यक्षपदी तर जय कवळी यांची सरचिटणीसपदी निवड झाली.
ही निवडणूक योग्य रीतीने पार पडल्याचे प्रशस्तीपत्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे (एआयबीए) उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनी दिले.
यामुळे आता भारतीय बॉक्सिंगपटूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे दरवाजे उघडले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
बॉक्सिंग इंडियाच्या बांधणीत घाईघाईत चुका राहिल्या होत्या आणि त्यामुळे ती संघटना कोलमडली.
बॉक्सिंग इंडियाच्या वेळी झालेल्या चुका यंदा सुधारण्यात आल्या आहेत. ही बॉक्सिंग इंडियाची सुधारित आवृत्ती आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना करताना एआयबीए, केंद्र सरकार यांच्या नियमांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यानुसार ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चा
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला.
युवती आणि महिलांनी केलेले मोर्चाचे नेतृत्व, हे या मराठा मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही असे वातावरण होते. नागरिक स्वयंप्ररणेने आणि स्वयंशिस्तीने आपापल्यापरीने मोर्चात सहभागी झाले होते.
लाखो लोक असूनही पोलिस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. पोलिसांनीही अत्यंत चोख नियोजन केले होते.
वाहतूक व्यवस्था आणि मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते.
कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे आदी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
डेक्कन जिमखाना गरवारे पुलावरील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पाच युवतींनी पुष्पहार अर्पण केल्यावर सकाळी साडेदहाच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली.
सुरवातीला काही अपंग व्यक्ती, पाठोपाठ युवती, महिला, डॉक्टर, वकील अशा क्रमाने मोर्चाची लांबी उत्तरोत्तर वाढत गेली.
लक्ष्मी रस्ता, आंबेडकर रस्ता मार्गे मोर्चा दुपारी एकच्या सुमारास पुणे स्टेशनजवळील विधानभवन चौकात पोचला.
तेथे पाच युवतींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर सामूहिकरित्या राष्ट्रगीत झाल्यावर मोर्चा संपला.
मराठा समाजातील सर्वसामान्यांबरोबरच सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
या शिवाय समाजकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, कला संस्कृती, क्रीडा आदी क्षेत्रातील मराठा समाजबांधव मोर्चात आघाडीवर होते.
मोर्चाच्या नियोजनात युवतींचा पुढाकार आणि त्यांना मिळालेली युवकांची साथ, यामुळे शिस्तीचे पालन होण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचे दिसून आले.
हा मोर्चा पुण्यातील मोर्चांचेच नव्हे, तर इतर कार्यक्रमांना जमलेल्या जनसागराचे आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला. मोर्चात ३५ ते ४० लाख जण सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा