चालू घडामोडी : ३० एप्रिल

इस्रोची ‘दक्षिण आशिया उपग्रह’ योजना

  • भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो ‘दक्षिण आशिया उपग्रह’ प्रक्षेपणाची योजना आखत आहे.
  • याद्वारे भारत दक्षिण आशियाई देशांसाठी ४५० कोटी रुपयांच्या एका विशेष योजनेद्वारे ‘स्ट्रेटोस्फेरिक डिप्लोमसी’ स्वीकारत आहे.
  • भारत या आठवड्यात ‘दक्षिण आशिया उपग्रह’च्या माध्यमातून आपल्या शेजारी देशांना एक उपग्रह भेट म्हणून देणार आहेत. या योजनेत भारताशेजारील एकाही देशाला खर्च करावा लागणार नाही.   
  • येत्या ५ मे रोजी इस्रो श्रीहरिकोटामधून ‘नॉटी बॉय’ या ११व्या मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह शांतीसंदेश घेऊन जाणार आहे.
  • या दक्षिण आशिया उपग्रहाचे प्रक्षेपण करणाऱ्या रॉकेटचे वजन ४१२ टन तर लांबी ५० मीटर आहे. या उपग्रहाचे वजन २२३० किलो आहे.
  • हा उपग्रह बनवण्यासाठी इस्रोला जवळपास ३ वर्षे लागली. तर याच्या बनावटीचा खर्च २३५ कोटी रुपये एवढा आहे. 
  • या उपग्रहाच्या मदतीने अवकाशावर आधारित तंत्रज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी उपयोग होणार आहे.
  • या उपग्रहाच्या माध्यमातून टेलीकम्युनिकेशन्स आणि प्रसारणासंदर्भातल्या सेवा उदाहरणार्थ टीव्ही, डीटीएच, टेलीएज्युकेशन, टेलीमेडिसीन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या सेवांमध्ये सहकार्य मिळणार आहे.
  • सार्क देशांपैकी नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी या मोहिमेत सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे.
  • मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या ३१व्या भागात या योजनेचा उल्लेख केला होता. त्यांनी याला दक्षिण आशियात ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हटले आहे.

५४वे राज्य चित्रपट पुरस्कार

  • ३० एप्रिल रोजी ५४व्या राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमाने आपली छाप पाडली आहे. 
  • यावेळी ‘दशक्रिया’ सिनेमाने सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
 पुरस्कारांची यादी 
  • सर्वोत्कृष्ट पटकथा: संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)
  • सर्वोत्कृष्ट संगीत: अमितराज  (दशक्रिया)
  • उत्कृष्ट बालकलाकार: आर्य आढाव (दशक्रिया) व ओंकार घाडी (कासव)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : स्वप्नील (दशक्रिया)
  • उत्कृष्ट कलादिग्दर्शन: बबन अडागळे (एक अलबेला) व अमन विधाते (डॉ.रखमाबाई राऊत)
  • उत्कृष्ट छाया लेखन: अमलेंदू चौधरी (सायकल)
  • उत्कृष्ट संकलन: महंतेश्वर भोसगे (फुंतरु) व अनिलगांधी (माचीवरला बुधा)
  • उत्कृष्टध्वनी मुद्रण: महावीर साबण्णावर (दशक्रिया)
  • उत्कृष्टध्वनी संयोजन: सुभाष साहू (डॉ.रखमाबाई राऊत)
  • उत्कृष्ट वेशभूषा: पोर्णिमा ओक (डॉ.रखमाबाई राऊत)
  • उत्कृष्ट रंगभूषा: विद्याधर भट्टे (एक अलबेला)

चीन आणि ब्रिटन दरम्यान थेट रेल्वसेवा सुरु

  • चीनला थेट ब्रिटनशी जोडणारी पहिली मालवाहू रेल्वे गाडी १२,००० किमी प्रवास पूर्ण करून २९ एप्रिल रोजी चीनच्या यिवु शहरात येऊन पोहोचली.
  • चीन आणि ब्रिटनमध्ये व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ही थेट रेल्वसेवा सुरु झाली आहे.
  • ब्रिटनहून आलेल्या या ट्रेनमध्ये व्हिस्की, लहान मुलांचे दूध, औषधे आणि मशिनरी असे साहित्य आहे. १० एप्रिलला ही ट्रेन लंडनहून निघाली.
  • फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, बेलारुस, रशिया आणि कझाकस्तान या देशांचा प्रवास करुन २० दिवसांनी ही ट्रेन यिवूमध्ये दाखल झाली. 
  • चीन रेल्वे कॉर्पोरेशनने ब्रिटन ते चीन हे अंतर कापण्यासाठी १८ दिवसाचा वेळ ठरवला होता. पण त्यापेक्षा दोन दिवस जास्त लागले. 
  • आयात-निर्यातीसाठी रेल्वेमार्ग हा हवाई मार्गापेक्षा स्वस्त आहे तसेच समुद्र मार्गापेक्षा वेगवान आहे. सागरी मार्गापेक्षा रेल्वेने महिन्याभराचा वेळ वाचतो.
  • हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीच्या रेल्वेमार्ग रशियातील ट्रान्स सायबेरियन रेल्वेपेक्षा लांब असला, तरी २०१४साली सुरू झालेल्या चीन-माद्रिद मार्गापेक्षा सुमारे १ हजार किलोमीटरने कमी आहे.
  • आधुनिक काळातील ‘सिल्क रोड’ मार्गाने पश्चिम युरोपसोबतचे व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या चीनच्या मोहिमेतील हा सर्वात अलीकडचा प्रयत्न आहे.
  • चीनने २०१३पासून ‘वन बेल्ट, वन रोड’ हे धोरण अवलंबले असून या धोरणातंर्गत दुसऱ्या देशांपर्यंत रेल्वेमार्गाने पोहोचण्याचे चीनचे लक्ष्य आहे.
 प्राचीन सिल्क रोड (खुष्कीचा मार्ग) 
  • सुमारे हजार वर्षांपूर्वी भारत आणि चीन या दोन सशक्त अर्थव्यवस्था होत्या. त्यांचा व्यापार सातासमुद्रांच्या पलिकडे युरोप आणि आफ्रिकेतील देशांशी व्हायचा.
  • त्यात रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चाले. सागरी वाहतूक आणि रस्ता म्हणजेच खुश्कीच्या मार्गाने हा व्यापार व्हायचा.
  • व्यापाऱ्यांचे काफिले त्या काळी ज्या रस्तामार्गाने जात ते मार्ग प्राचीन ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखले जातात. विविध युरोपीय देशांपर्यंतची रेल्वेने थेट मालवाहतूक हा त्याचाच एक भाग आहे.

चालू घडामोडी : २९ एप्रिल

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांना सुवर्णपदक

  • सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मॉस्को येथे झालेल्या ‘सँड आर्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे.
  • रशियातील कोलमेन्स्कोय आणि मास्को येथे ‘आपल्याभोवतीचं विश्व’ या विषयावर ही स्पर्धा २२ ते २८ एप्रिल दरम्यान पार पडली.
  • या स्पर्धेत विविध देशातील २५ शिल्पकारांनी भाग घेतला होता. भारताकडून सुदर्शन पटनायक हे स्पर्धेत सहभागी झाले होते.
  • पटनायक यांनी हिरवळीचा संदेश देणारी श्री गणेशाची मूर्ती साकारली. त्यांच्या या शिल्पाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
  • गेल्या वर्षी मॉस्कोमध्ये ‘विश्वशांती’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत पटनायक यांनी महात्मा गांधी यांचे वाळूचे शिल्प साकारले होते. या शिल्पासाठीही त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते.
  • नुकताच त्यांनी ओडिशाच्या समुद्र किनारी वाळूचा सर्वात मोठा किल्ला बनविला होता. त्यासाठी त्यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली होती.

पी व्ही सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर

  • रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर पडली आहे.
  • या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिला गेम जिंकल्यानंतर चीनच्या बिंगजियाओविकडून ती पराभूत झाली.
  • या सामन्यात सिंधूला बिंगजियाओविने २१-१५, १४-२१, २२-२४ असे हरवले. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जर्मनीत बुरखा घालण्यास अंशत: बंदी

  • दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून जर्मनीच्या संसदेने सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर असताना संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालण्यास अंशत: बंदी केली आहे.
  • केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना ही बंदी लागू होणार आहे. यात निवडणूक अधिकारी, लष्करी व न्यायिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गापासून बचाव करताना आणि पोलिस अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना पूर्णपणे चेहरा झाकण्याची मुभा असेल.
  • जर्मनीत २०१५पासून दहा लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित आणि निर्वासित आले असून, यातील बहुतांश मुस्लिम देशांमधील आहेत.
  • तसेच बर्लिनमधील ख्रिसमस मार्केटमधील दहशतवादी हल्ल्यासह अनके दहशतवादी हल्ले मागील काळात जर्मनीत झाले आहेत.
  • यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याची ओरड उजव्या विचारसरणीच्या गटांनी केली आहे.
  • याच गटांनी फ्रान्सप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे बुरखा बंदी करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने पूर्णपणे बंदी न करता अंशत: बंदी करण्याचा कायदा केला आहे.

चालू घडामोडी : २८ एप्रिल

सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानी

  • ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
  • या यादीत कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. हिमाचल प्रदेश नंतर केरळ आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार आहे.
  • देशभरातील २० राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागातील ३ हजारहून अधिक लोकांशी चर्चा करुन हा अहवाल तयार करण्यात आला.
  • सरकारी कामांसाठी देण्यात येणारी लाच आणि भ्रष्टाचाराच्या आधारे लाचखोर राज्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 
  • २० राज्यांमधून २०१७या वर्षात सुमारे ६,३५० कोटी रुपयांची लाच दिल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • २००५ च्या तुलनेत हा आकडा कमी आहे. २००५ मध्ये सुमारे २०,५०० कोटी रुपयांची लाच दिल्याचे समोर आले होते.
  • नोटाबंदीनंतर नागरी सेवेतील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी झाले असे मत अनेकांनी मांडल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • सरकारी कामातील भ्रष्टाचार, लाचखोरी कमी करण्यासाठी खूप काही करण्याची गरज असल्याचे सर्व्हेत सांगण्यात आले आहे.

आशियाई ग्रांप्री स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला सहा पदके

  • आशियाई ग्रांप्री ॲथलेटिक्स स्पर्धेतील दुसऱ्या टप्यात भारताच्या व्ही नीना हिने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले. पहिल्या टप्प्यात नीनाला रौप्यपदक मिळाले होते.
  • तसेच भारताच्या ज्युनिअर विश्वविजेत्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवत लंडन येथे होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेची पात्रता गाठली आहे.
  • नीरजने चौथ्या प्रयत्नात ८३.३२ मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली ८३ मीटरची पात्रता पार केली.
  • पहिल्या टप्प्यातील विजेता तैवानच्या चेंग चाओने विजयी मालिका कायम ठेवत ८६.९२ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले.
  • गोळाफेकमध्ये पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकासह लंडनची पात्रता गाठणाऱ्या मनप्रीत कौरला दुसऱ्या टप्प्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ६.३२ सेकंदात रौप्य तर १०० मीटर शर्यतीत द्युती चंदने ११.५७ सेकंदात रौप्यपदक जिंकले. ओमप्रकाश करानाने गोळाफेकमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.

भारत बनणार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

  • २०२२मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तवला आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढल्यामुळे आता ब्रिटन जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधील आपले स्थान गमावणार आहे.
 आयएमएफच्या अहवालातील ठळक मुद्दे 
  • भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या काळात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल.
  • कर रचना, घटलेले उत्पादन, शाश्वत विकासासह रोजगार निर्मिती, कॉर्पोरेट क्षेत्रातून होणारी गुंतवणूक आणि पायाभूत सोयी सुविधांची कमतरता ही येत्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असतील.
  • भारताची अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या निर्णयातून अद्याप सावरत आहे. नोटाबंदीमुळे बाजारातील तब्बल ८६ टक्के चलन रद्द झाले होते.
  • भारतात वस्तू आणि सेवा कर कायदा १ जुलैपासून लागू होणार आहे. जीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती फायदेशीर ठरेल, याबद्दल अर्थतज्ज्ञ साशंक आहेत.
  • बुडीत कर्जे, पुनर्रचना करण्यात आलेली कर्जे यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्राची स्थिती फारशी उत्तम नाही.
  • बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाचे प्रमाण वाढल्याने बँकांनी कर्जवसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे बँका सध्या नवे कर्ज देण्याच्या प्रयत्नात नाहीत.
  • त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत. परिणामी रोजगार निर्मितीचे प्रमाण कमी झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाग्यलक्ष्मी योजना

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की ५० हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले आहे.
  • भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून. मुलीच्या आईलाही ५,१०० रुपये मिळणार आहेत.
  • उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे या योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

चालू घडामोडी : २७ एप्रिल

जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

  • अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे विनोद खन्ना यांचे २७ एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
  • विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले होते.
  • १९६८मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
  • त्यानंतर अनेक सिनेमात सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
  • १९७१मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘दयावान’ या सिनेमाने विनोद खन्ना यांना नावलौकीक मिळाले होते.
  • मेरे अपने, कुर्बानी, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी या सिनेमांमधून त्यांनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले.
  • २०१५मधील ‘दिलवाले’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता.
  • यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना सिनेसृष्टीला अलविदा करून आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांच्याकडे निघून गेले होते.
  • १९९७मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय होत भाजप पक्षामध्ये दाखल झाले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूरमधून ते खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
  • १९९९ ते २००४ या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रीपदही भूषवले. जुलै २००२मध्ये त्यांची सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रीपदी व त्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली.
  • परराष्ट्र राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर विनोद खन्ना यांनी भारताचे पाकिस्तान तसेच पॅलेस्टाईनसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला.
  • भारत आणि पाकिस्तानमधील बस सेवा करारात त्यांनी दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • संयुक्त राष्ट्रात दहशतवादाचा मुद्दा प्रभावी मांडण्यासाठी पॅलेस्टाईनचे सहकार्य मिळावे यासाठी विनोद खन्ना यांनी प्रयत्न केले होते.
  • २००४ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विनोद खन्ना गुरुदासपूरमधून खासदार झाले. पण २००९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
  • सिनेसृष्टीत प्रसिद्धी कमावल्यानंतर राजकारणातही यशस्वी झालेल्या काही निवडक व्यक्तींपैकी विनोद खन्ना होते. ते बॉलिवूड इतकेच राजकारणातही यशस्वी ठरले.

सातारा महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा

  • अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
  • प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये या जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
  • घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक ठिकाणची व वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.
  • जून २०१६मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते.
  • सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे.
  • ग्रामपंचयातींची तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती.
  • या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला.
  • २४ एप्रिल रोजी या अहवालावरून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.

चीनच्या पूर्णपणे देशी बनावटीच्या युद्धनौकेचे जलावतरण

  • चीनने २७ एप्रिल रोजी पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले.
  • अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला आहे.
  • ‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५मध्ये सुरु झाली होती. 
  • सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका २०२०पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल होईल.
  • २०२०पर्यंत नौदलाचा विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे.
  • या कामगिरीने हा कम्युनिस्ट देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या निवडक देशांच्या पंक्तींत पोहोचणार आहे.

चालू घडामोडी : २६ एप्रिल

दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडे सत्ता कायम

  • उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता दिल्ली महापालिकेत भाजपने सत्ता राखत सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला.
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा पटकावणाऱ्या ‘आप’ला महापालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.
  • सत्ताविरोधी वातावरण असूनही भाजपने दिल्ली महापालिकेतील सत्ता राखली आहे. यानंतर आम आदमी पक्षाने ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडले आहे.
  • उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तीन महानगरपालिकांमधील २७० जागांसाठी २३ एप्रिलला मतदान घेण्यात आले होते.
  • या निवडणुकीत भाजपने १८५, आपने ४६, काँग्रेसने २८ तर इतर पक्षांनी ११ जागांवर विजय मिळवला.

सीआरपीएफच्या महासंचालकपदी राजीव राय भटनागर

  • छत्तीसगडच्या सुकमामधील नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे.
  • फेब्रुवारी महिन्यात के दुर्गा प्रसाद सीआरपीएफच्या महासंचालक पदावरुन निवृत्त झाले. यानंतर सुमारे दोन महिने हे पद रिक्त होते.
  • या काळात छत्तीसगडमध्ये
  •  दोनवेळा नक्षलवाद्यांचे हल्ले झाले. त्यामुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
  • सध्या सीआरपीएफचे कार्यकारी महानिरीक्षक सुदीप लख्ताकिया यांच्याकडे सीआरपीएफच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त भार होता.
  • राजीव राय भटनगार १९८३च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी असून, सध्या ते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) महासंचालकपदी कार्यरत आहेत.
  • त्याआधी भटनागर यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदाची धुरा सांभाळली आहे.
  • याशिवाय आर के पचनंदा यांची भारत तिबेट सीमा पोलीसच्या (आयटीबीपी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • पचनंदा हे बंगाल कॅडरमधील १९८३च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते एनडीआरएफच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत.

भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल उत्तेजक चाचणीत दोषी

  • अर्जुन पुरस्कारविजेता भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक सुब्रत पॉल उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
  • सुब्रतच्या ‘अ’ नमुन्यामध्ये बंदी असलेला पदार्थ आढळला आहे. हा पदार्थ टर्बुटेलाईन आहे. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर टर्बुटेलाईनचा वापर होतो.
  • अस्थमासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये, तसेच खोकला व सर्दीसाठी देण्यात येणाऱ्या साधारण औषधांमध्येही हा पदार्थ असतो.
  • पण एखाद्या खेळाडूला अस्थमासंबंधित औषध घ्यायचे असल्यास त्याला टीयूई (उपचारासाठी विशेष सूट) प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.
  • वाडाने टर्बुटेलाईनला ‘बीटा-२ एगोनिस्ट्स’ गटात ठेवले आहे. या गटातील औषधांचा कुठल्याही स्थितीत स्पर्धेदरम्यान किंवा अन्य वेळी उपयोग करता येत नाही.
  • फुटबॉलपटू सुब्रतने निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी ‘बी’ सॅम्पलची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वाडाच्या नव्या नियमानुसार प्रथमच डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूवर जास्तीत जास्त चार वर्षांची बंदी घालण्यात येते.
  • पॉलने भारतातर्फे २००७मध्ये पदार्पण केले होते. २०१५पर्यंत त्याने ६४ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • भारताने २००७ व २००९ मध्ये नेहरु चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, त्यावेळी सुब्रतने त्यात मोलाचा वाटा उचलला होता.
  • भारताने २००८मध्ये एफसी चॅलेंज चषक जिंकून २०११ मधील दोहा एएफसी आशियाई चषकासाठी पात्रता मिळवली, त्यावेळी देखील सुब्रतने दर्जेदार गोलरक्षण साकारले होते.

बॅक ऑफ इंडिया ८९ गावांना दत्तक घेणार

  • बॅक ऑफ इंडियाने डिजिटलायझेशनसाठी राज्यातील ४९ शाखा असलेल्या क्षेत्रातील ८९ गावांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये २२७ पीओएस (पॉईन्ट ऑफ सेल) मशिन बसविण्यात येणार आहेत.
  • सप्टेंबर २०१७पर्यंत ५७ झोनमधील कमीत कमी पाच गावे डिजिटल करण्याचे लक्ष्य बॅक ऑफ इंडियाने समोर ठेवले आहे. 
  • बॅंक ऑफ इंडियाच्या ३१ जानेवारी २०१७पर्यंत एकूण ५१०० शाखा आहेत. त्यामधील २००० शाखा ग्रामीण भागात आहेत.

चालू घडामोडी : २५ एप्रिल

एचआयव्ही आणि एड्स कायदा २०१७ मंजूर

  • एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा २०१७ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली. याबाबतचे विधेयक लोकसभेने ११ एप्रिल तर राज्यसभेने २१ मार्चलाच पारित केले होते.
  • या नव्या कायद्यात एचआयव्हीग्रस्त लोकांची मालमत्ता व अधिकार यांचे संरक्षण करण्याची हमी देण्यात आली आहे.
 या कायद्यातील प्रमुख तरतुदी 
  • एचआयव्ही किंवा एड्सने बाधित असलेल्या लोकांना नोकऱ्या नाकारता येणार नाहीत किंवा त्यांना नोकरीवरून काढून टाकता येणार नाही.
  • अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना किमान ३ महिने कैद (जी दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते) आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड.
  • एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे उघड करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांपर्यंत दंड.
  • एचआयव्ही किंवा एड्सने ग्रस्त लोकांबाबत नोकरीत किंवा शैक्षणिक संस्थेत अथवा आरोग्य सेवा पुरवण्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यास या कायद्याने प्रतिबंध.
  • एचआयव्हीग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इतरांसोबत राहण्याचा, सामायिक निवासव्यवस्थेतून वगळले न जाण्याचा आणि अशा निवासातील सर्व सोयींचा वापर करण्याचा कुठल्याही भेदभावाशिवाय हक्क राहील.
  • अशा व्यक्तीच्या मंजुरीशिवाय त्याची एचआयव्ही चाचणी, वैद्यकीय उपचार किंवा संशोधन केले जाऊ शकणार नाही.
  • एखाद्या व्यक्तीबाबतची माहिती न्यायाच्या हितार्थ आवश्यक आहे, अशा आशयाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याची एचआयव्हीबाबतची स्थिती जाहीर करण्यास भाग पाडता येणार नाही.

पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रफुल्ल सामंत्रा यांना गोल्डमन पुरस्कार

  • पर्यावरणवादी सामाजिक न्याय कार्यकर्ते प्रफुल्ल सामंत्रा यांना सॅनफ्रान्सिको येथे पर्यावरणातील ‘गोल्डमन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • यापूर्वी हा पुरस्कार मेधा पाटकर, एम.सी. मेहता, रशीदाबी, चंपारण शुक्ला, रमेश अग्रवाल या भारतीयांना मिळाला आहे.
  • जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीपासून कार्यरत असलेले सामंत्रा भारतातील पर्यावरण लढ्यातील एक सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रसिध्द आहे.
  • ब्रिटनमधील वेदांता रिसोर्सेस या कंपनीशी ओदिशा स्टेट मायनिंग कंपनीने २००४मध्ये करार केला. त्यानुसार नियामगिरी पर्वत खोदला जाणार होता.
  • या पर्वताच्या परिसरातील कालाहांडी व रायगडा जिल्ह्यांत बॉक्साइटच्या खाणी आहेत. वेदांता कंपनीने तेथे दोन अब्ज डॉलरचा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते.
  • ओदिशात ८ हजार वर्षांपूर्वीची डोंगरी कोंढ ही आदिवासी जमात नियामगिरी पर्वत परिसरात वास्तव्य करते. तेथील वनांचे जैववैविध्य त्यांच्यामुळेच टिकून आहे.
  • पण जैवविविधतेने नटलेला हा नियामगिरी पर्वत, तेथील आदिवासी जाती-जमाती या प्रकल्पाचा बळी ठरणार होते.
  • अशा परिस्थितीत प्रफुल्ल सामंत्रा यांनी वेदांता कंपनीविरोधात आदिवासींच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. 
  • प्रफुल्ल यांना वकिली व्यवसायाचे प्रशिक्षण असल्याने ते ही लढाई न्यायाच्या दरबारात नेऊ शकले. डोंगरी कोंढ लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी १२ वर्षे लढा दिला.
  • हा लढा सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी भुवनेश्वर येथे ठिय्या आंदोलने केली. १० मैलांची मानवी साखळीही वेदांताला रोखण्यासाठी करण्यात आली होती.
  • मे २०१६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेदांता कंपनीच्या विरोधात निकाल दिला. त्या भागात जर कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर त्यासाठी तेथील आदिवासींची परवानगी घ्यावी लागेल असा दंडक न्यायालयाने घालून दिला.

मनप्रीत कौरला गोळाफेकीत सुवर्णपदक

  • आशियाई ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरने गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
  • या स्पर्धेत भारताने या सुवर्णपदकाबरोबरच चार रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली.
  • पंजाबच्या मनप्रीतने सर्वोत्तम कामगिरी करताना १८.८६ मीटपर्यंत गोळा फेकला आणि २०१५मध्ये तिनेच नोंदविलेला १७.९६ मीटर हा राष्ट्रीय विक्रम मोडला. 
  • या सुवर्णपदकाबरोबरच ती आगामी जागतिक स्पर्धेसाठी असलेला १७.७५ मीटर हा निकष पूर्ण केला आहे. ही स्पर्धा ऑगस्टमध्ये लंडन येथे होणार आहे.
  • लांब उडीत नीना वाराकिलने रौप्यपदकाची कमाई करताना ६.४६ मीटपर्यंत उडी मारली. टिंटू लुकाने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य मिळविले. द्युती चंदने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले.
  • पुरुषांच्या विभागात नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक पटकाविले. त्याने ८२.११ मीटपर्यंत भाला फेकला.
  • ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जॉन्सनने रौप्यपदक तर गोळाफेकीत ओमप्रकाश कऱ्हाना याने कांस्यपदकावर नाव कोरले.

आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार

  • अभिनेता आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • आमिर खानला दंगल या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आमिर खानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • आमिर खान सोबतच अभिनेत्री वैजयंती माला, अभिनेत्री आशालता, प्रदीर्घ क्रिकेटपटू निर्माते सुनील बर्वे आणि गायिका कौशकी चक्रवर्ती यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले.

माजी सीबीआय संचालकांविरोधात एफआयआर दाखल

  • कोळसा घोटाळा प्रकरणी माजी सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे.
  • कोळसा घोटाळ्याचा तपास त्यांच्याकडे असताना त्यांनी तपासामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२), १३(१)(ड) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • रणजित सिन्हा यांची या प्रकरणात चौकशी व्हावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वी दिले होते.
  • या प्रकरणासाठी माजी सीबीआय प्रमुख एम एल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
  • सिन्हा यांनी या घोटाळ्यातील आरोपींसोबत खासगी भेट घेतल्याचे या समितीने न्यायालयाला सांगितले.
  • सीबीआयच्या आतापर्यंतच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच या संस्थेच्या माजी प्रमुखांवर गुन्हा नोंदवण्याची नामुष्की सीबीआयवर आली आहे.
  • याआधी सीबीआयचे माजी प्रमुख ए पी सिंग यांच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मांस निर्यातक मोईन कुरैशी यांची बाजू घेतल्याच आरोप आहे.

चालू घडामोडी : २४ एप्रिल

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान शहीद

  • छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) २६ जवान शहीद झाले.
  • तसेच काही जवान या हल्ल्यात जखमी झाले असून यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
  • सीआरपीएफच्या ७४व्या बटालियनमधील ९० जवानांची तुकडी नक्षलवाद्यांनी बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्याच्या काम करत होती.
  • बुरकापाल चिंतागुफा दरम्यानच्या परिसरात हे काम चालू असताना ३०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
  • नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीत सीआरपीएफचे २६ जवान शहीद झाले तर ५ नक्षलवादी मारले गेले आहेत.
  • गेल्यावर्षी सुकमा जिल्ह्यात कोट्टाचेरू येथील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २१९व्या बटालियनचे १२ जवान शहीद झाले होते.
  • यापूर्वी २०१०मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. हा भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात भीषण हल्ला होता.

कसिनाधुनी विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  • प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्वनाथ यांना २०१६चा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सुवर्ण कमळ, शाल व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्वनाथ यांना ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • विश्वनाथ यांना आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यांना दहा वेळा फिल्मफेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.
  • ‘स्वाथी मुथायम’ हा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ५९व्या अकादमी पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी पाठविण्यात आला होता.
  • याशिवाय, संकरभरणम या त्यांच्या चित्रपटासदेखील भारतासहित जगभरातून वाखाणण्यात आले होते.

नवज्योतसिंग सिद्धू यांची शेतकऱ्यांना २४ लाखांची मदत

  • नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतीचे नुकसान भरुन काढण्यासाठी स्वत:च्या उत्पनातून शेतकऱ्यांना २४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • पंजाबमधील ओठीया परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये ३०० हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले होते.
  • सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सिद्धूनीं स्वत:च्या खिशातून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.
  • यापूर्वी आगीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
  • काँग्रेसचे नवज्योतसिंग सिद्धू पंजाबच्या अमृतसर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत.

अफगाणच्या संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमूखांचा राजीनामा

  • अफगाणिस्तानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणचे संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमूख कादम शाह शाहीम यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • उत्तर अफगाणिस्तानमध्ये मझर-इ-शरिफ या शहराजवळील लष्करीतळावर १० सशस्त्र दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी हल्ला केला होता.
  • तालिबानी दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात १६०हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.
  • सैन्याचे जवान नमाज अदा करत असताना हा हल्ला झाल्याने जीवितहानीचे प्रमाण जास्त होते. यामध्ये नव्याने सैन्यात भरती झालेल्या जवानांचे प्रमाणही लक्षणीय होते.
  • हा हल्ला ज्या तळावर झाला त्यानंतर तळावरील कमांडर यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
  • या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस हे काबूल दौऱ्यावर दाखल झाले आहेत.
  • अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधील इसिसच्या तळावर मोठा बॉम्ब हल्ला करुन अनेक दहशतवादी ठार केले होते. या कारवाईनंतर तालिबानी संघटनेने हा हल्ला केला होता.
  • अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष: अश्रफ घनी

रॉनी स्क्रूवाला यांच्याकडून ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना

  • ऑनलाइन एज्यूकेशन स्टार्ट अपचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी आता ऑनलाइन स्कॉलरशिप निधीची स्थापना केली आहे. आशिया खंडात अशा स्वरुपाचा निधी सुरु केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • भारतीय तरूणांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करणे, हे या  उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
  • भविष्यात डिजिटल क्षेत्रातील वाढत्या संधी आणि महत्त्व लक्षात घेता भारतीय तरूणांना त्यासाठी मदत तयार करण्यासाठीही या उपक्रमाची मदत होईल.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला १०० कोटी आणि भविष्यात ३०० ते ४०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा स्क्रूवाला यांचा मानस आहे.
  • भारतात उच्चशिक्षित तरुणांची मोठ्या प्रमाणात गरज असून त्या तुलनेत देशात उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण नगण्य आहे.
  • कमी वयात नोकरीला लागल्याने अनेकांचे उच्चशिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. पण अशा विद्यार्थ्यांना आता रॉनी स्क्रूवाला यांनी मदतीचा हात दिला आहे.
  • या उपक्रमाच्या माध्यमातून २५ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • शिष्यवृत्तीसाठी पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नोकरी लागल्यानंतर त्यांना हे कर्ज फेडता येईल.
  • याशिवाय, आर्थिक गरज असलेल्यांना या निधीतून मदत पुरवली जाईल. मात्र, ही शिष्यवृत्ती देताना गुणवत्ता हाच प्रमुख निकष असेल.

मासिक : मार्च २०१७

'मार्च२०१७'च्या चालू घडामोडींच्या सखोल अभ्यासासाठी तसेच MPSC, PSI, STI, ADO व इतर अनेक परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी MPSC Toppersचे PDF स्वरूपातील हे मासिक मोफत डाउनलोड करा.

२०१७पासून आम्ही मासिक नव्या स्वरूपात सादर करत आहोत. या मासिकामध्ये चालू घडामोडींची विविध राष्ट्रीय, क्रीडा, आंतरराष्ट्रीय इ. विभागात आम्ही विभागणी केली आहे.

मासिक आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की SHARE करा.

हे मासिक फक्त MPSC Toppers मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.


हे मासिक मोफत PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी MPSC Toppersचे मोबाईल अॅप डाउनलोड करा. Link : MPSC Toppers Mobile App (Version 3.0)
★ अभ्यासासाठी सर्वांना शुभेच्छा ★

चालू घडामोडी : २३ एप्रिल

देशाच्या नियोजनबद्ध व वेगवान विकासासाठी १५ वर्षांचा रोडमॅप

  • नीती आयोगाच्या २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत देशाचा नियोजनबद्धरित्या आणि वेगाने विकास घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला.
  • यात पुढील सात वर्षांसाठीचे रणनीती ठरवणारा दस्तऐवज आणि तीन वर्षांचा कृती कार्यक्रम समाविष्ट आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी, नीती आयोगाचे सदस्य आणि विशेष निमंत्रित पाहुणे उपस्थिती होते.
  • मात्र या बैठकीला  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहिले. केजरीवाल यांच्याऐवजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया बैठकीत सहभागी झाले.
  • नव्या भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा राज्य सरकारे आणि त्यांचे मुख्यमंत्री मिळून प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 

कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांना मुदतवाढ

  • केंद्र सरकारने ६१ वर्षीय कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पुढच्या जून महिन्यापर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
  • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने सिन्हा यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
  • सिन्हा यांनी १३ जून २०१५ रोजी अजीत सेठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. कॅबिनेट सचिवांचा कार्यकाळ साधारण दोन वर्षांचा असतो.
  • सिन्हा यांना मुदतवाढ मिळाल्याने ते आता एकूण तीन वर्षे या पदावर सेवा देणारे अधिकारी ठरणार आहेत.
  • उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी सिन्हा याआधी ऊर्जा सचिव होते. १९७७च्या बॅचच्या सचिवांमध्ये ते सर्वात जेष्ठ अधिकारी आहेत.
  • सिन्हा यांनी अलाहाबादमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. २०१३ ते २०१५ या काळात ते ऊर्जा सचिव होते.

कावेह मदानी यांना ह्य़ुबेर नागरी अभियांत्रिकी संशोधन पुरस्कार

  • इराणचे नागरी अभियंता डॉ. कावेह मदानी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनीयर्सचा (एएससीई ) ह्य़ुबेर नागरी अभियांत्रिकी संशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मध्यमवयीन संशोधकांसाठी नागरी अभियांत्रिकीत ह्य़ुबेर पुरस्कार हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो.
  • डॉ. मदानी यांनी पाण्याचे कमी स्रोत असताना त्याचे वाटप वेगळ्या पद्धतीने तर केले आहेच, शिवाय गेम थिअरीवर आधारित संकल्पना पाण्याच्या जटिल समस्येवर वापरल्या आहेत.
  • जलस्रोतांचे नियोजन व गेम थिअरी यांचा संबंध त्यांनी जोडला आहे. त्या क्षेत्रात मोठे काम केले आहे.
  • त्याचा वापर ऊर्जा क्षेत्रातही होत असून अप्रत्यक्ष फायदा हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी होत आहे.
  • गेल्या वर्षी मदानी यांना अर्नी रिश्टर पुरस्कार हा युरोपीय जिओसायन्सेस युनियनकडून देण्यात आला होता. अशाप्रकारे जगातील दोन प्रतिष्ठित संस्थांनी आतापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
  • पर्यावरण-ऊर्जास्रोतांचे वाटप व व्यवस्थापन, अभियांत्रिकी प्रणालींचा वापर, सिस्टीम डायनॅमिक्स, पाण्याच्या वाटपाचे प्रारूपीकरण तसेच सादृश्यीकरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.
  • कावेह मदानी यांचा जन्म १९८१मध्ये तेहरान येथे झाला. त्यांनी ताब्रिझ विद्यापीठातून नागरी अभियांत्रिकीत बीएस्सी पदवी घेतली.
  • नंतर ते स्वीडनला गेले व तेथे जलस्रोत विषयात पीएचडी केली, नंतर डेव्हिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची डॉक्टरेट पदवी घेतली.
  • सध्या ते लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये सिस्टीम अ‍ॅनॅलिसिस व पॉलिसी या विभागात रीडर आहेत. त्यापूर्वी ते पर्यावरण व्यवस्थापनाचे व्याख्याते होते.
  • फेब्रुवारी २०१७मध्ये हवामान बदल विषयावर इराणमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती, त्याचे ते सचिव होते.
  • अमेरिकेत एएससीई ही नागरी अभियांत्रिकीतील प्रख्यात संस्था १८५२मध्ये स्थापन झाली. त्याचे १७७ देश सदस्य आहेत. त्या संस्थेचा प्रतिष्ठित पुरस्कार आता त्यांना मिळाला आहे.

मलेरियावरील पहिली लस चाचणीसाठी तयार

  • मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जाहीर केले आहे.
  • या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.
  • ग्लॅक्सो स्मिथ क्लीन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्युरिक्स) ही लस तयार केली आहे.
  • ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे.
  • पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस पाच ते सतरा महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे.
  • प्रयोगशाळांमधील चाचणीवेळी लसीचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसून येतात का, हे या वेळी तपासले जाणार आहे.
  • ही लस तयार करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधक प्रयत्न करत होते आणि यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च आला आहे.
  • केनिया, घाना आणि मलावी या देशांमध्ये चांगले प्रतिबंधात्मक उपाय योजिले जात असूनही रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कायम असल्याने या तीन देशांची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.
  • अद्यापही डॉक्टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो.
  • मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात झालेल्या विविध प्रयत्नांमुळे गेल्या १५ वर्षांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ६२ टक्क्यांनी घट झाली आहे.
  • २०४०पर्यंत जगभरातून मलेरियाची समस्या दूर करण्याचे डब्लूएचओचे लक्ष्य आहे.

युनिस खानच्या कसोटीत १० हजार धावा

  • वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानचा फलंदाज युनिस खान याने १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
  • याबरोबरच तो पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानकडून यापूर्वी जावेद मियांदाद यांच्या नावे हा विक्रम होता.
  • मियांदाद यांनी ८८३२ धावा केल्या होत्या. युनिसने अबूधाबी येथे इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात हा विक्रम मोडला होता.
  • ५३च्या सरासरीने त्याने २०८व्या डावात हा टप्पा पार केला. आतापर्यंत १३ फलंदाजांनी दहा हजार धावा फटकावण्याची किमया साधली आहे.

चालू घडामोडी : २२ एप्रिल

संयुक्त राष्ट्रांच्या उपसमितीवर भारताची निवड

  • संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक परिषदेचा कार्यक्रम व समन्वय उपसमितीवर भारताची निवड करण्यात आली. भारतासोबत इतर १२ देशांनाही या समितीवर निवडण्यात आले.
  • भारताला ५० पैकी ४९ मते मिळाली असून, आशियाई समूहात भरलाच सर्वाधिक मते मिळाली.
  • या उपसमितींचे सदस्यत्व तीन वर्षांसाठी राहणार असून, जानेवारी २०१८ पासून कालावधी सुरू होणार आहे.
  • या उपसमितीवर भारत व्यतिरिक्त बर्किना फासो, इराण, जपान, पाकिस्तान, बेलरूस, बुल्गारिया, मालदिव, ब्राझिल, चिली, क्यूबा, ब्रिटेन व अमेरिका निवडून आले आहे.
  • याशिवाय भारतासह अन्य १९ देश इंटरनॅशनल नाटकोटिक्स कंट्रोल बोर्डसाठी निवडून आले. या मंडळाचा कार्यकाळ चार वर्षांचा असून, तो जानेवारी २०१८ पासून सुरू होणार  आहे.
  • संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी: सैयद अकबऊद्दीन

डॉ. नरसिंह मूर्ती यांना पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्कार

  • नामवंत इतिहासकार, नाणीशास्त्रातील जाणकार आणि पुरातत्त्वशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा. ए व्ही नरसिंह मूर्ती यांना प्रतिष्ठेचा पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • शालेय जीवनापासून मूर्ती यांना इतिहास या विषयाची आवड होती. पुढे त्यांनी याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक मिळाल्याने ७०च्या दशकात ते म्हैसुरू विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पुढे डॉ. मूर्ती विद्यापीठात इतिहास विभाग प्रमुख बनले.
  • पुढे १९७८मध्ये प्राचीन इतिहासावरील पहिले पुस्तक लिहिताना मूर्ती यांनी त्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि वारसा यांच्याविषयी मूलगामी चिंतन केले.
  • इतिहासाबरोबरच नाणीशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्राचाही त्यांनी अफाट व्यासंग केला. ‘द कॉइन्स ऑफ कर्नाटका’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या व्यासंगाची साक्ष देते.
  • तिरुपतीच्या मंदिरात जमा होणाऱ्या प्राचीन नाण्यांचे वर्गीकरण करण्याचे महत्त्वाचे कामही मूर्ती यांनी केले आहे.
  • ‘इण्डियन एपिग्राफी’, ‘हेमकुटा’, ‘द सेव्हरन्स ऑफ देवगिरी’ यांसारखी इतिहासावरील अनेक क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिली, जी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.
  • विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय विद्या भवनच्या म्हैसुरू शाखेत त्यांना निमंत्रित करण्यात आले. आज ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
  • इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भर घातल्याबद्दल त्यांना पुदुरू गुरुराज भट स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

न्यूझीलंडमध्येही नोकरीविषयक व्हिसाचे नियम कठोर

  • अमेरिका आणि आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडनेही विदेशी नागरिकांसाठी नोकरीविषयक व्हिसाचे नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • न्यूझीलंडमधील विदेशी कर्मचाऱ्यांची संख्या सध्या सार्वकालिक उच्च पातळीवर गेली आहे. ही संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भारतीय नोकरदारांना फटका बसणार आहे.
  • काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने कुशल कामगारांचा व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे नियम कठोर करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.
  • त्यानंतर आता न्यूझीलंड सरकारने विदेशी नागरिकांच्या नोकऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी व्हिसा नियम कठोर करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
  • नव्या नियमानुसार कुशल कामगार या संज्ञेला पात्र होण्यासाठी विदेशी कामगारांना न्यूझीलंडमध्ये किमान सरासरी वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल.
  • उच्च कुशल कामगार या संज्ञेला प्राप्त होण्यासाठी विदेशी कामगारांना किमान सरासरी वेतनाच्या १५० टक्के वेतन देणारी नोकरी मिळवावी लागेल.
  • फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार, न्यूझीलंडमधील विदेशी कामगारांची संख्या ७१,३०० आहे. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १.५ टक्के आहे.
  • न्यूझीलंडमध्ये चीन, भारत आणि ब्रिटन येथील कामगारांची संख्या अधिक आहे. त्यातही विदेशी कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये भारतीयांचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास आहे.

तुषार आरोठे यांना भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद

  • बडोद्याचे माजी फलंदाज तुषार आरोठे यांच्याकडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्याच्या प्रशिक्षक पूर्णिमा राव यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे.
  • आरोठे २००८ ते २०१२ या कालावधीत महिला संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक होते.
  • महिलांची विश्वचषक स्पर्धा जून व जुलैमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी आरोटे यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

चालू घडामोडी : २१ एप्रिल

देवगड हापूसला जीआय मानांकन

  • देवगड हापूसला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन (भौगोलिक उपदर्शन) मिळाले असून देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही आंब्याची विक्री केली जाणार नाही.
  • गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जी. आय. मानांकनाच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे.
  • जी. आय. मानांकनासाठी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली असून ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे.
  • देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा देशात कुठल्याही आंब्याला नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे.
  • त्यामुळेच कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विक्री केला जात होता. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती.
  • देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी आंबा ही विक्री रोखली जाणार आहे. देशाबाहेरही आता देवगड हापूस या नावानेच हा आंबा विकला जाणार आहे.
  • देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो.
  • हापूस आंब्याच्या जी. आय. मानांकनासाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे रत्नागिरी हापूस, दापोली कृषी विद्यापीठामार्फत हापूस व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने देवगड हापूस असे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.
 भौगोलिक उपदर्शन म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी व पेटंटची मान्यता दिली जाते, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • खादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१ साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यू.टी.ओ.) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • आतापर्यंत महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सोलापूर चादर, सोलापूर टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिकची वाईन, पैठणी साडी, कोल्हापुरी गुळ आणि नाशिकच्या द्राक्षांना अशा प्रकारचे जीआय मिळालेले आहे.
  • जीआय मानांकनाचे फायदे 
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी 
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख 
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव

हॉटेलमध्ये सेवा शुल्क (टिप) देणे ऐच्छिक

  • केंद्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयने गेल्या काही दिवसांपूर्वीच सेवा शुल्काबाबत तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी मिळाली आहे.
  • त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांवर लावण्यात येणारे सेवा शुल्क (टिप) देणे सक्तीचे असणार नाही.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये किती सेवा शुल्क द्यायचे, हे ग्राहकच ठरवणार असून, सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना असणार नाही.

हाफिज सईदला पाकिस्तानने  दहशतवादी म्हणून घोषित केले

  • मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानने अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
  • हाफिझ सईदला ३० जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे अवैध असल्याची याचिका जमात-उद-दावा या संघटनेने न्यायालयात केली होती.
  • परंतु पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे.
  • सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले होते. 
  • त्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानने हाफिजला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

चालू घडामोडी : २० एप्रिल

बाबरी मशीद प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप

  • भारतीय राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या सन १९९२मधील बाबरी मशीद न्यायालयीन प्रकरणावर न्या. पी सी घोष व न्या. आर एफ नरिमन यांनी १९ एप्रिल रोजी निवाडा दिला.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह अन्य भाजप नेत्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • या प्रकरणातील बड्या आरोपींवर गुन्हेगारी कटाचा आरोप पुन्हा ठेवण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) याचिका न्यायालयाने मान्य केली.
  • या आदेशामुळे आगामी राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेले ८९ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना धक्का बसला आहे.
  • अडवाणींसह सहा आरोपींना आता धर्माच्या आधारे दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे, प्रक्षोभक विधाने करणे अशा विविध आरोपांना तोंड द्यावे लागेल.
  • हे आरोप सिद्ध झाल्यास दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील ठळक मुद्दे 
  • अडवाणी व इतर पाच आरोपींवर रायबरेली येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेला खटला लखनौ येथील अतिरिक्त सेशन्स न्यायमूर्तीच्या न्यायालयात वर्ग करावा.
  • या सहा आरोपींवर कलम १२० बी अन्वये फौजदारी कटाचा आरोप नव्याने ठेवून कटला चालविला जाईल.
  • लखनौ येथील या न्यायालयात अयोध्या प्रकरणीच्या दुसऱ्या खटल्याची सुनावणी सुरू आहेच. हे दोन्ही खटले तेथे एकत्रितरीत्या चालवले जावेत.
  • त्यानंतर लखनौ येथील न्यायालयाने चार आठवडय़ांच्या आत या खटल्यांवर रोज सुनावणीस प्रारंभ करावा.
  • अडवाणी व इतर आरोपींविरुद्धचा कटाचा आरोप वगळण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा होता.
  • बाबरी पडणे व कटकारस्थान या दोन प्रकरणांतील जवळपास सारे पुरावे समानच असल्याने ते एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत.
  • मात्र एकत्रितपणे चालणारा हा खटला पूर्णपणे नव्याने चालणार नाही. रायबरेली व लखनऊ न्यायालयात आधी ज्या टप्प्यापर्यंत कामकाज झाले होते तेथून पुढे काम सुरु राहील.
  • खटला संपेपर्यंत न्यायमूर्तीची बदली केली जाणार नाही. एखाद्या दिवशी खटला चालविणे अगदीच अशक्य आहे, असे वाटल्याखेरीज खटला तहकूब केला जाणार नाही.
  • आजच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत लखनौ येथील न्यायालय यावर निकाल देईल.
  • या प्रकरणातील साक्षीदार दररोज सुनावणीसाठी हजर राहतील आणि खटल्याच्या सुनावणीत विलंब होणार नाही याची सीबीआयने दक्षता घ्यावी.
  • लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्याखेरीज साध्वी ऋतंबरा, विनय कटियार व विष्णू हरी दालमिया अशा एकूण सहा आरोपींवर कटाचा खटला चालविला जाईल.
  • याच प्रकरणातील अशोक सिंघल व गिरीराज किशोर या दोघा नेत्यांचे याआधी खटला चालू असताना निधन झाले.
  • बाबरी प्रकरण घडले तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व आत्ताचे राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह हे देखील या प्रकरणातील आरोपी आहेत. मात्र राज्यपाल असल्याने तूर्तास ते यातून सुटले आहेत.
  • मात्र ते राज्यपालपदावरून पायउतार होताच त्यांच्यावर आरोप ठेवले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 पार्श्वभूमी 
  • बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी जमीनदोस्त केली, त्या वेळी मुरली मनोहर जोशी भाजपाचे अध्यक्ष होते.
  • बाबरी मशीद प्रकरणात पहिली एफआयआर लखनौत दाखल झाली होती. तर दुसरी एफआयआर फैजाबादमध्ये दाखल झाली होती व काही दिवसांनी हा गुन्हा रायबरेलीकडे वर्ग करण्यात आला.
  • अशाप्रकारे बाबरी मशिद पाडण्याच्या संदर्भात रायबरेली आणि लखनौ येथे दोन स्वतंत्र खटले सुरु होते.
  • यापैकी रायबरेलीचा खटला बाबरी पाडणाऱ्या अज्ञात कारसेवकांविरुद्धचा तर लखनऊचा खटला चिथावणीखोर वातावण तयार करणाऱ्या नेत्यांविरुद्धचा होता.
  • या गुन्ह्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गिरीराज किशोर, अशोक सिंघल, उमा भारती अशा ८ मोठ्या नेत्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता.
  • यानंतर हे दोन्ही गुन्हे लखनौ न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयला तपासादरम्यान या नेत्यांविरोधात कट रचल्याचे पुरावे सापडले होते.
  • कालांतराने आरोपींमध्ये बाळासाहेब ठाकरेंसह आणखी १३ नेत्यांचा समावेश झाला. यानुसार एकूण आरोपींची संख्या २१ झाली होती.

सायरा बानो आणि विक्रम गोखले यांना राज्य शासनाचे पुरस्कार

  • ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्य शासनाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
  • मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना दरवर्षी राज्य शासनातर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
  • सायरा बानो यांना ‘राजकपूर जीवनगौरव’, तर विक्रम गोखले यांना ‘चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • याशिवाय, ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना आणि ‘राजकपूर विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.
  • जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ लाख रुपये  व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.

‘टाईम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी

  • ‘टाईम’ मासिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या अंतिम यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी स्थान मिळवले आहे.
  • या यादीत समावेश असणारे ते दोघेच भारतीय आहेत. गेल्या वर्षभरात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
  • मोदींशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचाही या यादीत समावेश आहे.

नक्षलवादी चळवळीचे कार्यकर्ते नारायण संन्याल यांचे निधन

  • सशस्त्र क्रांतीचा नारा देत नक्षलवादी चळवळीच्या प्रसारासाठी सारे आयुष्य पणाला लावणारे नारायण संन्याल यांचे १७ एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले.
  • त्यांच्या निधनाने, निधनाने या चळवळीतील फूट आणि एकीकरण जवळून अनुभवणारा एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. नक्षली चळवळीतील एके काळच्या आदर्शवादाचे प्रतीक लोपले.
  • संन्यालांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या बोग्रा जिल्ह्यात झाला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या वडिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सरोजिनी नायडूंसोबत काम केलेले.
  • संन्याल मात्र राजकारणात कधी रमले नाहीत. उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेल्या संन्यालांनी युनायटेड बँकेत नोकरी धरली.
  • १९६०च्या दशकात चारू मुजुमदारांनी दिलेला सशस्त्र क्रांतीचा नारा त्यांना भावला.
  • देशातील पीडित, गरीब व भूमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही या विचाराने प्रेरित झालेले संन्याल नक्षलवादींच्या लढय़ात सामील झाले.
  • या चळवळीतील नेत्यांमध्ये मतभेद झाल्यावर नारायण संन्याल थेट बिहारमध्ये गेले. तेथे त्यांनी सत्यरंजन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जमीनदारांच्या विरोधात भूमिहीनांची सशस्त्र सेना उभारली.
  • जेहानाबाद व पलामू क्षेत्रातील दुर्गम जंगलात राहून भूमिगत पद्धतीने काम करणाऱ्या संन्यालांनी देशभरातील सर्व क्रांतिकारी गटांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले. त्याला २००४मध्ये यश मिळाले.
  • पडद्याआड राहून या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संन्यालांना भाकप माओवादी या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात पॉलिट ब्यूरोत स्थान देण्यात आले.
  • चळवळीच्या विस्तारासाठी कधी बस्तर तर कधी झारखंड असा प्रवास करणाऱ्या या जहाल डाव्या नेत्याला २००५ला झारखंडमध्ये अटक करण्यात आली.
  • कारागृहात असताना संन्याल यांनी डॉ. विनायक सेन यांना अनेक पत्रे लिहिली होती. याचाच आधार घेत सेन यांनाही नंतर अटक झाली.
  • २०१४ला प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाल्यानंतर संन्याल दक्षिण कोलकात्याला राहायला गेले.
  • चळवळीच्या सध्याच्या स्वरूपाबद्दल निराशा प्रकट करणारे संन्याल शेवटपर्यंत चळवळीचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनच वावरले.
  • संन्याल यांच्या जाण्यामुळे आता चारू मुजुमदारांसोबत काम केलेले दोघेच चळवळीत उरले आहेत.
  • त्यापैकी प्रशांता बोस सध्या छत्तीसगडच्या जंगलात भूमिगत आहेत, तर अमिताभ बागची २००९ला अटक झाल्यापासून कोलकात्याच्या तुरुंगात आहेत.

चालू घडामोडी : १९ एप्रिल

केंद्र सरकारकडून लाल दिवा वापरण्यावर निर्बंध

  • देशातील अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालणाऱ्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १९ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.
  • १ मेपासून हा निर्णय लागू होणार असून, लाल, निळे, पांढरे, पिवळसर अशा सर्व दिव्यांच्या वापरावर हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. या संदर्भात मोटार वाहन कायद्याच्या कलम १०८मध्ये दुरुस्ती करण्यात येईल.
  • या निर्णयाने राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या गाडय़ांवर १ मेपासून कोणतेही दिवे नसतील.
  • फक्त आपत्कालीन सेवेमधील आणि मदतकार्यामध्ये सहभागी असणाऱ्या वाहनांनाच (रुग्णवाहिका, अग्निशामक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) निळा दिवा वापरण्याची परवानगी असेल. 
  • याशिवाय कर्तव्यावर असताना आणि आवश्यकता भासल्यास पोलीस अधिकारीही दिवा वापरू शकतील.
  • या बंदीच्या नियमातून व्हीव्हीआयपींना सवलत देण्याचा अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेतला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरसुद्धा कोणालाही कोणत्याही प्रकारचे दिवे वापरता येणार नाहीत.
  • यापूर्वी दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार येताच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:च्या व अन्य मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवा वापरण्यास निर्बंध घातले होते.
  • पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही मुख्यमंत्री होताच, लाल दिवा संस्कृती बंद केली. त्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसाच निर्णय घेतला.

व्हीव्हीपीएटी मशिन खरेदीला मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) मशिन घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • यासाठी केंद्र सरकारने ३,७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून देशभरासाठी सुमारे १६.१५ लाख मशिन घेतल्या जातील.
  • येत्या दोन वर्षांत निवडणूक आयोग बेंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन सरकारी कंपन्यांकडून व्हीव्हीपीएटी यंत्रे खरेदी करेल.
  • देशभरातील विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा विजय ईव्हीएममध्ये फेरफार केल्यानेच झाला असा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने व्हीव्हीपीएटी घेण्यास परवानगी दिली आहे.
  • मतदाराला कोणाला मत दिले हे जाणून घेण्याचा हक्क आहे. या मशीनमुळे आता मतदाराला मतदान केल्यावर कोणाला मत दिले याची पावती मिळणार आहे.
  • या मशिनचा वापर पहिल्यांदा १९९२मध्ये झाला होता. यानंतर २०१३, २०१५ मध्येही प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर झाला होता.
‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजे काय?
  • मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शी व्हावी व मतदारास खात्री व्हावी, यासाठी मतदानयंत्रांमध्ये अशी व्हीव्हीपीएटी युनिटची सुविधा वापरली जाते.
  • यामुळे मतदाराने मतदान करताच त्याने कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मत दिले याची लहानशी स्लिप त्याला यंत्रातीलच एका पारदर्शक खिडकीतून पाहता येईल.
  • त्यावर मतदाराचे नाव, मतदारयादीतील क्रमांक व त्याने मत दिलेल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असा तपशील असतो.
  • ही छापील पावती सात सेकंदांपर्यंत पाहता येते. ती पाहून मतदार आपण दिलेले मत योग्य प्रकारे नोंदले गेले आहे याची खात्री करू शकतो.
  • ७ सेकंदांनंतर ही मतदानाची पावती आपोआप कापली जाऊन यंत्रासोबत जोडलेल्या एका सीलबंद पेटीत जमा होते.
  • नंतर अशा सर्व स्लीप पुढील सहा महिने किंवा संबंधित निवडणुकीचे प्रकरण हायकोर्टात गेले तर न्यायालयाच्या आदेशानुसार जपून ठेवल्या जातात.

बीएसएफ जवान तेज बहाद्दुर यादव बडतर्फ

  • सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून बडतर्फ केले आहे. 
  • अंतर्गत चौकशीनंतर बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर बीएसएफने ही कारवाई केली आहे.
  • तेजबहादूर यादव यांनी काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
  • बीएसएफ जवानांना मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. अनेकदा जवानांना ११ तास बर्फात उभे राहूनही उपाशी पोटी झोपावे लागते, असा दावा तेजबहादूर यांनी या व्हिडीओतून केला होता.
  • हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात आणि लष्करात प्रचंड खळबळ उडाली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते.
  • बीएसएफने या प्रकरणी गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला होता. त्यात बीएसएफने तेजबहादूर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
  • बीएसएफने गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालात यादव या सर्व प्रकारानंतर यादव यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केल्याचे सांगण्यात येत होते.
  • मात्र, गैरवर्तन केल्याबद्दल त्यांची चौकशी सुरू असल्याचे कारण देत त्यांना स्वेच्छानिवृत्ती नाकारली होती.
  • यानंतर यादव यांना बीएसएफने अटक केल्याचा आरोप त्यांची पत्नी शर्मिला यांनी केली होती. तेजबहादूर यादव हे गायब झाल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला होता.
  • तसेच या प्रकरणी पत्नी शर्मिला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली होती.
  • तेज बहादूर यादव नेमके कुठे आहेत, याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.

‘बाय अमेरिकन हायर अमेरिकन’ अध्यादेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९ एप्रिल रोजी ‘बाय अमेरिकन हायर अमेरिकन’ या अध्यादेशावर स्वाक्षरी केली.
  • हा अध्यादेश लागू झाल्याने आता एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक होणार आहे. त्यामुळे अमेरिकेत आयटी कंपन्यांना नोकरी देताना स्थानिक तरुणांनाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.
  • नवीन धोरणानुसार जास्त वेतन असलेल्या व कुशल कर्मचाऱ्यांनाच अमेरिकेतील एच १बी व्हिसा दिला जाणार आहे. या निर्णयाचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. 
  • ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात एच १बी व्हिसा नियमात बदल करुन अमेरिकन तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले होते.
  • आयटी कंपन्यांमध्ये अमेरिकेतील एच१बी व्हिसा प्रसिद्ध आहे. या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकी आणि भारतीय आयटी कंपन्यांना कमी वेतनात कर्मचारी मिळत होते.
  • हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. अमेरिकेत दरवर्षी ८५ हजार परदेशी नागरिकांना एच १बी व्हिसा दिला जातो. यात सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे.
  • काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियानेही ९५ हजार अस्थायी परदेशी कामगार वापरत असलेला व्हिसा कार्यक्रम रद्द केला होता. याचा फटका ऑस्ट्रेलियातील भारतीय कामगारांना बसणार आहे.

चालू घडामोडी : १८ एप्रिल

आग्रा विमानतळाला दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा विमानतळाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • याशिवाय, गोरखपूरच्या हवाई तळावर उभारण्यात येणाऱ्या नागरी टर्मिनलला नाथपंथाचे संस्थापक गोरखनाथ यांचे नाव देण्यात येणार आहे.
  • योगी आदित्यनाथ हे देशातील नाथपंथीयांच्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक असणाऱ्या गोरखनाथ मठाचे महंत आहेत.
  • योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.
  • उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर बंदी घालणे, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना अँटी-रोमिओ पथक स्थापन अशा निर्णयांचा यामध्ये समावेश आहे.
  • योगी आदित्यनथांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये पान मसाला, गुटखा आणि तंबाखुच्या सेवनावर बंदी घातली होती.

औषध खरेदी घोटाळ्यासाठी प्रविण दीक्षित समिती

  • औषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • यापुढे वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व औषध खरेदी या समितीमार्फतच केली जाणार आहे.
  • या समितीच्या सदस्यपदी मुंबई महानगर रुग्णालयांचे निवृत्त संचालक डॉ. संजय ओक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे निवृत्त माजी सहाय्यक संचालक डॉ. सुरेश सरवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
  • वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये, संलग्नित रुग्णालये व आरोग्य पथकांकरिता यंत्रसामुग्री, औषधे व शल्योपचार सामुग्री (सर्जीकल साहित्य) खरेदी करण्यासाठी यापुढे ही राज्यस्तरीय खरेदी समिती काम करेल.
  • या सामुग्री खरेदीसाठीची ई-निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेपासून संबंधीत खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापर्यंतची सर्व कार्यवाही पार पाडण्याचे अधिकारही याच समितीला देण्यात आले आहेत.
  • ही राज्यस्तरीय खरेदी समिती नऊ सदस्यांची असेल. ज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव असतील.

‘सबका साथ, सबका विकास’ पुस्तक प्रकाशित

  • ‘सबका साथ, सबका विकास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत झाले.
  • या पुस्तकात पंतप्रधानांच्या २८ भाषणांचा आणि १४ ‘मन की बात’च्या संवादांचा मराठीत अनुवाद केला आहे.
  • पुण्याच्या अमेय प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, आयबीएन-लोकमतचे पत्रकार अजय कौटिकवार आणि अमित मोडक यांनी या पुस्तकाचे संपादन आणि अनुवाद केला आहे.
  • या पुस्तकात सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासन, पर्यावरण, शेती अशा विविध विषयांवरची पंतप्रधानांची अभ्यासपूर्ण भाषणे घेण्यात आली आहेत.

८ राज्यांतील पेट्रोलपंप राहणार दर रविवारी बंद

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘इंधन वाचवा’ या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने १४ मे पासून ८ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यानुसार तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरयाणा या ८ राज्यांमधील अंदाजे २० हजार पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील.
  • केवळ रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल.

ऑस्ट्रेलियातील व्हिसा धोरणांमध्ये बदल

  • ऑस्ट्रेलियाने बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी १८ एप्रिलपासून व्हिसा नियमात बदल केला असून याचा फटका हजारो भारतीयांना बसणार आहे.
  • ऑस्ट्रेलियातील व्हिसा ४५७ धोरण हे परदेशी कामगारांमध्ये सर्वात प्रसिद्ध होते. विदेशातील कुशल कामगारांना यामुळे रोजगाराची संधी मिळत होती.
  • यानुसार कामगारांना ४ वर्षापर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत कामानिमित्त राहता येत होते. परंतु आता हा ४५७ व्हिसा रद्द करण्यात आला आहे. 
  • ऑस्ट्रेलिया हा निर्वासितांचा देश आहे. पण येथे नोकरीमध्ये स्थानिक तरुणांनाच प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • नवीन कायद्यानुसार महत्त्वाच्या आणि गरजेच्या ठिकाणीच परदेशी कामगारांना संधी दिली जाणार आहे.
  • ऑस्ट्रेलियात भारतीय कामागारांचे प्रमाण सर्वाधिक असून यानंतर ब्रिटन आणि चीनचा क्रमांक लागतो.
  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान: माल्कम टर्नबुल

तुर्कस्तानची अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल

  • तुर्कस्तानात घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ५१.३७ टक्के मते मिळवून विद्यमान अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगन यांनी देशाच्या राजकारणावरील आपली पकड घट्ट केली आहे.
  • तुर्कस्तानमधील संसदीय कार्यपद्धतीऐवजी अध्यक्षीय पद्धत लागू करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निकाल आहे.
  • तुर्कस्तानातील पंतप्रधान पद रद्द करून सर्वांधिकार अध्यक्षांकडे बहाल करण्याच्या बाजूने या सार्वमतामधून नागरिकांनी कौल दिला आहे.
  • तुर्कस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी या निकालास आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
  • एर्दोगन हे २००३पासून तुर्कस्तानात सत्तेवर आहेत. त्यांच्या विरोधात मागील वर्षी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न असफल ठरल्यानंतर त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.
 निवडणूक कशासाठी? 
  • तुर्कस्तानमध्ये अध्यक्षीय पद्धत लागू करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनादुरुस्तीसाठी ही निवडणूक झाली.
  • या प्रस्तावित विधेयकानुसार, यापुढील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणूक ३ नोव्हेंबर, २०१९ रोजी होईल. तसेच, अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा असेल.
  • तुर्कस्तानमधील ही नवी प्रस्तावित रचना अमेरिका आणि फ्रान्सच्या धर्तीवर असेल. यात एका व्यक्तीला दोनदाच अध्यक्षपद भूषविता येऊ शकेल.
  • मात्र, या पद्धतीमध्ये त्रुटी असून अमेरिका किंवा फ्रान्समधील अध्यक्षीय राजवटीसाठी असलेल्या काही मर्यादा तुर्कस्तानने स्वीकारलेल्या नाहीत, असे  विरोधकांचे म्हणणे आहे.
  • अध्यक्षांना पायबंद घालण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने यातून एकाधिकारशाही किंवा हुकूमशाहीकडे वाटचाल होणार आहे, अशी भीतीही विरोधक व्यक्त करत आहेत.
 तुर्कस्तानच्या अध्यक्षांची नवी भूमिका 
  • मंत्रिमंडळासह सर्व महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांकडे असतील.
  • एक किंवा अधिक उपाध्यक्ष नेमण्याचे अधिकारही अध्यक्षांना असतील.
  • तुर्कस्तानमधून पंतप्रधान हे पद काढून टाकले जाईल.
  • न्यायव्यवस्थेमध्येही हस्तक्षेप करण्याचे अधिकार अध्यक्षांना असतील.
  • देशात आणीबाणी लागू करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल.

एचआयव्हीवर पहिले औषध शोधणारे डॉ. मार्क वेनबर्ग यांचे निधन

  • ह्य़ूमन इम्युनोडीफिशियन्सी व्हायरस म्हणजे एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या रोगावर त्यांनी पहिले औषध शोधणारे संशोधक डॉ. मार्क वेनबर्ग यांचे ११ एप्रिल रोजी निधन झाले.
  • त्यांचा जन्म माँट्रियलमध्ये १९४५ साली झाला. त्यांनी मॅकगिलमधून पदवी घेतली व कोलंबिया विद्यापीठातून रेणवीय जीवशास्त्रात पीएचडी केली.
  • कॅनडात त्यांनी १९८०च्या सुमारास पहिली एड्स प्रयोगशाळा सुरू केली. त्या वेळी एड्सचे प्रमाण आफ्रिकेत जास्त होते.
  • मॅकगिल येथे त्यांनी संशोधक म्हणून १९७४मध्ये काम सुरू केले. नंतर ते मॅकगिलच्या एड्स केंद्राचे संचालक होते.
  • लेडी डेव्हिस इन्स्टिटय़ूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत ते एड्स संशोधनाचे काम करीत होते.
  • त्यांनी मॅकग्रॉहिल विद्यापीठात एचआयव्हीवर संशोधन केले. एचआयव्ही विषाणूचा शोध लावणारे डॉ. रॉबर्ट गॅलो यांनी त्यांना ‘ते’ विषाणू संशोधनासाठी दिले होते.
  • त्यातून त्यांनी १९८९मध्ये ‘३ टीसी’ हे औषध तयार केले, ते एड्सवर गुणकारी ठरले. एड्सचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.
  • एचआयव्ही रुग्णांना समानाधिकार व या रोगाविरोधातील औषधोपचार या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी धैर्याने व मेहनतीने काम केले.
  • समलिंगी लोकांना मानवी समाजात मिळणारी वाईट वागणूक त्यांना अमान्य होती. त्यामुळे एलजीबीटी समुदायालाही त्यांनी पाठबळ दिले.
  • वेनबर्ग यांना २००१ मध्ये ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. २०१५मध्ये कॅनेडियन मेडिकल हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश झाला. फ्रान्सचा ‘शवालिए द लिजन’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.