पूर्वी पारंपारिक मतदान पध्दतीत वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका आणि मतपेट्यांच्या जागी आलेले एक साधे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स) होय.
ईव्हीएमची निर्मिती
केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडूनच या यंत्राची निर्मिती केली जाते आणि त्यांच्याकडून हे यंत्र भारतीय निवडणूक आयोग घेते.
ईव्हीएमचे फायदे
अवैध आणि शंकास्पद मते टाळता येतात. बऱ्याच प्रकरणात अशी मते वाद आणि निवडणूक याचिकांना कारणीभूत ठरतात.
मतमोजणी प्रक्रिया अधिक जलद होते.
कागदांचा वापर मोठया प्रमावर कमी झाल्यामुळे वृक्ष संवर्धन होत आहे त्यामुळे ही प्रक्रिया पर्यावरण अनुकूल होत आहे.
छपाईचा खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
भारतात ईव्हीएमचा प्रवास
१९८२मध्ये केरळमधील परुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रांवर प्रथमच ईव्हीएम वापरण्यात आले.
त्यानंतर १९९८मध्ये १६ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ईव्हीएम वापरण्यात आले.
१९९९च्या लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये ईव्हीएम वापरले गेले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला.
आतापर्यंत १०७ विधानसभांच्या निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’चा वापर करण्यात आला आहे.
भारतीय ईव्हीएमची वैशिष्टये
हे एक साधे आणि सरळ यंत्र असून निवडणूक कर्मचारी आणि मतदार अगदी सहज ते वापरू शकतात. तसेच हे यंत्र हाताळण्यासाठी सोपे असते आणि कुठल्याही वातावरणात ते वापरता येऊ शकते.
कुठल्याही नेटवर्कशी जोडणी नसणारे हे एकमेव यंत्र आहे, त्यामुळे याच्या कार्यान्वयनात तसेच निकालातही कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.
देशातील बऱ्याच ठिकाणच्या अनियमित वीजपुरवठयामुळे या यंत्रात बॅटरीवर चालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ईव्हीएम सुरू करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने प्रा. एस संपथ, प्रा. पीव्ही इंदिरेसर आणि डॉ. सी राव कसारबडा यांच्या तांत्रिक समितीचा सल्ला घेतला होता.
या समितीने या यंत्राच्या सर्व तांत्रिक बाजू सूक्ष्मपणे तपासल्या आणि एकमताने निवडणुकीत हे यंत्र वापरण्याची शिफारस केली.
याशिवाय ईव्हीएमला मान्यता देण्यापूर्वी निवडणूक आयोगाने सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर याबाबत चर्चा केली होती. तसेच त्यांना याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले होते.
ईव्हीएममध्ये कमाल ३८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर सामान्यपणे १४००हून कमी मतदारांची संख्या असते.
तसेच ईव्हीएममध्ये कमाल ६४ उमेदवारांची यादी समाविष्ट करता येते. उमेदवारांची संख्या ६४हून अधिक असल्यास मतपत्रिकांच्या पारंपारिक पध्दतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.
ईव्हीएममध्ये अनाधिकृत बदल अशक्य
ईव्हीएममध्ये कुठलेही अनधिकृत बदल करता येणार नाही अशी व्यवस्था बनवण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते.
ईव्हीएममध्ये वापरण्यात आलेल्या मायक्रो प्रोसेसर चिपच्या प्रोगामिंगचे रुपांतर चिपमध्ये केले जाते. यात बदल करता येत नाही अथवा त्याची नक्कलही करता येत नाही.
मतदान सुरू होण्याआधी ईव्हीएमची चाचणी होते. मशीनशी काही छेडछाड केली असल्यास ते त्याचवेळी उघड होऊ शकते आणि ते मशीन बाद केले जाते.
मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी निवडणूक अधिकारी सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या पोलिंग एजंटना ईव्हीएमची चाचणी करायला सांगतात.
यानंतर सर्व पोलिंग एजंट निवडणूक अधिकाऱ्याला मशीनमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे प्रमाणपत्र देतात. त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरू होते.
खबरदारीचा अतिरिक्त उपाय म्हणून ही यंत्रे उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सीलबंद केली जातात आणि केंद्रीय पोलिस दलाच्या निगराणीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात.
निवडणूकीपूर्वी आणि निवडणूकीनंतर ही यंत्रे ठेवण्याच्या जागी प्रवेश करण्यासाठी कडक प्रक्रियेतून जावे लागते.
निवडणूक आयोगाने या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी ही पध्दती तयार केली आहे.
याव्यतिरिक्त अधिक खबरदारीचा उपाय ईव्हीएमसाठी दोन पातळयांवरील सुसुत्रीकरण पध्दत निवडणूकीत वापरण्यात येत आहे.
ठराविक मतदान केंद्रात कुठले ईव्हीएम वापरले जाणार आहे याची माहिती अगोदरच कुणाला कळू नये यासाठी ही पध्दत वापरण्यात आली आहे.
भारतातील ईव्हीएम जगातील सर्वोत्तम दर्जाचे
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका संस्थेच्या पाहणीत भारतातील ईव्हीएम हे जगातील सर्वोत्तम दर्जाचे मतदान यंत्र असल्याचे समोर आले आहे.
भारतात सध्या वापरात असलेल्या ईव्हीएम मशिन्स या दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशनच्या आहेत. या मशिन्समध्ये सांकेतिक स्वरूपात माहिती साठविण्याचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे.
जगातील काही मोजकेच देश ईव्हीएम मशिन्सचा वापर करतात. तर जगातील काही देश मतदानासाठी रिमोट इंटनरनेट व्होटिंग प्रणालाची वापर करतात.
मात्र, रिमोट इंटरनेट व्होटिंग प्रणालीत मतदान यंत्रातील माहिती हॅक होण्याचा किंवा त्यामध्ये बदल होण्याचा मोठा धोका आहे.
मात्र, भारतातील ईव्हीएम मशिन्स इंटरनेटला जोडलेली नसल्यामुळे या मशिन्स हॅक होण्याचा कोणताही धोका नाही. परिणामी ही मतदान प्रणाली जगातील एक आदर्श प्रणाली मानली जाते.
ईव्हीएम वापरणारे देश
भारत, ब्राझील, नॉर्वे, जर्मनी, व्हेनेझुएला, कॅनडा, बेल्जियम, रुमानिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, आयर्लंड, युरोपीय राष्ट्रे आणि फ्रान्स.
२०१३मध्ये नामिबियाने भारताकडून १७०० ईव्हीएम खरेदी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा